Login

हा खेळ प्रेमाचा भाग ६..

कथा दोन प्रेम करणाऱ्या जीवांची
नेहाने साक्षीला फोन केला आणि जे काही बोलली ते साक्षीला सांगितले.

"नेहा, कशाला असं बोललीस. त्याला किती वाईट वाटलं असेल."

"साक्षी, खरंच तुला प्रेमाचं वेड लागलंय. पार आंधळी झाली आहेस. त्याला काय वाटेल? अगं तुला काय वाटतं आहे ते बघ आधी. तुला किती त्रास होत आहे."


"मला होऊ दे त्रास, त्याला अजिबात त्रास होता कामा नये. तुला माहीत आहे ना? मी किती प्रेम करते."


"आता काय करायचं त्या प्रेमाचं? सांग ना? हे बघ मला हे सगळं बोलावं लागलं. त्याशिवाय तो काही करणार नाही. मलाही माहीत आहे तो त्याच्या आईवर किती प्रेम करतो, आई म्हणेल ती पुर्वदिशा; पण आता मात्र अति होतंय. हे असं बलिशपणे वागून चालणार नाही. मी त्याला म्हणाले आहे अजूनही वेळ गेली नाही. जे काही करायचे ते आता कर."


साक्षी शांतपणे ऐकत होती.

तिला फक्त साकेतच्या मनाची काळजी.


"साक्षी, तू ऐकते आहेस ना?"


"हो ऐकतेय."


तितक्यात नम्रता आली.


"नेहा, मी बोलते नंतर." तिने फोन ठेवला.


'खरंच साक्षी वेडी झाली आहे. स्वतःला त्रास झालेला चालेल; पण तिच्या साकेतला काही बोलायचे नाही. बघू आता साकेत काय पाऊल उचलतोय.' नेहा.


"साक्षी, ब्रेकफास्ट झाला आहे. येते ना?"

"हो आई येते."

नम्रता निघू लागली.

"आई, मनवा?"


"ती कॉलेजला गेली आहे. आज तिचा डान्स शो आहे तर लवकरच गेली."

"ओके."


'काल फार रागातच मनवाला बोलली. काय केलं मी?'


"काय गं कोणत्या विचारात हरवली?" नम्रताने तिच्या डोक्यावर हात फिरवला.


तिने नकारात्मक मान हलवली.

"बरं चल ये. हो आणि बाबाही पुण्याहून सकाळीच आले आहेत ते तुला विचारत होते."


"आई, मी फ्रेश होऊन येते."


नम्रता निघून गेली. साक्षी पुन्हा विचारात हरवली..

'काय वाटलं असेल साकेतला? नेहाने असं करायला नको होतं. त्याची अवस्था मला चांगलीच माहित आहे.'


ह्या विचारात असतांना तिला साकेतचा फोन आला..


त्याचं नाव पाहिलं आणि डोळ्यात चमक आली.

तिने पटकन फोन उचलला..


तो ही फोन कानाला लावून तसाच होता. ही देखील तशीच. काय बोलावं?


दोघांचे श्वास एकमेकांना ऐकू येत होते.

थोड्यावेळाने त्यानेच कसाबसा धीर एकवटला.

"साक्षी." आवंढा गिळत तो म्हणाला.


"हम्म."


"मी अपराधी आहे तुझा? ह्या वळणावर मी तुझी साथ द्यायला हवी आणि मी.."


त्याने रुमालाने डोळ्यातील अश्रू पुसले.

त्याच्या आवाजावरूनच कळून येत होतं की त्याची काय अवस्था झाली आहे.


"साक्षी, मी आज निघतांना आईला बोललो की, मला तुझ्याशीच लग्न करायचे आहे; पण.."


"पण काय साकेत?"


"काही केल्या आई ऐकत नाही. आई म्हणतेय मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईन. काय करू मी साक्षी? असं वाटतंय जीव द्यावा."

"साकेत, तुला माझी शपथ आहे. पुन्हा असं बोललास तर याद राख. असे घाणेरडे विचार मनात येऊ द्यायचे नाही."


"मग काय करू मी? जिवंतपणी मारतोय मी. डोकं काम करेना. फार त्रास होतोय. क्षणोक्षणी असं वाटतंय की मी तुझ्या प्रेमाचा, भावनांचा चुराडा केला. मीच तुझी साथ सोडली. नेहा बरोबर बोलत होती प्रेम निभवायची धमक नसेल तर माणसाने प्रेम करू नये. तुझा साकेत हरला साक्षी. मला स्वतःची लाज वाटतेय. मी गुन्हेगार आहे." असं बोलून तो रडू लागला.

त्यालाही साक्षीचे हुंदके ऐकू येत होते.


"साकेत, कदाचित आपली सोबत इथपर्यंतच होती." ती मनावर दगड ठेवून बोलत होती.


"साक्षी, तुझी सोबत कायम हवी होती. मी तुझ्याशिवाय कोणावरही प्रेम करू शकत नाही. "


"साकेत, प्रेम तर कायम राहणाच ना. मी देखील तुला विसरू शकत नाही."


"मला वाटलं नव्हतं आई असं काहीतरी बोलेल. तिला आपलं प्रेम का दिसत नाहीये."


"साकेत, जे आहे त्याचा स्वीकार कर."

"हे तू बोलतेय साक्षी?"

"हो साकेत हे मीच बोलतेय. स्वीकार कर. मला माहित आहे आई तुझ्यासाठी काय आहे? आणि हे देखील माहीत आहे मी तुझ्यासाठी काय आहे. आपण परिस्थिला सामोरे जाऊया साकेत. ह्यातच तुझं आणि माझं भलं आहे. ठीक आहे काळजी घे."

हे सर्व साक्षीच बोलत होती? त्याला तर स्वतःच्या कानावर विश्वास बसेना.

"साक्षी.."

तिने फोन ठेवून दिला.
खूप रडू लागली.

'साकेत, हे सर्व बोलण्याकरिता कुठून आलं हे बळ ? नाही बघवत तुझी अवस्था. माझ्यासाठी आयुष्यभर झुरत राहशील. तुझ्या डोक्यावर ते ओझं नको. तुला सोडवत नाही. तुला विसरू शकत नाही. तू तर हक्काचा आहेस, असं सहज कसं जाऊ देणार. इतकं कच्च प्रेम नाही रे माझं; पण हे सर्व करावं लागणार. नेहाला वाटतंय मी वेडी आहे. फक्त तुझा विचार करतेय; पण मला माहितीये तू देखील फक्त माझाच विचार करतोय. खूप चांगल्या पद्धतीने ओळखते मी माझ्या प्रेमाला.'

तिने दिर्घश्वास घेतला आणि डोळे पुसले..

बाहेर सगळे तिची वाट बघत होते.

तिला अस्वस्थ वाटत होतं. अस्थिर, बैचेन वाटत होतं.


मनाशीच तिने एक निर्णय घेतला.

आता रडत बसण्यात काही अर्थ नाही.

काहीही झालं तरी मन घट्ट करावं लागणार.

साकेतचा रस्ता मोकळा करू द्यावा लागणार.

मी जोपर्यंत आयुष्यात आहे, तोपर्यंत तो पुढे जाऊ शकणार नाही.


आतापर्यंत रडणारी, विव्हळणारी साक्षी वेगळी वागू लागली.

तिने साकेतचा नंबर ब्लॉक केला. हे करतांना खूप रडू येत होतं; पण साकेतसाठी हे करावं लागणार होतं. त्याच्या आयुष्यातून दूर निघून जायचं. खूप दूर.


साक्षीने त्याचा नंबर ब्लॉक केला हे जेव्हा त्याला कळेल तेव्हा काय अवस्था होईल?


खरंच प्रेम हे असंच असतं ना?

जो साकेत आयुष्यात हवा होता आता तिने त्याच्या भविष्यासाठी त्यालाच दूर लोटलं होतं.

तिला किती वेदना होत होत्या हे तिलाच माहीत होतं.

क्रमशः
अश्विनी ओगले.
ही एक कथामालिका आहे.
कथेचा पुढचा भाग एक ते दोन दिवसात येईल.
कथेला भरभरून प्रतिसाद देत आहात त्याबद्दल धन्यवाद.
हा भाग कसा वाटला कंमेंटमध्ये जरूर सांगा.
एक लाईक जरूर द्या.
२८/०४/२०२५