Login

हा खेळ ऊन सावल्यांचा भाग-3

काय पाठवले असेल सुयशने रियासाठी...??

हा खेळ ऊन सावल्यांचा भाग- 3

https://www.facebook.com/581606972323826/posts/1299116167239566/

मागील भागाची लिंक ☝?


मागील भागात आपण पाहिले की , रियाला घरच्यांनी चुलत बहिणीला पाहुणे बघायला येणार म्हणून चक्क खोलीतून बाहेर पडू नकोस म्हणून सांगितलं होतं. कारण नवरा गेल्यावर विधवा झालेली रिया घरच्यांच्या दृष्टीने अपशकुनी होती. पण समाजात रियाच्या मॅडम सारखी सुशिक्षित विचारांची आणि माणुसकी शिल्लक असलेली माणसं जिवंत आहेत म्हणून अंधश्रद्धेला खतपाणी मिळण्यापासून किंवा स्त्रियांवरील अत्याचारापासून कित्येक निष्पाप मुलींची सुटका होत आहे.

" अगं रिया , फक्त सौभाग्यालंकार उतरवले , म्हणून कोणी अपशकुनी होतं का गं ? आणि हे सर्व नवऱ्यासाठी करत नसतात तर त्या मागे शास्त्रीय कारणे असतात. म्हणूनच कपाळावरील कुंकू , नाकातली नथ , पायातलं पैंजण असो किंवा जोडवी ही स्त्रियांच्या उत्तम आरोग्यासाठी अंगावर घातली जातात . पण लोकांच्या सोयीप्रमाणे किंवा विशिष्ट हेतू ठेवून विधवा स्त्रियांना दुय्यम दर्जा पूर्वी दिला जायचा. अगं पण अनेक क्रांतिकारकांनी विधवांशी पुनर्विवाह करून समाज प्रबोधन केले ना , आणि हे आपण पुस्तकातून अभ्यासलंय सुद्धा हो की नाही ? बाकीच्यांनी काहीही विचार केला तरी तू असा विचार परत करणार नाहीस. वचन दे तू मला." मॅडम हात पुढे करत म्हणाल्या.

"नाही मॅडम ,नाही देऊ शकत मी तुम्हाला असं कोणतही वचन. तुम्ही बोलत असलेलं जरी मला पटत असलं तरी मी एकटी नाही एवढ्या सगळ्यांना विरोध करू शकत. हे फक्त पुस्तकात वाचायला छान वाटत होतं , पण आज मी ते स्वतः अनुभवते तेव्हा ते किती कठीण असतं हे नाही कळायचं तुम्हाला." रियाच्या अश्रूंचा बांध फुटला. 

मॅडम मनात विचार करत होत्या. \" रिया माझ्यापेक्षा जास्त विधवा स्त्री म्हणून घ्यायचं दु:ख आणखी कोणाला ठाऊक असेल ? पण आता ते सर्व उलगडून सांगण्याची ही वेळ नाही. गौरीचा साखरपुडा झाल्यावर नक्कीच मी तुला भेटणार आहे.\" 

मॅडम रियाचे डोळे पुसत म्हणाल्या ,"जेव्हापासून मला तुझ्या बाबतीत घडलेला प्रसंग समजला आहे ना रिया , माझं मन तुला भेटण्यासाठी खूपच कासावीस होत होतं. तेव्हापासून माझ्या मनाला चैन नव्हती. पण काय करणार? माझ्या आईचं त्याच काळात निधन झालं होतं. म्हणून मी माझ्या माहेरी होते गं तीन-चार महिने. भाऊ नसल्यामुळे आम्ही बहिणीनीच आईचा सर्व विधी पार पाडला. आणि गावात आल्यावर समजलं की , गौरीला पाहुणे बघायला येणार होते. अन् त्याच तयारीत मी गुंतले. आणि योगायोगाने साखरपुड्याचेही पण ठरले. मग त्या निमित्ताने तुला आवर्जून बोलवावे म्हणून मी स्वतः आले. पण मी इथे नव्हते म्हणून मी सरांना आणि सुयशला तुला भेटायला जा म्हणून आवर्जून फोन करून सांगितले होते."

"तू सांगितल्यावर आम्ही आलो होतो रियाला भेटायला , पण काकासाहेब आम्हाला रियाला भेटू देतील तर खरं ना." सुयश रागाने म्हणाला.

" काय ! म्हणजे त्या दिवशी तुम्ही रियाला भेटलाच नाहीत?" मॅडम आश्चर्याने म्हणाल्या.

"नाही. आणि आई आजही आपण मागच्या दाराने आत आलो होतो आणि रियाला बोलत होतो. हेही काकासाहेबांना समजल्यावर त्यांना हे बिल्कुल आवडणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे." सुयश म्हणाला.

"बघितलंत मॅडम , आमच्या घरचं वातावरण कसं आहे ते. मी समाजाची पर्वा नाही करत. मग आता तुम्हीच सांगा घरातल्यांचा विरोध पत्करून कशी येणार आहे मी गौरीच्या साखरपुड्याला ?"

"पाहुणे जाऊनही आता बराच वेळ झाला , तरी तुझ्या घरचे बाकीचे काय करताहेत ? कुणीच कसं आलं नाही तुला भेटायला. बोलले असते मी त्यांच्याशी ." मॅडम म्हणाल्या. 

"नाही मॅडम ,त्याचा काहीच उपयोग होणार नाही काकासाहेबांच्या पुढे कोणाचं काहीच चालत नाही. आता यावेळेस घरातील सर्व पुरुष मंडळी शेतावर गेली असतील आणि सर्व बायका घरातली कामं आटपत असतील."  रिया म्हणाली.

भांड्यांचे खरकटे पाणी वाड्याच्या मागे असलेल्या उकिरडयामध्ये टाकायला आलेली शांता ( कामाला असणारी मावशी ) पाणी टाकून येऊन मॅडमजवळ येऊन बसली. मॅडमच्या घरीही धुणीभांडी तीच करायची त्यामुळेच मॅडमला बोलण्यासाठी ती आत आली. शांता रियाच्या घरी रियाच्या वडिलांच्या लहानपणापासून धुणीभांडी करत होती वयस्कर असलेल्या शांताला रियाची अगदी तिच्या सख्या नाती सारखी माया यायची. भल्यामोठ्या वाड्यात रियाची आई आणि ही शांता ह्या दोघीच काय ते नेहमी नसले तरी कधीकधी रियाला भरभरून बोलायच्या. 

"मॅडम , पोरीचं लई वाईट वाटतं बघा मला. ते लहानपणी मिळवलेलं बक्षीस मला आडाणी बाईलाही कौतुकानं दाखवणारी पोरं अशी एका कोपर्‍यात उदास बसलेली पाहिली की जीव कासावीस होतो बघा माझा. लय लग्नाची घाई केली बघा पोरीच्या.ती म्हणत व्हती म्हणून शिकू दिलं असतं तर कशाला असलं जिणं पदरी पडलं असतं पोरीच्या." रियाच्या डोक्यावरून हात फिरवत शांता डोळ्यात पाणी आणून म्हणाली. 

"अगदी खरंय बघ तू म्हणतेस ते." मॅडम म्हणाल्या.

"शांता ,शांता." म्हणत रियाची आई , बरोबर रियाच्या खोलीत आली. कारण शांता काम करताना दिसत नाही म्हणजे नक्कीच ती रियाच्या खोलीत असेल अशी त्यांना खात्री होती. 

मॅडमला पाहून रियाची आई हसली , पण सुयशला पाहिल्यावर त्यांच्या चेहर्‍यावर आठ्या उमटल्या.

"मॅडम तुम्ही रियाच्या खोलीत बसला आहात म्हणून घरच्या सगळ्यांना काही वाटणार नाही हो , पण सुयशला पाहून काहीही बोलतील घरातले. तेव्हा कुणी बघायच्या आत तुम्ही इथून जावा. माझ्या रियाच्या सुखासाठी एवढं करा." म्हणून रियाची आई रडू लागली.

"अहो तुम्ही असं रडू नका. माझं ऐकून तर घ्या. मी का आले आहे इथे ते?" मॅडम म्हणाल्या. 

"मॅडम ,आता माझ्या रियाला कोणीही वाईट म्हणू नये हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आधीच सकाळपासून माझी सोन्यासारखी लेक या चार भिंतीत कैद करून ठेवली आहे. आणि तिच्या खोलीत कोणी परपुरुष आला होता हे काका साहेबांना कळल्यावर ते माझ्या रियाला काय शिक्षा देतील मी कल्पनाही नाही करू शकत. तुमचं काहीही काम असेल तर तुम्ही काकासाहेबांना येऊन भेटा. पण आता माझ्या लेकीच्या खोलीतून बाहेर निघून जा. शपथ आहे तुम्हाला माझ्या रियाची." रियाची आई घरातील परिस्थितीनुसार व्यक्त होत होती. ती लेकीबद्दलची काळजी वाहणाऱ्या अश्रूंद्वारे व्यक्त करत होती.

"अहो पण.." मॅडम पुढे बोलणार इतक्यात सुयशने मॅडमचा हात पकडला. "चला आई निघूया आपण." म्हणून तो रियाच्या खोलीबाहेर पडला. शांता ही कामाला गेली.

\"सुयशला कोणीही पाहू नये.\" हाच मनात विचार करत रियाच्या आईने देवाचा धावा सुरू केला.

सुयश आणि मॅडम कोणाच्याही नजरेस न पडता निघून गेले. पण रियाला मात्र सतत मॅडम आणि सुयशचे विचार मनात घोळू लागले होते. रिया मनात विचार करत होती. \"किती मोठा बंगला आहे मॅडमचा गावात. आधुनिक सुविधांनी सुसज्ज अस घर असताना सुद्धा आज माझ्यासाठी मॅडम आणि सुयश चटईवर बसले. माझ्या या कळशीतले पाणी प्याले. खरंच अशी परकी माणसं जेव्हा मनावर हक्काने राज्य करतात ना , तेव्हा रक्ताच्या नात्याहूनही परकी माणसं जवळची वाटतात. आणि आता खरं म्हणजे घरातल्या माझ्या माणसांनी मला समजून घ्यायला हवं पण त्यांनी फक्त मला त्यांच्या हातातलं एक खेळणं बनवलं आहे. ऊठ म्हटलं की उठायचं आणि बस म्हटलं की बसायचं.\" 

"रिया कसला विचार करतेय ? का आलेल्या त्या मॅडम तुला भेटायला?" 

"आई तुला खरं सांगू ? या घरात राहून तुझेही विचार या घरातल्यान् सारखेच झालेत. आणि आता माझे ही होणार हे मला कळून चुकलंय. म्हणजे बघ ना , घरात आलेल्या प्रत्येक पाहुण्याच्या मुखात दोन घास घातल्याशिवाय आपण त्यांना निरोप देत नाही. पण आज केवळ मला भेटायला आले म्हणून मॅडम आणि सुयशला  "अतिथी देवो भव: हा मानही मिळाला नाही. म्हणजे माझं तोंड पाहून हा अपशकुन घडला असं घरच्यांना आणि तुलाही वाटेल. पण का घाबरलीस आई तू ? का नाही ऐकून घेतलं तू मॅडमच ? कारण घरचे काय म्हणतील हाच विचार केलास तू आणि तोच यापुढे मलाही करावा लागेल. हेच ना." रिया आईला म्हणाली.

"रिया मला माफ कर ." म्हणून आई निघून गेली.

कोणतंही वचन मागितले नसताना आज रियाने स्वतः खोलीचा दरवाजा बंद करून घेतला.

सायंकाळ झाली. तशी रात्रही झाली.रियाच्या खोलीचा दरवाजा कोणीतरी वाजवला. 

"आई मला भूक नाही. तुम्ही जेवण करून घ्या." रिया आईला उद्देशून म्हणाली.

"रिया अगं शांता मावशी हाय. उघड बाई लवकर दरवाजा." शांता मावशी म्हणाली. 

\"शांता मावशी अजून घरी कशी गेली नाही ? आणि दुपारी तर बोलली मला. आता अजून काय काम काढले हिने माझ्याकडे ?\" रिया मनात विचार करून दरवाजा उघडायला दरवाज्याकडे गेली. रियाने दरवाजा उघडला तर शांता मावशीच्या हातात एक चिट्ठी आणि एक बॉक्स होता.

"हे काय आहे ?" रियाने साशंक नजरेने विचारले.

"घे बाई , सुयश दादानं तुझ्यासाठी पाठवलेय अन् नाही घेतलं तर मैत्रीची शपथ आहे म्हणालेत तुला. सुयश दादा किती चांगलं आहेत , हे मला बी आणि तुला बी चांगलंच माहित आहे . त्यामुळे असलं तसलं काही द्यायचे नाहीत ते तुला. कुणी बघायच्या आधी घे पटकन. अन् नीट ठेव बाई पोरी. जाते मी." म्हणून शांता मावशी निघून गेली.

काय पाठवले असेल सुयशने रियाला?

पाहूया पुढील भागात क्रमशः

सौ. प्राजक्ता पाटील.

कथा आवडल्यास लाईक करा , कमेंट करा आणि नावासकट शेअर करा आणि हो मला फॉलो करायला विसरू नका.

कथा प्रकाशनाचे सर्वाधिकार लेखीकेकडे राखीव. 

कथा मनापासून वाचणाऱ्या सर्व वाचक वर्गाचे आभार.

#साहित्य चोरी करणे हा गुन्हा आहे.



0

🎭 Series Post

View all