भाग-14
सासूबाईंनी समजावल्यानंतर गौरीने डोळे पुसले खरे परंतु मनातून मात्र आईबाबा आणि सुयशदादासोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणाच्या आठवणी तिच्या डोळ्यासमोर तरळत होत्या. पण त्यासोबतच गौतमतचा धीर देणारा हात गौरीला नवीन घरात प्रवेश करताना आधार वाटत होता. नववधूवराला घरी न्यायला आलेली गाडी पानाफुलांनी आणि इतर सजावटीने सज्ज झाली होती. फुलांचा मनमोहक सुगंध मनाला भुरळ घालत होता. गाडीतील ते प्रसन्न वातावरण आणि मागे बसलेले हे दोघे.
"हा प्रवास असाच आयुष्यभर असावा ज्यामध्ये आपण दोघे सतत सोबत असू." गौरी गौतमला म्हणाली.
"हो गं नक्की.आणि आता परत तुझ्या डोळ्यात अश्रू कधीच दिसणार नाहीत हा शब्द आहे एका पोलीस ऑफिसरचा." गौतम हसून म्हणाला.
गौरी आणि गौतम एकमेकांसाठीच बनले होते म्हणूनच तर इतका चांगला बॉन्ड दोघांत दिसत होता.
इकडे गौरीची कमी आईबाबांबरोबर इतरांनाही जाणवत होती. आईबाबा थकलेले दिसत होते. "लग्न पहावे करून.." ती म्हण अगदी सार्थ आहे हे सुयशच्या ही ध्यानी आले होते. एक दिवसाचे लग्न पण आधीपासून किती तयारी करावी लागते. आईबाबांचा मूड ठीक करण्यासाठी सुयश सगळ्यांसाठी गरमागरम कॉफीची ऑर्डर देऊन आला होता. त्या कॉफीला पाहताच मॅडमचे डोळे पुन्ह पाणावले.
"अगं आई आता काय झाले तुला डोळ्यात पाणी आणायला?" सुयश मॅडमजवळ जात म्हणाला.
"काही नाही रे. गौरी जेंव्हाही थकलेली असायची तेंव्हा तिला माझ्या हातची कॉफी घेतल्यावरच फ्रेश वाटायचे पण आता तिथे सासरी तसे नसेल ना म्हणून वाईट वाटतेय पण करेल माझी लेक सगळं मॅनेज." अस म्हणून मॅडमनी डोळे पुसले.
"तुला खात्रीय ना की आपली गौरी सगळ्यांना आपलेसे करेल ?" मॅडमनी होकारार्थी मान हलवली."झालं तर मग. तू नको डोळ्यात पाणी आणू." सुयश म्हणाला.
"हो अगं, सुयश अगदी बरोबर बोलतेय. आपली गौरी खूप समजूतदार आणि शहाणी आहे तिच्या आईसारखी. कधीच आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होऊ द्यायची नाही." संकपाळ सर मॅडमना म्हणाले.
मॅडमनी होकारार्थी मान हलवली. रिया, तिची आई आणि उमा मावशीच्या घरचे घरी जातोय म्हणून मॅडमना सांगण्यासाठी आले. मॅडमनी उपस्थित असलेल्या सर्वांसाठी आणलेले गिफ्ट रियाकडून सर्वांना दिले. मॅडमही गावी पोहोचल्या पण तिथे जे घडले त्याची कल्पना स्वप्नातही संकपाळ कुटुंबीयांनी केली नव्हती. मॅडमची गाडी पाहताच लोक गावच्या रस्त्यावर साखळी करून उभे राहिले होते.संकपाळ कुटुंबीयांचे सर्व गावकऱ्यांशी सख्य होते. पण आज ही लोकं आपल्याशी अशी का वागत आहेत? हेच त्यांना कळत नव्हते. इतकी वर्ष ज्या गावात नोकरी केली पण कोणाचेही नावे ठेवून घेतले नाही आज त्याच गावातले ग्रामस्थ आपल्यावर का नाराज झालेत? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी सर्वजण गाडीतून खाली उतरले. सरांनी गावकऱ्यांपुढे विनम्रपणे हात जोडले व ते सर्वांना उद्देशून म्हणाले, "आमची गाडी पुढं न जाऊ देण्याचे कारण आम्हाला कळेल का ? का अडवला आहे तुम्ही आमचा रस्ता?" तितक्यात रियाचे बाबा समोर येत म्हणाले, "गुरुजी आमचा आणि तुमचा काही वाद नाही. तरीही तुम्ही आमच्या खाजगी आयुष्यात खूपच दखल देत आहात. माझी लेक ,बायको घर सोडून गेली ती केवळ तुमच्या पाठिंबामुळेच. त्यामुळे या गावात मी जिवंत असेपर्यंत तुम्हाला प्रवेश मिळणे शक्य नाही. आल्या पावली तुम्ही परत गेलात तरच बरे होईल अन्यथा मी काय करू शकेल हे तुम्हांला माहीत नाही."
"अच्छा ! तर हे सगळं तुम्ही केले आहे. आम्ही पाठिंबा का दिला ? कारण तुम्ही तिचा पाठिंबा काढून घेतला. बाप म्हणून तुम्ही तिच्या मागे खंबीरपणे उभे राहिला असतात तर आम्ही तुमच्या खाजगी गोष्टी काहीच लक्ष दिले नसते." मॅडम आवाज चढवून म्हणाल्या.
"मॅडम तुम्ही आवाज खाली घ्या. आजवर मला कुणी बाई माणूस इतक्या मोठ्या आवाजात बोललेले नाही आणि तुम्ही बोललेले मी खपवून घेणार नाही. उद्या गावात रियासारखं जर कोणाला विधवेचं जीणं नशीबी आलं तर तुम्ही सगळ्या मुलींना घरात ठेवून घेणार आहात की काय?" रियाचे बाबा तावातावाने म्हणाले.
"काय बोलताय हे ? देव न करो आणि अशी वेळ गावात इतर कोणावरही येवो. तुम्ही स्वतःच्या मुलीचे दुःख समजू शकला नाहीत इतरांच्या मुलीचे काय समजणार?" मॅडम हताश होऊन म्हणाल्या.
"मॅडम तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही आहोत सगळे. या तुम्ही." दहा-पंधरा तरुण मुलं रस्त्यावरील लोकांना बाजूला करत संकपाळ कुटुंबीयांना वाट मोकळी करून देत होते.
तेवढ्यात गावातील एक व्यक्ती समोर येत म्हणाला,"तुमचं ज्ञान तुमच्याजवळ ठेवा मॅडम. पण या गावात तुम्ही पुन्हा प्रवेश करायचा नाही. तुम्ही गावात आलात की नक्कीच गावातल्या लोकांची डोके फुटणार बघा."
सुयश रागाने पुढे सरकला. संकपाळ सरांनी त्याच हात पकडून डोळ्यांनीच सुयशला शांत राहायला सांगितले.
संकपाळ सर पुढे होत म्हणाले, "म्हणजे तुमचं सगळं ठरलं आहे तर. आमची काहीही चूक नसताना आम्ही गावात आल्यावर जर गावात वादविवाद होणार असतील तर आम्ही आल्या पावली परत जातो." सुयश आणि मॅडमच्या कपाळावर आठ्या उमटल्या. पण संकपाळ सरांनी घेतलेला निर्णय त्यांनी मान्य केला. स्वाभिमानी असलेले संकपाळ सर जाताना गावकऱ्यांना उद्देश म्हणाले, "आम्ही जाण्याने जर तुम्हाला आनंद होत असेल तर जाऊ आम्ही. पण यापुढे कधीही कोणत्या निर्दोष व्यक्तीला विनाकारण त्रास देऊ नका कारण प्रत्येक वेळी तुमच्यासमोर संकपाळ सर आणि त्यांचे कुटुंबीय नसतील."
संकपाळ कुटुंबीय गाडीत बसून पुन्हा शहरात आले. आज गौरीच्या पाठवणीनंतर त्यांना ह्या गोष्टींमुळे अधिकच भरून आले. आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करायचे होते.गावाकडचा तो बंगला ,गावातल्या कितीतरी आठवणींना तिलांजली द्यायची होती. हे सर्व खूप कठीण होतं.सगळ्यांचे डोळे पाणावले होते.
तितक्यात सुयशचा फोन वाजला. सगळेजण भानावर आले. "आई रियाचा फोन आहे. नक्कीच आपण पोहोचलो का हे विचारण्यासाठी तिने फोन केला असेल.काय सांगू तिला आता मी ? तिच्याच वडीलांमुळे आपल्याला बेघर व्हावे लागले म्हणून कसं सांगू?" सुयश नाराज होऊन म्हणाला.
"अरे वेडा आहेस का तू? तू तिला असलं काहीच सांगणार नाहीस. अरे ती किती हळवी आहे तुला माहितीये ना? सगळा दोष स्वतःला देत बसेल. आत्ता कुठे ती स्वतःला सावरतेय परत हे सगळे ऐकून कोमेजून जाईल." मॅडम सुयशला समजावत होत्या.
"हो सुयश तुझी आई बरोबर बोलतेय. जी गोष्ट समजल्यावर रियाला दुःखच होणार आहे तर ती गोष्ट तू तिच्यापासून लपूनच ठेवावी असंच मलाही वाटतं." बाबा सुयशला म्हणाले.
"पण बाबा आज ना उद्या ही गोष्ट रियाला कळणारच ना ? तेव्हा काय वाटेल तिला?" सुयश पुन्हा म्हणाला.
"तेव्हाचे तेव्हा पाहता येईल. पण आता तू तिच्याशी काही घडलंच नाही असाच बोल. फोन स्पिकरवर टाक." मॅडम म्हणाल्या.
"बरं." म्हणून सुयशने रियाचा फोन घेतला.
"हॅलो सुयश, अरे किती कॉल करतेय तुला मी मगाचपासून. तू कामात आहेस का?" रिया म्हणाली.
मॅडमनी मानेने हो म्हण म्हणून सांगितले.
"हो अगं रिया, जरा कामात होतो. तू बोल ना." सुयश म्हणाला.
"काही नाही रे व्यवस्थित घरी पोहोचलात का?" म्हणून सहज फोन केलेला." रिया म्हणाली.
परत हो म्हण असे मॅडमनी मानेने सांगितले.
"हो पोहोचलो घरी." सुयशचे डोळे डबडबले होते.
मॅडमनी सुयश कडून फोन घेतला आणि त्या म्हणाल्या, "बोल रिया काय म्हणतेस?"
"सॉरी मॅडम मी खूप उशीरा फोन केला ?" रिया घाबरून म्हणाली.
"अगं सुयश तुझा होणारा नवरा आहे तेव्हा तू त्याला कधीही फोन करू शकतेस. पण सुयशचे बाबा उद्या तिथे आल्यावर गुरुजींना भेटून तुम्हा दोघांच्या लग्नाचा मुहूर्त काढणार आहोत सुयश तुला घ्यायला येईल.तेव्हा तू ही तयार होऊन बस आपल्याला जरा बाहेर जायचे आहे हेच सांगण्यासाठी घेतला मी फोन. बोलायचे आहे का तुला सुयशशी काही?" मॅडम म्हणाल्या.
"नाही मॅडम उद्या बोलेन मी त्याच्याशी. गुड नाईट मॅडम." रिया म्हणाली.
"हो, हो, गुड नाईट.ठेवते मी आता फोन." म्हणून मॅडमनी फोन ठेवला.
"सुयश बँकेच्या लॉकरची चावी आहे का तुझ्याकडे ? बँकेच्या पासबुकमधली रक्कम नाही ना काढलेली ?" मॅडम म्हणाल्या.
गौरीच्या लग्नातील सर्व पैसे दागिने लॉकरमध्ये ठेवले असल्यामुळे सुदैवाने सुयशकडे बँकेच्या लॉकरची चावी होती.
" नाही. काय खरेदी करायचे आहे आई?" सुयश म्हणाला.
"ते मी उद्या सांगेन." मॅडम म्हणाल्या.
काय असेल मॅडमची उद्याची खरेदी? रिया ते सर्व स्विकारेल का? किती दिवस रियापासून तिच्या वडिलांचे सत्य लपून राहील?
सौ. प्राजक्ता पाटील
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा