Login

हा खेळ ऊन सावल्यांचा भाग-4

रियाच्या होरपळलेल्या आयुष्यात सुयश सावली निर्माण करतोय मिळेल का त्याला यश त्यासाठी नक्की वाचा हा खेळ ऊन सावल्यांचा..

भाग-4 

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1300761760408340&id=581606972323826




रियाने शांता मावशी गेल्यावर दरवाज्याची कडी लावून घेतली. सुयशने दिलेलं गिफ्ट घेऊन ती चटईवर येऊन बसली. 


\"सुयशने का दिलं असेल मला गिफ्ट? नकोय मला कोणाची दया. मी पडेन या परिस्थितीतून बाहेर.\" रियाने मनात विचार करून गिफ्ट बाजूला ठेवले.


रियाने खूप वेळ त्या चिट्ठीकडे आणि बॉक्सकडे पाहिलेही नाही. पण फक्त चिठ्ठी वाचून पहावी म्हणून तिने सुयशची चिठ्ठी वाचायला हातात घेतली. 



प्रिय रिया, 


      प्रिय म्हणू की नको ? पण तुला खरं सांगू रिया,  तू माझ्यासाठी नेहमीच प्रिय असशील. तुझा बालमित्र म्हणून मी तुला चांगला ओळखतो. तुला दुसऱ्यांना मदत करायला आवडते पण तिच मदत दुसऱ्यांनी केली तर तू त्याला ओझे समजतेस. आताही तुला ही मदत म्हणजे माझ्या उपकाराचे ओझे वाटेल. पण प्लीज तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यात जमीन-अस्मानाचा फरक झालाय हे तू लक्षात घे. आणि लहानपणापासून मी ही किती जिद्दी आहे हे तुला माहीत आहे. सध्या तुला काय वाटतेय ? यापेक्षा मला तुझी मदत करून तुला या सगळ्यातून बाहेर काढल्याशिवाय शांत बसायचच नाहीये.  मी दिलेले गिफ्ट तुला स्वीकारावाच लागेल. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तुझ्या एकटीचे प्रयत्न पुरेसे नाहीत हे मी पाहिलेल्या परिस्थितीवरून ठामपणे सांगू शकतो. तेव्हा फक्त एकदाच घरच्यांसमोर तू ठामपणे तुझं मत मांड आणि पुढे काहीही होऊ दे मी आणि माझ्या घरचे तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असू. हे फक्त तुझ्या एकटीसाठी तुला करायचं नाहीये. तुझ्यासारख्या असंख्य स्त्रिया या परिस्थितीतून जाताना समाजामध्ये दिसतात की नाही ? मग त्यांच्यासाठी तू आदर्श बन. तुला चुकीचं असं काहीच करायचं नाही. फक्त जे चुकीचं आहे ते सहन करायचं नाही. तुझा निर्णय काही असेल तरी तो मला मान्य असेल. पण मी जे बोलतोय ते तुला पटलं असेल तर त्या बॉक्समधील मोबाईल स्विच ऑफ आहे तो ऑन कर म्हणजे मला कळेल की मी जे बोललो आहे ते तुला पटले आहे. आणि तो फोन नॉट रिचेबल आला तर मी पुन्हा तुझ्या आयुष्यात डोकावणार नाही हे ही अगदी पक्क असेल. 


                                                 - सुयश


सुयशचा शब्दन् शब्द रियाच्या हृदयाला जाऊन भिडला होता. रियाचे डोळे डबडबले होते. रियाने क्षणाचाही विलंब न करता बॉक्समधून मोबाईल काढून ऑन केला. मोबाईल ऑन होतो न होतो तोच सुयशचा कॉल आला. रियाने तो पटकन उचलला.


"हॅलो रिया, थॅंक यू." सुयश आनंदाने म्हणाला.


रियाच्या हुंदक्याचा आवाज ऐकून सुयश नाराजीच्या स्वरात म्हणाला, "काय झालेय रिया ? तू रडतेस का?"


"प्लीज सुयश माझ्या आयुष्यात डोकावणार नाही अस नको म्हणूस. मला माझ्या आयुष्यातील माणसांना गमवायचं नाहीये." रिया रडत -रडत म्हणाली.


"नाही रिया, सॉरी! मी यापुढे हा शब्द कधीच वापरणार नाही. तू डोळे पुस बरं आधी." सुयश म्हणाला.


"हं." म्हणून रियाने डोळे पुसले.


"स्माईल प्लीज." सुयश म्हणाला.


"ऐक ना सुयश , हा फोन का दिलास तू मला ? " रिया म्हणाली.


"चिठ्ठी वाचलीस ना पूर्ण?" सुयश म्हणाला.


"हो वाचली. अरे पण हा कोणाचा फोन आहे?" रिया पुन्हा म्हणाली.


"तुझाच, तुझ्यासाठीच घेतला आहे तो फोन." सुयश म्हणाला.


"पण का?" रिया म्हणाली.


"सांगेन. पण त्यासाठी तुला मला भेटावं लागेल." सुयश म्हणाला.


"कसं शक्य आहे ते ?" रिया घाबरून म्हणाली.


"अगं रिया, तुला जे झाले ते सगळेच विसरायचे आहे नवीन आयुष्याला सुरुवात करायची आहे आणि हे मान्य करूनच तू फोन ऑन केलास हो ना?" सुयश आवाज चढवत म्हणाला.


"हो." रिया दबक्या आवाजात म्हणाली.


"ठरलं तर मग. उद्या आपण शहरात भेटणार आहोत हे लक्षात ठेव. तुला यावच लागेल. तू आलीस की मला याच नंबरवर कॉल कर. झोप आता शांतपणे.बाय. गुड नाईट." सुयश म्हणाला.


रियाने "बाय!"म्हणून फोन कट केला. 


रिया \"उद्या मी कशी जाऊ शकेन शहरात ?\" हा विचार करत झोपी गेली.


सकाळपासून रिया कसलातरी विचार करतेय हे रियाच्या आईच्या लक्षात आलं. न राहून आईने रियाला विचारलं, "काय झालंय रिया? तू टेन्शनमध्ये का दिसतेस? कशाचा विचार करतेस? अजून कोणी काही बोललं का तुला ?" आई काळजीने विचारत होती.


"काही नाही आई." रिया म्हणाली.


"रिया, आई आहे मी तुझी. तुला जरी वाटत असेल आई माझी काहीच मदत करू शकणार नाही, त्यामुळे तिला सांगून तरी काय उपयोग ? पण बाळा, तुझं मन माझ्याशी बोलून नक्की हलकं होईल आणि बघ तुला बरं वाटेल. सांगशील काय झालंय ते?" आईने इतकं समजावल्यावर रिया आईला खरं काय ते सांगायला तयार झाली.


रियाने तिच्या खोलीचा दरवाजा बंद केला. तिने आपल्या आईला सुयशची चिठ्ठी आणि मोबाईल दाखवला. तिला चिठ्ठी आणि मोबाईल कसा मिळाला आणि सुयश काय म्हणतोय हेही सांगितलं. आईने रियाला शहरात जाण्यासाठी तयार हो म्हणून सांगितलं. पण \"आई नेमकं मला शहरात कशी घेऊन जाणार ? घरच्या सगळ्यांना काय कारण सांगणार?\" या प्रश्नाने रियाच्या मनात थैमान घातलं होतं. आईने रियाच्या बाबांना काहीतरी कारण सांगितलं आणि तीही तयार होऊन बाहेर आली. बाबांनी गाडी घेऊन जायला सांगितलं पण "आम्ही बसने जाणार." म्हणून आई हट्ट करू लागली. अखेर बाबांनी परवानगी दिली. आई व रिया गाडीत बसल्या. 


रिया आईला म्हणाली, "आई असं काय कारण सांगितलंस ? की बाबांनी लगेच परवानगी दिली." 


"रिया, मी त्यांना तुला ॲलर्जी झालीय आणि संपूर्ण शरीरावर पुरळ आले आहेत म्हणून सांगितलं." आईच्या या वाक्यावर रिया म्हणाली, "आई, तू खोटं का बोललीस ? उद्या त्यांना खरं कारण कळालं तर काय होईल ? माहितीय  ना तुला." 


"हो. हे मला करावाच लागेल रिया. माझ्या लेकीच्या सुखासाठी. परक्या असणाऱ्या सुयशला मॅडमना तुझी कीव आली आणि मी तर तुझी आई आहे. आयुष्यभर तुझी होणारी घुसमट मला नाही पाहवणार. तेव्हा तू कसलाच विचार करू नकोस. जे होईल त्याला सामोरे जाण्याची तयारी ठेव." आई हिंमत एकवटून म्हणाली.


"हं." म्हणून रियाने आईला मिठी मारली.


रियाने बसमधून खाली उतरताच सुयशला कॉल केला. सुयश गाडी घेऊन रियाला घ्यायला आला होता. रियाच्या आई सुयशसमोर हात जोडून म्हणाल्या, "खूप चांगली माणसे आहात तुम्ही. पण त्या दिवशी मला नाईलाजाने तुम्हांला जा म्हणावं लागलं. माफ करा मला." रियाच्या आईच्या डोळ्यात अश्रू डबडबले होते. 


"अहो काकू, मी माझी माणसं म्हणून मदत करतोय आणि तुम्ही माफी मागून मला परकं करताय." सुयश नाराज होऊन म्हणाला.


"नाही रक्ताच्या नात्यापेक्षाही प्रेमाची नाती श्रेष्ठ असतात. आणि हे नातंही असंच अबाधित राहील कायम." रियाच्या आई विराटच्या डोक्यावरून हात ठेवून म्हणाल्या.


आज कितीतरी दिवसांनी रियाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होतं. 


रिया आणि आई दोघींनाही विराटने गाडीत बसायला सांगितलं. अगदी वार्‍याच्या वेगाने गाडी शहरातल्या प्रसिद्ध हॉटेल "फुड टाऊन" वर पोहोचली.


शहराच्या घाई गर्दीपासून, लोकांनी चढवलेल्या खोट्या मुखवट्यापासून हे हॉटेल अगदी दूर निसर्गाच्या सानिध्यात पक्ष्यांच्या किलबिलाटात , तिथूनच शांत वाहणारी सरिता जणू मानवी मनाचा ताण हलका करू पाहत होती. रियाला या परिसरात तिच्या मनातील असंख्य प्रश्नांची उकल मिळत होती. विचारांवर चढलेला गंज नाहीसा होत होता. कारण हॉटेल ज्या महिलेचं होतं ती ही एक विधवा स्त्री होती हे तिला तिथे गेल्यानंतर समजलं होतं. हॉटेलचं संपूर्ण मॅनेजमेंट किती कौशल्याने ती महिला सांभाळत होती. शिवाय तिच्या चार वर्षांच्या मुलाची जबाबदारीही लीलया पेलत होती. हे तिथे काम करणाऱ्या कामगाराने सांगितले आणि रियाने जणू मनाशी निश्चय केला.\"माझ्याजवळ सगळं आहे मी काहीच गमावलं नाही. मी काहीही करू शकते.\" 


रिया स्वतःहून सुयशला म्हणाली, "सुयश बोल, तू मला इथे का बोलावलं आहेस?"


"तू मुक्तविदयापीठातून तुझं पुढच्या शिक्षण पूर्ण करावं असं मला वाटतं. आज फॉर्मची लास्ट डेट होती म्हणूनच हा फोन मी तुला दिलाय .यापुढे ह्याच फोनद्वारे तुला कॉलेजमधली सर्व माहिती मी पुरवेन. फक्त परीक्षेला तुला हजर राहावे लागेल. बाकी तुझे टिटोरियल वर्क तू घरून लिहून दिलेस तरी मी स्वतः कॉलेजमध्ये जमा करेन." सुयशला म्हणाला.


"हो नक्की. थॅंक्स अगेन सुयश." रिया प्रसन्न चेहऱ्याने म्हणाली.


" मैत्री केलीय ती निभवावी लागणार तेव्हा थॅंक्स किंवा सॉरी असल्या फॉर्मीलिटीज् नकोत." सुयशच्या या वाक्यावर हसून रियाने होकारार्थी मान हलवली. 


"चला लवकर नाश्ता करून घ्या. कॉलेजमध्ये पोहचून ऍडमिशन करायचं ना?" 


"अरे पण मी डॉक्युमेंट फाईल आणली नाहीये." रिया घाबरून म्हणाली.


सुयशने "काकू." म्हणताच आईने रियासमोर फाईल धरली.


"म्हणजे आई तुला माहीत होतं?" रिया म्हणाली.


"हो. काल मॅडमचा मला फोन आला होता. जास्त काही बोलल्या नाहीत पण तुला आणि फाईलला घेऊन शहरात जायची जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली होती. तू सकाळी सुयशची चिठ्ठी दाखवली आणि मला हिंमत आली. घे ही फाईल आणि खूप मोठी हो." आई लेकीच्या गालावरून हात फिरवत म्हणाली.


ते तिघे नाश्ता करून ऍडमिशन करायला कॉलेजमध्ये पोहोचले. ऍडमिशनही अगदी थोड्या वेळात झालं पण गावी जायचा विचार आला आणि पुन्हा रियाचा चेहरा पडला. सगळं निर्विघ्नपणे पार पडलं तरी तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती.


होईल ना सगळं ठीक? काय असेल घरी गेल्यानंतर सगळ्यांची प्रतिक्रिया? का पुन्हा काही प्रश्न उभे राहतील रियासमोर? 


पाहूया पुढील भागात क्रमश:


सौ. प्राजक्ता पाटील.





0

🎭 Series Post

View all