Login

हा खेळ ऊन सावल्यांचा भाग-13

नवीन नात्यांची वीण अधिक घट्ट करण्यासाठी गौतम आणि त्याच्या घरच्यांचे प्रयत्न..

भाग 13



"आई रिया कुठे आहे ग? मी मगाशी चक्कर आल्यावर खाली पडता-पडता रियामुळेच वाचले." गौरी संकपाळ मॅडमना म्हणाली.


"हे बघ आम्ही आलो तुझ्या लाडक्या मैत्रीणीला घेऊन." संकपाळ सर गौरीला म्हणाले.


रिया आणि सुयशला सोबत पाहून गौरीने दोघांना मिठी मारली.


"अगं हळू गौरी." संकपाळ सर गौरीला म्हणाले. 


"तुम्हाला माहितीय बाबा, जेव्हापासून रियाच्या आईनी रिया आणि दादाच्या लग्नाला परवानगी दिलीय ही बातमी मी ऐकलीय तेव्हापासून मला खूप फ्रेश वाटतंय सगळा थकवा जणू दूर झालाय." गौरी संकपाळ सरांना म्हणाली.


"अरे व्वा! खरंच ही तर खूप आनंदाची बातमी आहे. दोन्ही मुलांना त्यांच्या अनुरूप जोडीदार मिळाले आणि ते दोघे आनंदी आहेत यापेक्षा समाधानाची गोष्ट आई-वडिलांसाठी दुसरी कोणतीच नसते." संकपाळ सर आनंदाश्रू पुसत म्हणाले.


"अगदी खरंय. माझ्या गौरीची आता पाठवणी करावी लागेल या विचाराने एका डोळ्यातून दुःखाचे अश्रू तर सुयश व रियाच्या लग्नाला रियाच्या आईचा होकार मिळाला म्हणून दुसऱ्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत आहेत." रिया आणि गौरीला जवळ घेत संकपाळ मॅडम म्हणाल्या.


"तुम्ही गौरीची नका काळजी करू. सासर म्हणजे तिचं दुसरं माहेर असेल आणि हे ती तुम्हांला स्वतः सांगेल."  गौतमच्या आई म्हणजे गौरीच्या सासूबाई म्हणाल्या. 


"हो आई, गौरीची तुम्ही काही काळजी करू नका फक्त सुयश आणि रियाच्या लग्नाची तारीख मात्र लवकर काढा. काय सुयश बरोबर बोलतेय ना मी?" गौतम स्मितहास्य करत म्हणाला.


सुयशनेही स्मितहास्य केले.


"हो. हो. लवकरच सुयश आणि रियाही लग्नाच्या रेशीम बंधनात अडकतील." मॅडम म्हणाल्या.


"मी उद्याच गुरुजींकडे जाऊन शुभ मुहूर्त बघतो." संकपाळ सर उत्साहाने म्हणाले.


रियाच्या आई मनापासून देवाचे आभार मानत होत्या. 'माझ्या रियाच्या आयुष्यात इतकं सारं घडून गेलं होतं की पुन्हा तिच्या आयुष्यात सुख येईल की नाही ? अशी भिती वाटत होती. पण परमेश्वरा तू थोडा वेळ जाऊ दिलास आणि माझ्या रियाच्या जीवनात सोन्यासारखी माणसे आणि सुयशसारखा जोडीदार घेऊन आलास. आता मी डोळे मिटायलाही मोकळी झाले.' रियाच्या आई मनात विचार करत डोळ्यातून वाहणारे आनंदाश्रू पुसत होत्या.


रिया आईजवळ गेली आणि आईला म्हणाली, "काय झालंय आई ? तू कसला विचार करतेय?"


"काही नाही रिया. मॅडम आणि सुयशनी तुला स्वीकारल्यामुळे मला असं वाटतंय आता भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुझ्याकडे बघूनच सर्वांना कळेल बघ." आई रियाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली. 


"हो आहेच माझी सून भाग्यवान." मॅडम रियाकडे पहात म्हणाल्या.


सर्व पाहुणेमंडळी तसेच मित्रमंडळींचे जेवण झाले होते. आता नवरी आणि नवरदेवासोबत घरचे मात्र जेवायचे थांबले होते. कार्यालयातील व्यक्ती नवरदेव, नवरी आणि घरच्या सर्वांना जेवणाची ताटे तयार आहेत म्हणून जेवायला बोलवायला आला होता.सर्वजण जेवणाच्या हॉलकडे जायला निघाले. गौरीचा हात पकडून गौतम निघाला होता.  सर्वजण अगदी प्रसन्न चेहऱ्याने त्यांच्यामागून हॉलमध्ये पोहोचले. कितीतरी सुंदर फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. टेबलही रंगीत फुलांच्या सुंदर रांगोळ्यानी सजले होते. नवरा-नवरी आणि विहीनबाईंचे ताट तर दिमाखात वेलकम म्हणत होते. त्यातच हॉलवरील वेटर ज्यांनी ही सजावट केली ते नवरदेवाकडे शगुन मागू लागले .


क्षणाचाही विलंब न करता गौतमने त्यांच्या हातात पैसे दिले. गौरी गौतमकडे पाहून म्हणाली, "अरे इतकी नव्हते मागितले त्यांनी पैसे."


"अगं हो, पण कष्टाचे मागितले होते न. मग झालं तर. गरजूंना मदत केल्यासारखे दुसरे पुण्य नसते. तुला माहितीय माझ्या हातून मदत करून शक्य तितक्या लोकांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करण्याचा माझा अट्टाहास असतो. म्हणूनच मी मंदिरात दान किंवा देणग्या कधीच देत नाही पण गरजूंना अवश्य मदत करतो.तुझा विश्वास बसेल किंवा नाही हे मला माहीत नाही पण आज माझी बायको माझ्यासोबत अगदी सुखरूप आहे हे या सगळ्यांच्या आशिर्वादाचेच फळ आहे." गौतमच्या या वाक्यांनी गौरी चांगलीच प्रभावित झाली होती.


"का नाही ठेवणार मी तुझ्यावर विश्वास ? मलाच काय पण माझ्या घरच्यांनाही आवडते गरजूंना मदत करायला. त्यामुळे मंदिरात पैसे दान केल्याने देव पावतो का नाही ? ते मला माहित नाही पण संकटात असणाऱ्यांना मदत केल्यावर आत्मिक समाधान लाभते आणि त्याच्या जोरावर आयुष्यात कितीही मोठे संकट आले तरी त्या संकटातून बाहेर पडता येते हे नक्की." आता गौरी जे बोलत होती त्यामुळे गौतम चांगलाच प्रभावित झाला होता.


"वॉव हाऊ लकी आय ॲम! किती सेम आहेत ना आपले विचार. " गौतम सहजच बोलून गेला.


"एस्स. मी टू सो लकी! जसा जोडीदार मला हवा होता तू अगदी तसाच आहेस. " गौरी म्हणाली.


दोघेही जेवण न करता नुसते गप्पा मारत होते. आणि सगळे त्यांच्याकडे पहात होते याची त्यांना जराही खबर नव्हती.


बराच वेळ झाला तरी यांच्या गप्पा संपत नाहीत हे पाहून सुयश आणि रिया एका आवाजात म्हणाले,"आधी जेवण करा मग हव्या तेवढ्या गप्पा मारा." त्या दोघांच्या आवाजाने गौतम आणि गौरीनी सगळ्यांकडे पाहिले.  सगळेजण हे दोघे एकमेकांना कधी घास भरवतात म्हणून न जेवता या दोघांकडे पाहत बसले होते.


"अरे तुम्ही का थांबलात? करा ना जेवायला सुरू." गौतम म्हणाला.


"अरे गौतम, नवरा-नवरीनी एकमेकांना घास भरवल्याशिवाय आम्ही कसे जेवणार ? ही रीत आहे पूर्वीपासून चालत आलेली." गौतमची आई गौतमला म्हणाली.


"असंय होय ? हे बघ लगेच भरवतो गौरीला." असं म्हणून गौतमने चमच्याने गौरीला गुलाबजाम भरवला. 


" आ..आवाज काढून गौतम गौरीला म्हणाला," अगं आता मलाही भरव ना."


" खूप भूक लागलीय वाटतं?" गौरी गुलाबजाम खात म्हणाली.


"तुला पाहून माझं पोट भरलं असतं पण जोपर्यंत आपण एकमेकांना घास भरवत नाहीत तोपर्यंत घरचेही जेवण करणार नाही ना म्हणून म्हणतोय." रोमॅन्टिक मूडमध्ये गौतम म्हणाला.


गौरीने स्मितहास्य केले. सर्वांनी जेवायला सुरुवात केली. जेवणे आटोपली तशी नवरीची पाठवणी करायची तयारी सुरू झाली.सर्व मुलींच्या आयुष्यात तो प्रसंग येतोच ज्यावेळी तिच्या एका डोळ्यातून आनंदाचे तर दुसऱ्या डोळ्यातून दुःखाचे अश्रू ओघळतात. नवीन घरात पाऊल ठेवताना असंख्य प्रश्न तिच्या मनात काहूर माजवतात शिवाय आई-वडिलांना आपल्या परिवारातील सदस्यांना सोडून जातानाचा तो प्रसंग पाहून उपस्थित असणाऱ्या सर्वांचेच डोळे पाणावतात. गौरीही आईबाबांच्या गळा


पडून मोठ्याने रडू लागली. सगळ्यांचे डोळे पाणावले होते. गौतमच्या आईही याला उपवाद नव्हत्या. डोळे पुसत त्या गौरीला म्हणाल्या, असं रडत येणार आहेस का तू आपल्या घरी लक्ष्मी बणून?"


"हो गौरी, डोळे पुस बरं आधी.अगं तू खूप नशीबवान आहेस की तुला इतके प्रेमळ सासू-सासरे आणि इतका समजूतदार नवरा मिळालाय." गौरीचे बाबा अगदी काळजावर दगड ठेवून बोलत होते.


"आणि तुला कधीही तुझ्या माहेरची आठवण आली तर तू येऊ शकते तुझ्या माहेरी." गौतमचे बाबा मोठ्या मनाने आपल्या सुनेला गौरीला म्हणाले.


"अहो बाबा, मी तिला इतका सुखात ठेवीन की तिला माहेरची आठवणच नाही येणार ." गौतम म्हणाला.


सगळेजण मोठ्याने हसले. सुयश मात्र गंभीर उभा होता.त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. त्याला आपल्या एकुलत्या एका बहिणीची पाठवणी करताना गहिवरून आले होते. लहानपणापासून तीच तर होती त्याची सगळ्यात जवळची मैत्रीण. जिच्याशी थोडावेळही अबोला धरणे सुयशला असह्य होते.आणि आज ती कायमची आपले घर सोडून जाणार. सुयश या विचाराने उदास झाला होता. गौतमचे लक्ष सुयशकडे गेले.


"अरे सुुयश आता तू का असा उदास दिसतोयस ?" गौतम सुयशच्या पाठीवर हात ठेवून म्हणाला.


"लहानपणापासून आजवर कुठेही गौरी एकटी गेली नाही. सहल असो की खेळ सतत मी तिची काळजी घेण्यासाठी तिच्या मागे उभा असायचो पण आज मी तिच्यासोबत नाही. ती एकटी जातीय आमच्यापासून दूर…" सुयश हुंदका देत रडू लागला.


"अरे भाऊ म्हणून मी तुझ्या भावना समजू शकतो. पण ती एकटी कुठेय मी आहे ना तिच्यासोबत आयुष्यभर. आता फरक एवढाच आहे तू मागे उभा राहून तिचं रक्षण करायचास मी सोबत राहून तिला कधीच त्रास होऊ देणार नाही." असे गौतम बोलल्यावर सुयशने गौतमला प्रेमाने मिठी मारली.


नव्याने गुंफलेल्या या नात्यांची वीण अधिक घट्ट होत होती. फुलांनी सजलेली गाडी "दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे.." हे स्टिकर लावून तयार होती.


गौतमचे काका- काकू, मामा-मामी, मावशी-काका सर्वजण पुढे गौतमच्या घरी गेले होते. त्यांनी नवीन सुनेच्या गृहप्रवेशची जय्यत तयारी केली होती.


कशी असेल नवीन सुनेच्या गृहप्रवेशची तयारी ?


काय- काय असतील गौरीला खुश ठेवण्यासाठीचे गौतमचे प्रयत्न?


पाहूया पुढील भागात क्रमशः


सौ. प्राजक्ता पाटील





0

🎭 Series Post

View all