भाग-15
सुयशने गाडी वेगाने चालवली खरी पण आता शहरांमध्ये पोहोचल्यावर 'नेमके कुठे जायचे?' हा मनात विचार करत सुयशने स्टॅन्डजवळ गाडी पार्क केली आणि तो मागे वळून म्हणाला, "आईबाबा आपण नेमके कुठे जायचे आता?"
संकपाळ सर नाराज होऊन मॅडमकडे पाहत होते. त्यांच्याकडेही सुयशला द्यायला उत्तर नव्हते. पण मॅडमनी प्रवासात काहीतरी प्लॅन निश्चित केलाय हे त्यांच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वासावरून स्पष्ट दिसत होते. त्या सुयशला म्हणाल्या," सुयश आज आपण लॉजवरच थांबूया. उद्या दहा वाजेपर्यंत आपल्याला आपल्या हक्काचं घर नक्की मिळेल."
"पण ते कसं शक्य आहे आई ?" सुयश साशंक नजरेने म्हणाला.
"अरे बँकेत माझ्या नावावर रिटायरमेंटचे काही पैसे आहेत ते आपण घरासाठी गुंतवूया." मॅडम म्हणाल्या.
"अगं ते तर तुम्ही तुमच्या आजारपणासाठी ठेवले आहेत ना? " सुयश म्हणाला.
"अरे तसं फक्त म्हणायचं असतं. तुम्हा मुलांना आम्ही लहानाचे मोठे केले, तुमचे आजारपण केले तेव्हा तुम्ही थोडीच तुमचे साठवलेले पैसे दिले आम्हाला. मग आता आमच्या आजारपणाचा खर्च करायला तू आणि गौरी आहात ना?" मॅडम म्हणाल्या.
"हो आई, पण.." सुयश पुढे बोलणार इतक्यात मॅडम म्हणाल्या, " आता पण वगैरे काही नाही.आपल्याला या शहरात आता बिलकुल राहायचं नाही. तुझे आणि रियाचे आयुष्य रियाच्या घरच्यांमुळे इथे राहून सुखी होईल असे मला अजिबात वाटत नाही. मी रियाच्या आईशी बोलेन आणि त्या माझ्या निर्णयाला नाही म्हणणार नाहीत याची मला पूर्ण खात्री आहे." मॅडम दूरदृष्टीपूर्वक बोलत होत्या. "पण आई, आपण कुठे जायचे आहे?"
"खूप लांब अगदी दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यात म्हटलं तरी चालेल." मॅडम नाराज होऊन म्हणाल्या.
*******
इकडे गौरीच्या घरी मात्र नवीन सुनेच्या आगमनाची जोरदार तयारी झाली होती. आनंदाला जणू उधाण आलं होतं. सगळीकडे रंगबिरंगी फुलांच्या माळा, लाइटिंग, रांगोळ्या तसेच दिव्यांचा झगमगाटात लक्ष्मीच्या पावलाने सुनेचा वाजतगाजत गृहप्रवेश करण्यासाठी घरातील प्रत्येक सदस्य आतुर होता. पोलीस अधिकारी असलेल्या आपल्या लेकाचा अभिमान आईला होताच पण नक्षत्रासारखी असलेली आपली सून आता तिचंही गौतमच्या आईला खूप कौतुक होतं. घरातली मोठी तसेच एकुलती एक सून म्हणून अजूनच गौरीवर प्रेमाचा वर्षाव होत होता. गाडीतून उतरल्यावर फटाक्यांच्या धडाड्धूम आवाजाने गौरीचे स्वागत झाले. फुलांच्या वर्षावात गौरी आणि गौतम मखमली गालीच्यावरून चालत दरवाज्यापाशी आले. गौतमला सख्खे असे भाऊ-बहीण नव्हते, पण चुलत बहीण भाऊ पुष्कळ होते. ते मोठ्या वहिनीची चेष्टा म्हणून दरवाजाजवळ वाट अडवण्यासाठी उभे राहिले.
"वहिनी नाव घेतल्याशिवाय तू आत नाही जायचं." एक छोटीशी ननंद गौरीला म्हणाली.
गौरीने हसून गौतमकडे पाहिले. गौतमनेही डोळ्यांनीच 'नाव घे.' असे सुचवले.
"गौरीने नाव घ्यायला सुरुवात केली ती म्हणाली,
"मोती बनून अंगठीत गुदमरण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची भागवावी तहान.. गौतमरावांचं नाव घेते आता तरी वाट सोडा माझी ननंदबाईं राखून मोठ्या वहिनीचा मान.."
गौरीच्या उखाण्यानंतर हास्यकल्लोळ झाला. तितक्यात छोटीशी नंदनबाई म्हणाली, "हो. हो. आता दादाचा उखाणा ऐकला की, मी नाही तुम्हांला अडवणार."
दादानेही मग उखाणा घेतला.गौतम म्हणाला,
"सगळ्याच मुलांना वाटतं आपल्याला मिळावी परी.. पण मला मिळाली गौरी.. जी आहे त्यातल्या त्यात जरा बरी."
आता मात्र गौरीने थोडसे रागाने गौतमकडे पाहिले.वातावरण जरा गंभीर झाले.पण गौरीनेच लगेच हसून परत वातावरण फ्रेश केले.
नवरा नवरीला दारात अंघोळ घालण्यासाठी पाट मांडण्यात आले.दोघेही पाटावर येऊन बसले. गौरीने प्रथम गौतमच्या अंगावर पाणी ओतले. नंतर गौरीच्या अंगावर गौतम पाणी ओतणार तितक्यात त्याच्या हाताला ते पाणी खूप थंड लागले. त्याने आत हात घालून पाहिले तर ते पाणी फ्रीजमधले आहे हे त्याच्या लक्षात आल्यावर त्याने ते खाली ओतले.
गौतमकडून चुकून पाणी सांडले असे सगळ्यांना वाटले पण ज्या दिरांनी वहिनीची चेष्टा करण्यासाठी फ्रीजमधलं गार पाणी ताब्यात भरले होते त्यांचे चेहरे मात्र बघण्यासारखे झाले.
"काय रे दादा, आम्ही वहिनीची मज्जा करणार होतो ना." हे ऐकून घरातल्या मोठ्यांनाही लहान दिरांची वहिनीची मजा करण्याची करामत समजली आणि त्यांना चांगलाच ओरडा बसला.
"थंडीच्या दिवसांत असे थंड पाणी ओतल्यावर आजारी पडेल की नाही वहिनी तुमची ? मग तुमच्या दादालाच त्रास होणार?" असं गौतमच्या आईनी म्हटल्यावर, "तो कसा काय?" मुलांनी पुढचा प्रश्न विचारला.
"अरे म्हणजे तुमची वहिनी आजारी पडल्यावर मलाच दवाखान्यात घेऊन जावे लागेल की नाही तुमच्या वहिनीला." गौतमने त्या लहानग्यांना प्रेमाने समजून सांगितले.
"सॉरी ! दादा वहिनी." म्हणून लहान दीर खेळायला पळाले.इतके सारे आनंदी वातावरण असूनही गौरीला मनातून उदास वाटत होते. लग्नानंतरचे सगळे विधी पार पडले. रात्र झाली. नववधूवरांची शय्या छान रंगबिरंगी फुलांनी सजवली होती. गौतम गौरी आज खऱ्या अर्थाने एकमेकांच्या जवळ येणार होते.दोघांनाही अनामिक ओढ लागली होती. नववधू आपला शालू परिधान करून गौतमची वाट पाहत होती. गौतम आला.गौरीने दुग्धशर्करेने भरलेला ग्लास गौतमच्या हातात दिला. गौतम प्रेमाने गौरीच्या डोळ्यात पाहत होता. त्याला गौरी काळजीत वाटत होती. म्हणून तो सहजच गौरीला म्हणाला, गौरी तू टेन्शनमध्ये का दिसतेस? एनी प्रॉब्लेम?"
"नाही असं काही नाही." गौरी म्हणाली.
तितक्यात "हॅलो! हो बोल सुयश." म्हणून गौतमने फोन कानाला लावला. हे सर्व करताना तो गौरीकडे टक लावून पाहत होता. गौरीचा चेहरा आनंदाने खुलला होता. गौतमला समजले गौरीला तिच्या माहेरच्या माणसांची आठवण येतेय म्हणून ती अपसेट आहे.
"तुझे बोलून झाले की माझ्याकडे दे फोन." आपल्याच विचारात मग्न असलेली गौरी म्हणाली.
"म्हणजे माझा अंदाज खरा ठरला तर. तुला आई बाबांची आठवण येतेय ना.कोणाचाच फोन आलेला नाही.पण आपण उद्या नक्की जाऊया तुझ्या आई बाबांना भेटायला." गौतम हसून म्हणाला.
"खरंच." गौरीने गौतमला मिठी मारली. "हो." म्हणून गौतमनेही गौरीला जवळ घेतले.
गौतम बायकोला दिलेले वचन अगदी मनापासून निभावत होता. सकाळ झाली तशी गौरी प्रातः कालीन विधी आवरून स्वयंपाक घरात आली होती. "आज आईकडे लगेच निघूया." म्हणत गौतमही लगबगीने उठून "तयार होऊन आलोच खाली." असे म्हणाला होता.तितक्यात सगळ्यांनी विधीवत गौरीला आज गोडाचा शीरा बनवायला हवा असे सांगून टाकले.
सासूबाईंनी सर्व साहित्य अगदी प्रमाणात काढून गौरीसमोर ठेवले. सासूबाई गौरीला प्रेमाने साहित्याचे प्रमाण समजावून सांगत होत्या. गौरीही मनापासून शीरा बनवण्याची कृती करीत होती. वेळेचा पक्का असणारा गौतम आवरून खाली आला.
"काय रे लवकर उठलास?" आई म्हणाली.
"हो गं आई, गौरीला माहेरी एक चक्कर मारून आणतो." गौतम म्हणाला.
"बरं बाबा, एवढा शीरा झाला की जा तुम्ही दोघे." आई म्हणाली.
"डन." म्हणून गौतम हॉलमध्ये जाऊन बसला.
गौरीचा शीरा तयार झाला. ती जायला निघणार तोच तिच्या चुलत सासूबाई म्हणाल्या, "अगं आज तुझ्या हातूनच दे देवाला नैवेद्य."
"बरं." म्हणून गौरी देवघराकडे गेली. इथे गौतम वाट पाहत होता. आज त्याला खूपच आनंद होत होता.
'आज माझ्या गाडीत पहिल्यांदाच एक मुलगी फ्रन्ट सीटवर बसणार आहे आणि ती माझी हक्काची बायको असेल. लॉंग ड्राईव्हवर गौरीसोबत मला खूप गप्पा मारायच्या आहेत. पण आज माझी ते "आजा शाम होने आई…मौसम ने ली अंगडाई.. तू चल मैं आई.." मधल्या सलमानसारखी अवस्था होतेय बहुतेक .' हा मनात विचार करून गौतम स्मितहास्य करत होता. पण त्याची नजर सतत गौरीला शोधत होती.
देवाला नैवेद्य दाखवून गौरी सासूबाईंना म्हणाली, "आई देवाला नैवेद्य दाखवला. काय करू आता?"
"काही नको. आता फक्त थोडासा नाश्ता करा आणि मग घराबाहेर जा." सासूबाई गौरीला म्हणाल्या.
गौरीला आईला भेटायला जायचेय या कल्पनेनेच पोट भरले होते पण सासूबाईचे मन राखण्यासाठी तिने कसेबसे दोन घास सगळ्यांसोबत खाल्ले.
"आई झालं माझं खाऊन." गौरी म्हणाली.
"जा मग आता." गौरी सगळ्यांचे आशिर्वाद घेऊन वर गेली तशी तयार होऊन खाली आली. नाजूक चवळीची शेंग, लांबसडक वेणी ऐटीत मिरवत गौरी आपली साडी आवरत खाली आली. जाताना "आई येते." म्हणून गौतमजवळ उभी राहिली.
"राहिले का अजून काही?" गौतम हळूच म्हणाला.
"नाही." लाजून गौरी म्हणाली.
"चला मग आता." म्हणून स्मितहास्य करत दोघे बाहेर गेले.
गौरी आणि गौतम बाहेर पडताच गौतमच्या आईला त्यांची चुलतसासू म्हणाली, "एवढं सुनेला डोक्यावर घेऊ नये माणसाने. असे किती दिवस झाले लग्न होऊन की निघाली लगेच माहेरला ? आणि तू ही परवानगी दिली? हे काही बरोबर नाही वाटलं मला. बघ बाई माझे अनुभवाचे बोल आहेत." गौतमच्या आईच्या कपाळावर आठ्या उमटल्या.
अतिशय आनंदात असणाऱ्या गौरीला माहेरी इतकं सारं घडलेय हे समजल्यावर काय वाटेल?
गौरीच्या सासूबाईंची काय प्रतिक्रीया असेल गौरी घरी आल्यावर?
पाहूया पुढील भागात क्रमशः
सौ. प्राजक्ता पाटील.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा