हाव पैश्याची
प्रतिम, कुठे गेला आहे ग रीमा ,दिसला नाही सकाळपासून..?आजी विचारत होती
आई अहो गेला असेल तो मित्राबरोबर दुकानात ,आता पैसे मिळाले आहेत म्हणजे पाय दुकानाकडे वळाले असतील त्याचे... आई म्हणाली
पैसे हातात पडायचा अवकाश तोच मित्र जमा करून दुकानात फरार... आजी म्हणत होती
कटकट करा नाहीतर डोकं आपटून घ्या त्याच्या पुढे तो कोणाचं ही ऐकत नसतो, त्यात तुम्ही नको तितका लाडाऊन ठेवला आहे...धाक असा कोणाचाही राहिला नाहीच त्याला..
आजी म्हणजे लाडाची ,त्याचे कोड पुरवते...सगळे जग जरी विरोधात गेले लेकराच्या तरी आजी ठाम पणे बाजू घेते बरं पोरी
माझ्या मुलाला बिघडवून ठेवले आहे ,आज तो दहा रुपये नको म्हणत होता ,आता त्याला पन्नास रुपये पाहिजे होते...किती त्याची मजल बघा तुम्ही...उद्या तो मानेवर बसून पैसे काढून घेईल..आई
कसा घेईल तो असं मानेवर बसून पैसे...मोगलाई माजली आहे का इथे...तेव्हा मी बरी गप गुमान त्याचे लाड चालून घेईल...तेव्हा सगळे जग जरी सोबत असले तरी मी त्याच्या विरोधात उभी असेल बरं.. असं समजू नकोस आजी फक्त लाड करते.. नाही मर्यादेत सगळे लाड करणारी आहे मी म्हतारी...आजी म्हणाली
तिकडे मोठा काका ,पोराचा बाप थकून आले होते कामाला उशीर झाला ,म्हणून संध्याकाळ पर्यंत काम केले ..त्यांना भाकर दिली होती पण तिथे शेतावर आज पोरगा आला होता म्हणून त्याला पण भाकर वाटून दिली..म्हणून दोघा भावाला भाकर कमी पडली..पोट भरलं नाही..घरी लवकर जायचे तर तरी काम करत राहिले..पोटात खड्डा पडला होता भुकेने
लै भूक भूक झाली बघ बायको ,आता लवकर स्वयंपाक कर बरं... नवरा
संपत आधी हात पाय तरी धुवा मग जेवण ,चहा करू. चल व्हय पुढं विहिरीवर...मोटार चालू कर मी येतोच..तसच बाजूच्या मेथीला आणि पालकाला ,कोथिंबिरीच्या वाफ्याला पाणी देऊनच टाकू आज...काका म्हणाला
व्हय व्हय ,लगेच बसलो की उठतो बायकोला सांगतो की चहा गरमागरम हातात दे ,लै अंग आणि डोकं दुखत आहे आणि येतोच...पोराचा बाप
व्हय ओ मी तुमच्या दोघांच्या पुरती भाकर दिली होती ,मग आपल्या पोराला का दिली तुमची भाकर.? त्याला म्हणायचं घरी मर भाकर खायला...तसं ही काय कामच आहे ,नुसतं सैराटा वाणी गाव फिरून येतो ,आयते पैसे मागतो ...आई रागात म्हणाली
तुला तेच तर सांगायसाठी थांबलो आहे ग मी ,आज कीने पिंट्या शेतात आला होता ,त्याला बघून राग आला होता पण ,त्याने जे केलं ते पाहून मला त्याचा आज अभिमान वाटला..!! बाप म्हणाला
काय काय केलं अस अभिमान वाटण्या सारखं इतके...भाकर संपून टाकली काकाची आणि बापाची...आणि अजून काय होतंय त्याच्या कडून...आई
भाकर जाऊदे ग बायको ,पोराने सगळे शेत पटापट नांगरून काढलं बघ ,उसाचे खोड काढू लागला ,खत विस्कटलं... बेणे आणून दिले...शेतात काट्या लावल्या त्याने...दगडं उचलू लागला...आम्हाला ह्या कामाला पुढचे तीन दिवस लागले असते ,दहा मजूर लागले असते ते काम आपल्या पिंट्यानं केले...मग सांग बापाला ह्या पोराचा अभिमान नाही वाटणार का...मग आपल्या वाटची भाकर नाही का द्यावी वाटणार... बापाची जाण ठेवली बघ त्याने आज...दादाने त्याला शाबासकी दिली ,आणि आम्ही घरी आलो...बाप
इतकं काम केलं त्यांनी...आई
खूप करतो तो, आता थोडे लाड करावं लागतात पण इतके तर पाहिजेच ना ह्या वयात...आपण त्याच्या बाजूनं विचारच करत नाहीत...नुसता बिघडला म्हणतो..आणि त्याला लाडुन ठेवलं म्हणून आईला बोलतो...पण त्याने काल पन्नास रुपयांचे झेंडूचे रोप आणले ,जास्त फुलं देणारे...आणि तर बांदाच्या कडेने लावलेत...म्हणतो ह्याचे अजून रोप करून लावू म्हणजे फुलं दसऱ्या पर्यंत येतील...बाप
आईचा उर भरून आला होता ,सकाळपासूनच तिचा राग होता त्याच्या वर...नको नको करून टाकले ह्या पोराने म्हणत होती...त्याला बाहेर शिकायला पाठवले पाहिजे...काही कामाचा नाही...फक्त भाकरी खायच्या कामाचा पण आता तिने मनात त्याची माफी मागितली होती
आजीने लगेच फर्मान सोडला ,अग बाई आज लेकराच्या आवडीचे कर खायला ,लै दमला असेल ग पोरगा शेतात काम करून...आता बघ त्याची लाईन नाही बिघडणार...
तिकडे मोठा काका हात पाय धुवन बसला होता ,तो आता वाफ्याला पाणी सोडणार इतक्यात ,त्याने पाहिले पाट तर ओला दिसत होता ,म्हणजे वाफ्यांना पाणी दिलंय तर...कोणी दिलं पाणी..?
तिकडून पुतण्या धावत आलाच आणि म्हणाला काका थांबा पाणी नका देऊ मी पाणी देऊन टाकलंय सगळ्या वाफ्यांना... आता तुम्ही जा घरात मस्त चहा घ्या...मी बघतो बाकीचे काम
मुलांना बिनकामें समजू नका ,ते त्यांच्या कला कलाने काम करतात..पण थेट करतात..
©®अनुराधा आंधळे पालवे
©®अनुराधा आंधळे पालवे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा