Login

हा खेळ ऊन सावल्यांचा भाग-6

विधवा झालेली रिया सुयशच्या मदतीने पुन्हा संसाररूपी सागरात प्रवेश करेल का?

भाग-6

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1352445651906617&id=581606972323826


रिया आणि तिच्या आई खूप वेळ वाट पाहत होत्या. अचानक त्यांच्यासमोर एक जीप येऊन उभी राहिली. कसलाच विचार न करता त्या दोघी जीपमध्ये चढल्या. कधीच घराबाहेर न दिसणाऱ्या काकासाहेबांच्या घरातील स्त्रिया आज एका खाजगी वाहनात बसून जाताना पाहून प्रत्येकजण जणू साशंक नजरेने त्या दोघींकडे पाहत होता. पण मनाशी निश्चयाची बांधलेली खूणगाठ रियाला आणि तिच्या आईलाही लोक काय म्हणतील ? या प्रश्नाकडे दुर्लक्ष करायला भाग पाडत होती. 


"आई, अगं आपण जायचं कुठे?" हळू आवाजातच रिया आईला म्हणाली.


"तू नको काळजी करूस. माझी एक मामेबहीण राहते तालुक्यात. मला तिचा पत्ता ठाऊक आहे. आपण फक्त आजचा दिवस तिच्याकडे राहू. उद्या आपली स्वतंत्र सोय करू. उगाच तिलाही आपल्यामुळे त्रास नको व्हायला." आई रियाला धीर देत म्हणाली.


थोड्याच वेळात दोघी मायलेकी शहरातील बसस्थानकावर पोहोचल्या. दोघी गाडीतून खाली उतरतात न उतरतात तोच रियाचा फोन वाजला. रियाला पर्समधून फोन काढायला इतका वेळ लागला की तोवर फोन कट झाला. 


"आई , सुयशचा फोन होता. काय करू ? उचलू की नको ? "


"उचल ना. अगं वेडाबाई, मी तुला फोन करू नको म्हणाले होते. आलेला घेऊ नको असं नाही म्हणाले. कारण मला वाटलं होतं , पाहुण्यांच्या आग्रहाखातर साखरपुड्याच्या मुहूर्तावरच गौरीचं लग्न करायचं ठरलंय त्यामुळे सुयशची  त्याच्या घरच्यांची खूप धावपळ सुरू असेल. पण तो स्वतः फोन करतोय मग कारणही तसंच असेल. उचल ना फोन." आई म्हणाली.


"अगं आई कट झाला." रिया म्हणाली.


"मग आता तू केलास तरी चालेल." आई म्हणाली.


रियाने रिटर्न कॉल केला पण आता सुयश फोन उचलत नव्हता.रियाने तब्बल चार वेळा कॉल ट्राय केला पण सुयश काही फोन उचलत नव्हता. आता रियाला जाम टेन्शन आलं होतं.  


"काय झालं असेल सुयशला ? नाराज झाला का माझ्यावर?" रिया आईला म्हणाली.


"अगं रिया, तो नक्की कामात असेल बघ. एवढ्या तेवढ्या वरून नाराज होणारा सुयश मुळीच नाही." आई रियाला म्हणाली.


"हं." म्हणून रियाने रिक्षा बोलावली.


रिक्षाचालकाला आईने पत्ता सांगितला आणि त्या बरोबर पत्त्यावर पोहोचल्या.


दोघी थोड्याशा घाबरतच दरवाज्याजवळ पोहोचल्या. रियाने दाराची बेल वाजवली. एका तरूण मुलीने दरवाजा उघडला.


"कोण हवयं?" ती आतून म्हणाली.


"हे प्रतापराव सरदेशमुखाचं घर आहे ना?" रियाची आई म्हणाली.


"हो." ती होकारार्थी मान हलवत म्हणाली.


तितक्यात तिची आई बाहेर आली.


"कोण आहे गं श्रेया?" त्या मुलीची आई म्हणजे रियाच्या आईची मामेबहीण म्हणाली.


रियाच्या आईला पाहिल्यावर तिने चक्क प्रेमाने मिठीच मारली. 


"रमा किती दिवसांनी भेट झाली आपली? कशी आहेस? ये ना आत ये." म्हणून तिने रियाला आणि तिच्या आईला आत नेले. फ्रेश होऊन दोघींना हॉलमध्ये बसायला सांगितले.


श्रेया आईने काही न सांगता पाणी घेऊन आली हे पाहून रियाची आई म्हणाली, "अगदी तुझ्यासारखीच गुणी आहे हो तुझी मुलगी. तू छान संस्कार केलेत मुलीवर."


"अगं, तुझी रियाही खूपच गुणी होती लहान असताना. पुढे मी जे वागले त्यामुळे सगळेच जण दुरावले माझ्यापासून पण तू तेवढी सतत माझी विचारपूस करायचीस.  आजही भूतकाळातल्या आठवणी डोळ्यासमोर तरळल्या तर अंगावर शहारा येतो. मी पण ना, तू इतक्या वर्षांनंतर भेटत आहेस आणि विषय कुठल्या कुठे घेऊन गेले. " डोळे पुसत उमा म्हणाली.


"असू दे गं, मायेची माणसं भेटली की मनातलं ओठांवर येतंच. बोल तू काय म्हणतेस? बरी आहेस ना?" रियाची आई आपल्या मामेबहीणीच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाली.


"अगं आता मी खूप सुखात आहे. घरच्यांनी परवानगी नाकारल्यावर मी प्रतापशी पळून जाऊन लग्न केलं असलं तरी प्रतापच्या घरच्यांनी मला माहेरची उणीव कधीच भासू दिली नाही आणि प्रतापविषयी तर तुला सगळं माहितीच आहे. मी माझ्याच विषयी बोलतेय. तू सांग, तू कशी आहेस? तुझं सगळं ठीक आहे ना? " आपल्या मामेबहीणीच्या या वाक्यावर मात्र रियाच्या आईच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले.


"रडू नकोस गं रमा. होणाऱ्या गोष्टींना आपण टाळू शकत नाहीत. रियाच्या लग्नालाही इच्छा असली तरी येता आलं नाही आणि जे झाले ते वाईट झाले गं. जेव्हा रियाचे समजले तेव्हा लगेच तुला फोन केला. मी आलेले तुझ्या घरच्यांनाही आवडले नसते म्हणून भेटायला नाही आले." श्रेयाच्या आई उमा रमाला म्हणाल्या.


"अगं उमा ते दुःख काही कमी होतं का? की घरच्यांनी अजून दुःख माझ्या रियाच्या आयुष्यात निर्माण केलं." रियाच्या डोक्यावरून हात फिरवत रियाची आई बोलत होती. रिया रडू लागली.


"काय झालंय रमा? रडू नका बरं तुम्ही दोघीही." उमा म्हणाली.  


डोळे पुसत रियाच्या आई उमाला म्हणाल्या, "अगं इतके दिवस घरचे अशिक्षित होते म्हणून मी ते म्हणतील तसच वागले. भलेही ते माझ्या बुद्धीला पटत नसले तरी. पण जेंव्हा माझ्या रियाच्या नवऱ्याच्या अकस्मात झालेल्या निधनाला त्यांनी रियालाच दोषी मानले, रियाने सतत स्वतःला खोलीत बंद करून जगायचं आणि इतकंच नाही तिची सावली अपशकुनी मानणाऱ्या घरातल्यांनी इतकी बंधने घातल्यावर त्यांच्याकडे साधी माणुसकीही शिल्लक नाही हे पाहून मी कायमचे घर सोडून आलेय." रियाच्या आई म्हणाल्या.


"काय ? असे कसे वागू शकतात ते आपल्याच लेकीसोबत? किती चुकीचे आहे हे सगळे. तू जे केलंस ते योग्यच केलंस रमा. आणि अगं आता रडायचं नाहीस तर रियाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून घरातल्यांना दाखवून दे की रिया किती नशीबवान आहे ते." उमा खंबीरपणे बोलत होती.


"हो नक्कीच. आजचा दिवस आम्ही तुझ्या घरी राहतोय पण उद्या आम्हा मायलेकींचा स्वतःचा प्रवास सुरू होईल. आणि तेव्हा तू आम्हाला तुझ्याकडे राहण्याचा आग्रह मुळीच करणार नाहीस. " रमाही आत्मविश्वासाने म्हणाल्या.


"हो.पण तुला काहीही मदत लागली की तू हक्काने माझ्याकडे यायचं बरं का!" उमा म्हणाली.


"नक्की अगं." रमाही म्हणाल्या.


तितक्यात रियाला सुयशचा फोन आला. उमाच्या मुलीने चार्जिंगला लावलेला रियाचा फोन रियाला दिला. ती अगदी मनापासून ज्याच्या शब्दांसाठी व्याकुल झाली होती तो सुयश. जेंव्हा "हॅलो." म्हणाला तेव्हा रियाच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहत असलेला बसलेल्या सगळ्यांनी अचूक टिपला.


"हॅलो." म्हटल्यावर रियाला किती बोलू आणि किती नाही असे झाले होते. पण कुठून सुरू करावे हे तिला सुचत नव्हते. 


"अगं रिया, कुठे आहात तुम्ही? मला गावातल्या एका मुलाने सांगितले की तुम्ही दोघी बॅग भरून प्रायव्हेट वाहनात बसून कुठेतरी गेलात म्हणून. तिच खात्री करून घेण्यासाठी मी घरी गेलेलो तुमच्या. मग जे घडलं त्यात माझी चूक होती हे समजले मला. सॉरी म्हणण्यासाठी मी तुला किती फोन केले पण तू उचलला नाही आणि परत तुझा मिसकॉल पाहून कॉल केला तर तुझा फोन लागत नव्हता. किती घाबरलो होतो माहितीय मी." सुयश घाबरून म्हणाला.


"काय तू घरी गेलेलास ? घरी कोणी तुला काही बोलले नाही ना? अरे तू स्वतःला दोष देऊ नकोस. जे होतं ते भल्यासाठीच. हो ना." रियाही घाबरून म्हणाली.


"हो. अगं तू माझी काळजी नकोस करूस. तू आत्ता कुठे आहेस ? ते सांग मला पटकन. मी येतोय तुझयाकडे. " सुयश रियाला म्हणाला.


"अरे आज गौरीचा हळदीचा कार्यक्रम आहे ना. मग तू कसा येणार आहेस? ते काही नाही. तू आत्ता नकोस येऊस. मी आणि आई आपल्या तालुक्यात आलोय. आईची मामेबहीण राहते इथे. आजची रात्र त्याच्यासोबत राहू आणि उद्या भाड्याने खोली करू असं आम्ही दोघींनी ठरवलयं." रियाचं वाक्य पूर्ण होते न होते तोच सुयश म्हणाला, "कुठे आहेस म्हणालीस तू आता ? म्हणजे पत्ता सांग प्लीज." 


"अरे सुयश, मी म्हणाले न नको येऊस आता." रिया म्हणाली.


"अगं रिया, मी ही इथेच आहे. माझं परम भाग्य म्हणेन मी की, गौरीचा साखरपुडा, हळदीचा कार्यक्रम आणि उद्या लग्नही इथल्याच कार्यालयात होणार आहे." सुयशचा आनंद ओसांडून वाहत होता.


"काय ? खरंच. मग तू आधी का नाहीस बोलला?" रिया आनंदाने म्हणाली. 


"अगं विषय तरी निघाला का परत गौरीच्या लग्नाचा? त्या दिवशी तुझं ऍडमिशन जास्त महत्त्वाचं वाटलं मग नाही बोललो काही.बरं ऐक ना रिया." सुयश म्हणाला.


"हं. सांग." रिया म्हणाली.


"आता तू गौरीच्या लग्नाला येऊ शकशील ना प्लीज." सुयश म्हणाला.


"मी आईला विचारून सांगेन." रिया म्हणाली.


"अगं तेवढा वेळ आहे का? तू मला पत्ता सांग मी येतोय काकूंना भेटायला." सुयश म्हणाला.


रियाने सुयशला पत्ता सांगितला. 


सुयश रियासमोर त्याच्या मनात असलेलं तिच्याविषयीचं अफाट प्रेम व्यक्त करू शकेल का? रिया ते स्विकारेल का? सुयशने घातलेली मागणी रियाच्या आईला कळेल तेव्हा तिच्या आईची काय प्रतिक्रिया असेल? पाहूया पुढील भागात क्रमश:


सौ. प्राजक्ता पाटील.




0

🎭 Series Post

View all