Login

हा खेळ ऊन सावल्यांचा भाग-16

"कसे असेल रिया आणि सुयशचे लग्न?" 

भाग-16


सगळेजण गौतमच्या आईची काय प्रतिक्रिया असेल ? म्हणून त्यांच्याकडे पाहत होते. गौतमच्या आई त्यांच्या चुलत सासूबाईंना म्हणाल्या, " हे बघा माणसाने एखाद्या व्यक्तीमधलं चांगलं शोधलं की चांगलं सापडतं. सकाळपासून गौरी सगळ्यांचा मानपान ठेवत होती.  जातानाही आदराने सगळ्यांच्या पाया पडली असे नाही की उठून ती तडक तिच्या आईला भेटायला गेलीय. आणि गेली असती तरी मला काहीच वाटले नसते आम्ही तिला आधी सांगितले होते की, ती तिच्या माहेरी कधीही येऊ जाऊ शकते. इतकी वर्ष आईबाबांजवळ राहिलेली पोर एका दिवसात माहेरला पोरकी झाली का? लेक आहे आठवण तर येणारच त्यांनाही आणि तिलाही. मग ती भेटायला गेलीय याचे मलातरी काहीच वाटले नाही आणि तुम्हीही काही मनात आणू नका."


सगळ्यांना गौतमच्या आईचे कौतुक वाटले. चुलत सासूबाईंनी जरा नाक मुरडले आणि त्या बाहेर हॉलमध्ये जाऊन बसल्या. 


गौतमने सुयशला फोन केला. "आम्ही दोघे येतोय." हे ऐकल्यावर सुयश थोडावेळ गप्प बसला. त्याला आनंद झालेला नाही यावरून गौतमला काहीतरी घडलंय याची जाणीव झाली. थोडा वेळ विचार करून सुयश म्हणाला,


"हो का बरं. पण गावाकडे नका जाऊ. लॉजवरच या." 


"नाही लॉजवर कशाला? तुमचे काही काम असेल तर ते करून या तुम्ही. आम्ही आईबाबांना भेटतो तोपर्यंत." गौतम म्हणाला.  


गौतमच्या या वाक्यावर सुयश घाबरून म्हणाला, "नाही नको. गावाकडे नकाच जाऊ.सध्या आम्ही लॉजवर आहोत. इथेच या तुम्ही." 


या सुयशच्या गंभीर स्वराने आता गौतमची पूर्ण खात्री पटली. 'पण नेमके काय घडले असेल ? हे तिथे गेल्यावरच कळेल.' हा मनात विचार करून गौतम थोडा गंभीर झाला.त्याला अचानकच असे गंभीर झालेले पाहून गौरी त्याला म्हणाली,"काय झाले? तू उदास का वाटतोय ?"


"काही नाही गौरी." गौतम बोलला खरा पण त्याच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होते की तो काळजी करत होता.


शहराच्या दुसऱ्या बाजूने गावाकडे जाता येत होते पण गौतमने गाडी शहरात वळवली. हे पाहून गौरी म्हणाली,


" हे काय ? तुझा रस्ता चुकला. हा इकडचा रस्ता जातो माझ्या माहेरी." आपल्या डाव्या हाताने इशारा करत गौरीने सांगितले.


"अगं हो, मला माहितीय रस्ता. पण आपण तुझ्या गावी चाललो नाहीत.तुझ्या घरचे सगळेच आज शहरात आले आहेत.त्यांनी आपल्याला इथेच बोलावले आहे." सुयश म्हणाला.


"हो बरोबर आहे म्हणजे सुयशदादा आणि रियाच्या लग्नाची 


खरेदी वगैरे करायला आले असतील." गौरी म्हणाली.


" हो तसेच असेल." म्हणून दोघेही सुयशने सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचले. तिथे गेल्यानंतर सगळ्यांचे पडलेले चेहरे पाहून रियाला काहीतरी बिनसले आहे न सांगताच समजले. "काय झाले आहे आई? तुम्ही सगळेजण मला पाहून खुश झाला नाहीत असे का वाटतेय मला?" गौरी घाबरून म्हणाली. " आणि हे काय ? सगळे सामान इथे कसे ? काल तुम्ही घरी गेलाच नाहीत का?" 


"नाही.  तू बस इथे. सगळे सांगतो तुला." म्हणून सुयशने गौरीला खाली बसवले.


तितक्यात रियाच्या आई आणि मावशी तिथे आल्या. 


"थांब सुयश, मीच सांगेन नेमके काय झालंय ते? या बसा ना तुम्ही." म्हणून मॅडमनी त्यांना बसायला सांगितले. रियाच्या आईच्या मनात विचारांचे काहूर माजले होते.  


मॅडमनी सांगायला सुरुवात केली. त्या म्हणाल्या, "हे बघा रियाच्या आई, आज मी तुम्हांला जे ऐकायला इथे बोलावले आहे त्यातले रियाला प्लीज काही कळू देऊ नका.काल आम्ही गावाच्या शिवेजवळ पोहोचलो तेव्हा रियाच्या बाबांच्या सांगण्यावरून गावातल्या लोकांनी आम्हाला गावात येण्यास कायमचा मज्जाव केला. उगाच वाद नको वाढवायला असे सरांनी बोलल्यावर आम्ही घरी न जाताच परत फिरलो." मॅडम अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांच्या कडा पुसत म्हणाल्या.


"काय? इतके सगळे घडले आणि तुम्ही मला आत्ता सांगताय ? मी दाखवेन त्या लोकांना विनाकारण त्रास दिल्यावर कायदेशीर कारवाई होऊन कशी शिक्षा भोगावी लागते ते." गौतम तावातवाने बोलत होता. 


"नाही गौतम, तुम्ही असे काहीही नका करू. ज्यामुळे रियाला अपराधी असल्यासारखे वाटेल. तेच रियाच्या आईलाही सांगायच होतं. रात्री मी माझ्या मैत्रीणीला फोन केला होता. तिने एक फ्लॅट आहे म्हणून सांगितले आहे. पण त्यासाठी हा जिल्हा सोडावा लागेल.तिथेच रिया आणि सुयशचे लग्न लावूया आपण. त्यांना घाबरून हे शहर सोडून जातोय अशातला हा प्रकार मुळीच नाही.पण रियासाठी आपल्याला त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे लागेल आणि म्हणूनच हे सगळे करणे भाग आहे." मॅडम जावयाला वस्तुस्थिती सांगत होत्या. जे मॅडम बोलत होत्या ते सर्वांना पटले होते असे चेहऱ्यावरून समजत होते. 


"हो गौतम, आई बोलतेय ते खरं आहे. रियाच्या घरचे इथे येऊन उगाच तिला त्रास देऊ शकतात. त्यापेक्षा त्यांच्यापासून दूर गेलेलेच सोयीचे ठरेल." गौरी म्हणाली.


"मॅडम, माझा तुमच्या सगळ्याच गोष्टींना होकार असेल.तुम्ही माझ्या रियाच्या आईच आहात. तेंव्हा तुम्ही घेतलेला निर्णय योग्यच असेल अशी माझी खात्रीय." रियाच्या आई म्हणाल्या.


"ठरलं तर मग. आपण आजच जाऊया. रियाला काहीतरी कारण सांगता येईल.रियाला तयार होऊन बस म्हणून सांगितले आहे ना? मी काल तिला बोलले होते." मॅडम रियाच्या आईला म्हणाल्या.


"हो मॅडम. तयार आहे रियाही." रियाच्या आई म्हणाल्या.


"बरं.चला आता जेवण करून घेऊया. ऊठा गौरी आणि गौतम चला तुम्हीही." संकपाळ सर म्हणाले.


"अग आई मला भूकच नाहीये." गौरी म्हणाली.


"नाही गौरी,तुम्हांला दोघांनाही थोडे तरी खावेच लागेल. नाहीतर मला फार वाईट वाटेल माझी लेक आणि जावई उपाशी गेले म्हणून." मॅडम आपल्या लेकीला म्हणाल्या.


आईचे बोलणे ऐकून रिया जेवण करायला निघाली.


"चला,जेवण करू या. आपल्याला लगेच निघायला हवं." रियाच्या आई आणि मावशीला मॅडम म्हणाल्या.


"नाही नको मॅडम. आम्ही जेवण करून निघालोय. तुम्ही घ्या जेवण करून. मी घरी जाऊन बॅग पॅक करते." रियाच्या आई म्हणाल्या.


"हो मॅडम,मी आणि रमा घरून जेवण करून निघालो होतो." उमा मॅडमना म्हणाल्या.


"बरं तुमचं आवरलं की रियाला कॉल करायला सांगा. आम्ही येतो घ्यायला." मॅडम म्हणाल्या.


"हो." म्हणून रियाच्या आई आणि मावशी रिक्षात बसून घरी गेल्या.


मॅडमनी आग्रहाने आपल्या लेकीला आणि जावयाला पोटभर जेवायला घातले. पाहुणचार म्हणून जावयासाठी आणि लेकीसाठी ते नको म्हणत असतानाही कपडे खरेदी केले.शुभाशीर्वाद देऊन लेकीची आणि जावयाची पाठवणी केली. रियाला आणायला मॅडम घरी गेल्या. तिथे उमा मावशीने मॅडमचा पाहुणचार केला. रिया सर्व गोष्टीपासून अनभिज्ञ होती. प्रदीर्घ प्रवासात रस्त्यात मध्ये थांबत थांबत अखेर रात्रभर प्रवास करून सर्वजण परराज्यात पोहोचले. भाषा, खाद्यपदार्थ, वेशभुषा जरी वेगळ्या असल्या तरी विविधतेत एकता जोपासणारा आपला भारत देश पाहुण्यांचे आदरातिथ्य करायला शिकवतो हे नक्की. तिथे पोहोचल्यावर रियाला 'आपण इतक्या दूर का बरे आलोय ?' हा प्रश्न सतावत होता पण मॅडम योग्य निर्णय घेतात याची तिला खात्री होती. मॅडमच्या मैत्रिणीने तिच्या मुलाला गाडीवर पाहुण्यांना घेऊन यायला पाठवले होते. सुयशनेही त्या मुलाच्या गाडीचा पाठलाग करत मॅडमच्या मैत्रीणीचे घर गाठले. सर्वजण फ्रेश झाले तोवर महिलांनी मिळून नाश्त्याची तयारी केली. नाश्ता करून सर्वजण फ्लॅट बघायला गेले. थ्री बीएचके असलेला तो फ्लॅट अगदी प्रशस्त होता. तिन्ही बेडला गॅलरी होती. गॅलरी आणि कंपाऊंड मध्ये भरपूर स्पेस होता. भलीमोठी नारळाची झाडे, शोची झाडे अपार्टमेंटच्या सौंदर्यात भर घालत होती. अतिशय मनमोहक वातावरण होते. सर्वांना तो फ्लॅट खूप आवडला. संकपाळ सर व मॅडमनी फ्लॅट खरेदी केला. गुरुजींकडे जाऊन पूजेचा आणि लग्नाचा मुहूर्त काढला. छोटीशी पूजा घालून संकपाळ कुटुंबीय रियाच्या आईसोबत नवीन घरात राहायला आले.


'लवकरच सुयश आणि रिया लग्नबंधनात अडकतील.सगळे व्यवस्थित होईल.' हा विचार करत मॅडम गॅलरीतून दिसणाऱ्या गार्डनमधील गणपतीला आज पहिल्यांदाच मनोभावे हात जोडत होत्या.


"तू बरी आहेस ना?आज मंदिराकडे पाहून हात जोडून उभी आहेस म्हणून विचारले." संकपाळ सर हसून म्हणाले.


"हो मी बरीय.आता माझ्या मुलांचे भविष्य उज्ज्वल असू दे म्हणून हात जोडून उभी आहे." मॅडम म्हणाल्या.


तितक्यात रिया, सर आणि मॅडम यांच्यासाठी चहा घेऊन आली. 


"अग रिया आम्ही आलो असतो ना खाली. तू कशाला त्रास करून घेतेस?" मॅडम म्हणाल्या.


"मावशीने केलेला चहा वर आणून द्यायला कसला त्रास? तुमच्यामुळे माझ्या आयुष्यातला त्रास कायमचा कमी झाला. मी इतकं तर करू शकते ना मॅडम तुमच्यासाठी." रिया नम्रपणे म्हणाली.


"कसे असेल रिया आणि सुयशचे लग्न?" 


पुढे उज्ज्वल भविष्यात गावाकडील कटू आठवणींचा काही त्रास तर होणार ना रिया आणि सुयशला?


पाहूया पुढील भागात क्रमशः


सौ.प्राजक्ता पाटील 









0

🎭 Series Post

View all