Login

हाच माझा नवीन वर्षाचा संकल्प

हाच माझा नवीन वर्षाचा संकल्प
हाच माझा नवीन वर्षाचा संकल्प

सकाळी चहा पित असताना आर्या खिडकीतून बाहेर बघत होती. नवीन वर्षाचा पहिला दिवस होता, पण तिच्या चेहऱ्यावर समाधानाची छटा नव्हती. ते तिच्या आईने बघितले आणि तिला विचारलं....

"काय झालं आर्या? नवीन वर्ष आहे, उत्साहाने सुरुवात कर ना!" आई.

"आई, प्रत्येक वर्षी आपण संकल्प करतो, पण काही आठवड्यांत विसरतो. यंदा वेगळं काहीतरी करायचं आहे." आर्या म्हणाली.

"बरं, मग विचार करून ठरव. पण जे ठरवशील, त्याला प्रामाणिकपणे पाळायचं." तिच्या आईने तिला हसून उत्तर दिले. त्यावर आर्या दिवसभर विचार करत होती. विचार करत असताना तिला अचानक आठवलं की तिने शेजारच्या लहान मुलांना नेहमी पुस्तकांसाठी भांडण करताना पाहिले होते. त्यांच्या घरात पुस्तकांसाठी पैसे नसत.

"आपल्याकडे इतकी पुस्तकं आहेत, पण मी कधी त्याचा योग्य उपयोग केला नाही.यंदाचा माझा संकल्प म्हणजे इतरांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवायचा." तिने स्वतःशीच विचार केला.

संध्याकाळी तिने काही जुनी, पण चांगल्या स्थितीत असलेली पुस्तकं गोळा केली. त्यांना स्वच्छ करून एका छोट्या खोक्यात ठेवली. दुसऱ्या दिवशी तिने ती पुस्तकं शेजारच्या मुलांना दिली. मुलांच्या डोळ्यात आनंद बघून तिचं मन भरून आलं.

त्या दिवसापासून आर्या दर महिन्याला आपल्या पुस्तकांच्या संग्रहातून काही पुस्तकं गरजूंना दान करू लागली. हळूहळू तिच्या या उपक्रमात तिचे मित्रमैत्रिणीही सामील झाले, आणि आर्याने एक छोटंसं वाचनालय सुरू केलं.

त्या वर्षाअखेर तिच्या आईने तिला विचारलं, "आर्या, तुझा नवीन वर्षाचा संकल्प पाळलास का?"

"फक्त पाळला नाही, आई, तर त्यातून स्वतःला खूप काही शिकायला मिळालं." आर्या हसून म्हणाली. तिचं बोलणं ऐकून आज तिच्या आईला तिचा खुप अभिमान वाटत होता.

"आर्याप्रमाणे जर प्रत्येकाने असा संकल्प केला तर अनेक गरजूंचे आयुष्य सुखकर होईल." असे तिच्या आईला तिच्याकडे बघून वाटत होते.

नवीन वर्षाचे संकल्प केवळ आपल्यासाठीच नव्हे, तर इतरांसाठीही असावेत. ते आयुष्य समृद्ध करतात.