Login

हा खेळ ऊन सावल्यांचा भाग-12

रियाच्या लग्नाला रियाच्या आईचीही परवानगी मिळालीय...सुंदर भविष्याची स्वप्ने घेऊन निघालेल्या रिया आणि सुयशचा विवाह भूतकाळातील कटू आठवणींना दुजोरा देईल ना?



भाग-12



रियाच्या ओठांवर आपला हात ठेवून सुयश म्हणाला,"आईने इतके सांगूनही परत तुझ्या मनात असा विचार कसा आला रिया?" 


"माझ्या ओठांवर आपला हात ठेवून तू मला समजून सांगशीलही, पण माझ्या मनात आलेला हा विचार  इतरांच्या मनात कशावरून आला नसेल?" रिया रडत- रडत म्हणाली.


"अगं रिया, हेच तर आपल्याला लोकांना पटवून द्यायचय. यात मला तुझी साथ हवी आहे. एखाद्या नवर्‍याची बायको मरते तेव्हा तो अपशकुनी ठरत नाही. पण नवरा गेलेली बायको अपशकुनी होते हे कितपत योग्य आहे?


उलट तू होतीस म्हणून कदाचित मोठा अनर्थ टळलाय हे लक्षात ठेव. रिया तू सकारात्मक विचार करत राहिलीस तरच आपलं आयुष्य आईबाबांसारखं सकारात्मक होईल आणि यापुढे एकदाही तू स्वतःला दोष देणार नाहीस असं मला वचन दे." सुयश रियाला समजावून सांगत होता. 


रियाने होकारार्थी मान हलवली.


सुयश रियाला गौरीच्या सामानाच्या खोलीत इतर कुरवल्यानसोबत बसायला सांगून गौरीकडे आला.


संकपाळ मॅडम आणि रियाच्या आई बोलत होत्या.  डॉक्टरांनी आत बोलावल्यावर मॅडम गौरीच्या खोलीत गेल्या. गौरी शुद्धीवर आली होती. 


"डॉक्टर काय झालं माझ्या गौरीला?" मॅडम घाबरून म्हणाल्या. 


"घाबरण्यासारखं काही झालेलं नाही. बहुतेक त्यांनी सकाळपासून काहीही खाल्लेलं नाही. त्यांना आधी मीठ, पाणी आणि साखर द्या बरं. आणि त्यांच्या भोवती गर्दी करणे कटाक्षाने टाळा. थोडा वेळ आराम करू द्या त्यांना. येतो मी." म्हणून डॉक्टर जायला निघाले. सुयश डॉक्टरांना सोडवायला गेला. मॅडमनी बाहेर डोकावून पाहिले तर स्वतः गौतम गौरीसाठी ग्लासात काहीतरी घेऊन आला होता.


"गौतम, गौरीला डॉक्टरांनी फक्त मीठ आणि साखर घालून पाणी द्यायला सांगितले आहे. " मॅडम म्हणाल्या.


"हो आई, मी ऐकले ते. म्हणूनच मी फक्त मीठ आणि साखर घातलेलं पाणी घेऊन आलो आहे." गौतम मॅडमना म्हणाला. 


"हो का. दे ना मग. तूच दे." मॅडम बाजूला सरकत म्हणाल्या.


"किती प्रेम करतायेत जावईबापू आपल्या गौरीवर. खरंच मुलांचं जीवन आनंदी असेल तर आईवडिलांना समाधान वाटतं. माझ्या रियाच्याच नशीबात हे सर्व का घडलं असेल कुणास  ठाऊक ?" आई गंभीर झाली होती.


मॅडमही एका लेकीच्या आई असल्यामुळे त्यांना रियाच्या आईचं दुःख चांगलं कळत होतं. त्या म्हणाल्या, "एका मुलीची आई म्हणून मी तुमचं दुःख समजू शकते पण रियाचं यापुढील जीवन सुखी करण्यासाठी तुम्ही योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे असे मला वाटते." 


"मॅडम मी माझ्या रियाच्या सुखासाठी घराचा त्याग केलाय. हा निर्णय घेताना कितीतरी गोष्टींना माझ्या लेकीसाठी तिलांजली दिलीय.यापेक्षा मोठा आणि योग्य निर्णय काय असेल?" 


"तुम्ही अजून एक मोठा निर्णय घ्यावा ही मी तुम्हांला हात जोडून विनंती करतेय. " मॅडम रियाच्या आईसमोर हात जोडून उभ्या राहत म्हणाल्या.


मॅडमचा हात हातात घेऊन रियाच्या आई म्हणाल्या," मॅडम तुम्ही हात नका जोडू. तुम्ही जो निर्णय घ्यायला सांगाल तो  माझ्या रियाच्या भल्यासाठीच असेल. सांगा मी काय करायला हवंय?"


"माझा सुयश रियावर जीवापाड प्रेम करतोय. तो रियाशी लग्न करणार आहे. रियाही तयार झालीय मी तिला समजावल्यावर.  आता तुम्हीही होकार द्यावा आणि रियाच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा निर्णय घ्यावा अशी माझी इच्छा आहे."मॅडम रियाच्या आईला म्हणाल्या.


"काय? हे कसं शक्य आहे मॅडम? म्हणजे आज रिया ज्या परिस्थितीतून जातेय त्याबद्दल सहानुभूती असणं वेगळं आणि रियासोबत लग्न करणं वेगळं ना मॅडम. सुयशला नंतर या गोष्टीचा पश्चाताप होईल हो जेंव्हा लोक त्याला काहीही बोलतील. असं नाही होऊ शकत." रियाच्या आईच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते.


गौरीजवळ गौतम आहे ही खात्री झाल्यावर मॅडम रियाच्या आईला कार्यालयाच्या मागे असलेल्या गार्डनमधील बेंचवर बसून बोलूया म्हणाल्या. दोघीही बेंचवर बसल्या होत्या. तितक्यात तिथे श्रेया आणि उमाही आल्या. त्यांनाही बसायला सांगून मॅडम म्हणाल्या," मला असं वाटतंय की, आयुष्यभर तुम्ही रियाची सावली बनून राहिलात तरी तिचा स्वतःचा संसार, तिचा सोबती यामध्ये तिला जे सुख मिळेल ते बघताना तुम्हांला जे समाधान लाभेल ते खूप खास असेल.शिवाय रिया स्वतःच्या पायावर उभी राहून हे सर्व सुयशच्या साथीने करू शकेल आणि यासारखा दुसरा आनंद नसेल. यातच आपल्या मुलाचं भलं असेल.तुम्ही विचार करून तुमचा निर्णय मला सांगावा असे मला वाटते."


"मॅडम तुम्ही जे म्हणताय ते बोलायला खूप मोठ मन लागतं  जे तुमच्याकडे आहे. एक विधवा सून म्हणून स्वीकारणाऱ्या देवी आहात तुम्ही. तुमच्यासारखी माणसं मिळायला नशीब लागतं.पण मॅडम असे करून समाज काय म्हणेल? पुढील आयुष्यात सुयशला कितीतरी प्रश्नांना सामोरे जावे लागेल त्याच काय?"


"अहो रिया आता जे आयुष्य जगत आहे ते जगताना खऱ्या अर्थाने तिला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. सुयशसोबत असेल तर तिच्या आयुष्यातील समस्या आपोआप कमी होतील याची मला पूर्ण खात्रीय कारण रियासारखी मी ही एक विधवा म्हणून जीवन जगलेय." मॅडमच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले.


"काय?" रियाच्या आई घाबरून म्हणाल्या.


"हो. रियालाही मी सगळं खरं सांगितल्यावर ती लग्नाला तयार झालीय."मॅडमनी रियाच्या आईला त्यांच्या भूतकाळाबद्दल सगळं सांगितलं. रियाच्या आईच्याही डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला.


"माझा निर्णय झालाय. सुयश मला माझा जावाई म्हणून मान्य आहे. माझ्या रियाच्या सुखातच माझं सुख आहे. तुम्ही म्हणताय ते मला पटलय . लोक सगळ्या बाजूने बोलतात तेंव्हा मी यापुढे कोणाचाही विचार करणार नाही. माझ्या रियाला तुमची सून म्हणून स्वीकारा अशी मी तुम्हांला हात जोडून विनंती करतेय." आता रियाच्या आईनी हात जोडून मॅडमना विनवणी केली.


"तुम्ही असे हात नका जोडू. रियाही माझ्या गौरीसारखी माझी लेकच असेल. लवकरच आपण रिया आणि सुयशला लग्नासारख्या पवित्र बंधनात अगदी जन्मोजन्मीच्या नात्यात गुंफू या." मॅडम रियाच्या आईचा हात हातात घेऊन म्हणाल्या.  


"हो मॅडम. तुमचे उपकार या जन्मी तरी फिटणे अशक्य आहे." रियाच्या आई मनापासून आभार व्यक्त करत होत्या.


"खरं सांगू तोच व्यक्ती एखाद्या व्यक्तीला समजून घेऊ शकतो जो स्वतः त्या परिस्थितीतून गेलेला असतो त्यामुळे रियाची आणि आई म्हणून तुमचीही चिंता, मानसिक ताण माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला कळणार? सुयशच्या बाबांमुळे माझ्या जीवनाला अर्थ प्राप्त झाला आणि मला आनंद आहे की, माझा सुयशही अगदी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत रियाच्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देतोय." मॅडम म्हणाल्या.


तितक्यात गौरी आणि गौतम बाहेर आले होते.


"काय आई ? कसल्या गप्पा मारत आहात?" गौरी म्हणाली.


"अगं आनंदाची बातमी आहे. लवकरच रिया तुझी वहिनी म्हणून आपल्या घरी येणार आहे. म्हणजे रियाच्या आईनी सुयश आणि रियाच्या लग्नाला होकार दिलाय." मॅडम गौरीकडे पाहत हसून म्हणाल्या.


"खरंच. इतकी आनंदाची बातमी सांगितल्यामुळे, बघ ना मला जणू ऊर्जा मिळालीय. आई माझा थकवा कुठल्या कुठे पळून गेलाय." हे सर्व बोलताना गौरीच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. 


"काय म्हणतेय पेशंटची तब्येत?कशामुळे गेला बरं थकवा? नाही म्हणजे सहज माझ्या कानावर आलं म्हणून विचारलं. मी मगाशी गौरीला चक्कर आलीय समजल्यावर येत होते पण गौतम मला म्हणाला डॉक्टर म्हणालेत पेशंटजवळ गर्दी करू नका म्हणून थांबले." गौरीच्या सासुबाई गौरीजवळ येत म्हणाल्या.


सगळ्यांचे चेहरे चिंताग्रस्त दिसत होते. त्यांचे चेहरे बघून गौरीच्या सासुबाई पुन्हा म्हणाल्या, "इतका अवघड प्रश्न विचारला का मी?"


"नाही म्हणजे काय आहे ? सुयशला गौरीची मैत्रिण रिया लहानपणापासून आवडत होती आणि आता तर रियाच्या आईनेही सुयश आणि रियाच्या लग्नाला परवानगी दिली आहे ही बातमी गौरीला सांगितल्यावर तिचा थकवा गेला असं ती म्हणत होती." थोड्याशा हळू आवाजातच मॅडम म्हणाल्या.


"मग ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. रियाचा भूतकाळ मला माहित आहे म्हणून मला काय वाटेल ? हा विचार करून तुमच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटले हो ना? पण मलाही खूप आनंद झालाय. एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यासारखे दुसरे पुण्याचे काम नसते. माझा मुलगा मी एसीपी केलाय तो समाजसेवेसाठीच. सुयशने घेतलेला हा निर्णय समाजाच्या हिताचाच आहे जो मला मनापासून आवडला.लवकरच दोघांचा विवाह निर्विघ्नपणे पार पडू दे हिच आई जगदंबेकडे प्रार्थना." गौरीच्या सासूबाई परखडपणे बोलत होत्या. 


गौरीच्या सासूबाईंच्या म्हणण्याप्रमाणे रिया आणि सुयशचा विवाह निर्विघ्नपणे पार पडेल ना? सुंदर भविष्याची स्वप्ने घेऊन निघालेल्या रिया आणि सुयशचा विवाह भूतकाळातील कटू आठवणींना दुजोरा देईल ना? 


पाहूया पुढील भागात क्रमशः


सौ.प्राजक्ता पाटील






0

🎭 Series Post

View all