हैं तुझे भी इजाजत.भाग -१

एक अलवार प्रेमकथा
हैं तुझे भी इजाजत!
भाग -१

‘इन दिनों दिल मेरा, मुझसे हैं कह रहा
तू ख्वाब सजा, तू जी ले जरा
हैं तुझे भी इजाजत, कर ले तू भी मोहब्बत..’

कारमधील म्युझिक प्लेअरवर गाणे वाजू लागले तसे तिने बाजूला बसलेल्या त्याच्यावर नजर टाकली.

तो म्हणजे आदित्य.. आदित्य शर्मा! सावळा असला तरी तजेलदार वर्ण, डोळ्यावर चढवलेला महागडा गॉगल, ओठावर मिश्किल हसू. तिची नजर त्याच्यावर खिळताच त्याने हलकेच डोळ्यावरचा गॉगल नाकावर सरकावला आणि तिच्याकडे बघून त्याचे नेहमीचे स्मित केले.

‘तुझे डोळे..
इतरांना वाटतात नशिले,
हा तर प्रत्येकाच्या बघण्याचा भाव.
मी मात्र शोधते तुझ्या डोळ्यात माझं गाव!’

तिला भूतकाळातील त्या ओळी आठवल्या आणि हृदयात एक कालवाकालव झाली.


“एवढं काय बघतेहेस?” ते स्मित तसेच लेवून त्याने प्रश्न केला.


“तुलाच.” तिचेही ओठ रुंदावले.


“..उसको छुपाकर मैं सबसे कभी
ले चलू कहीं दूर
आँखों के प्यालों से पिता रहूं
उसके चेहरे का नूर..”
तिच्याकडे बघत तो प्रीतमचे बोल गुणगुणू लागला.


“आदि, अजूनही तसाच आहेस रे तू. अगदी पूर्वी होतास तसाच.” कंठापर्यंत आलेला उमाळा परतावत ती म्हणाली.


“अहं, पुरता बदललो होतो गं मी. तू आयुष्यात परत आलीस आणि मी परत पूर्वीसारखा झालो. रिअली थँक्स की तुझ्यामुळे माझ्यातील मी मलाच नव्याने गवसलो.”


“खरंच?” तिचे उगाच हळवे होणे.


“खरंच.” त्याचा तिच्याकडे अर्थपूर्ण कटाक्ष.


तिने एक लांब श्वास घेतला आणि परत ती सीटला मागे रेलून बसली. त्याच्या त्या कटाक्षाने तिची काहीशी बावरलेली नजर खिडकीतून बाहेर गेली. नुकतेच सुरु झालेली बरसात आणि त्या बरसातीने तप्त वसुंधरेवर पावसाच्या थेंबांचा वर्षाव करून नव्या अंकुराला रुजवत फुटू पाहणारी नवी पालवी.


‘माझ्या मनात केव्हातरी रुजलेल्या अंकुराला ही अशीच पालवी फुटू पाहतेय का?’ निसर्गाचा आस्वाद घेत असलेली तिची निसरडी नजर परत बाजूला बसलेल्या आदित्यवर स्थिरावली.


“धराऽऽ”


“हं?” त्याच्या प्रेमळ स्वराने चोरी पकडल्याच्या अविर्भावात तिने बावचळून त्याच्याकडे पाहिले.


“तुला खरंच मला भेटायचं होतं ना?”


“असं का विचारतोस?”


“असंच गं. फोनवर किती काय काय बोलत असतेस नि आता प्रत्यक्षात भेटतोय तर तुझा आवाज ऐकायला मला काहीतरी बोलावं लागतंय. तू तर पूर्णपणे शांत होऊन गेलीयेस.” तिच्याकडे वळून तिच्या काळ्या डोहात डोकवत तो म्हणाला.


“असं काही नाही रे. भेटायचं नसतं तर मी आले असते का?” ती ओठ रुंदावून म्हणाली तसे त्याचे ओठ देखील रुंदावले.


“यस्स! आय न्यू इट. जी ओढ माझ्या मनात आहे तीच तुझ्याही मनात आहे हे मला ठाऊक होतं आणि एक सांगू का? अशी स्माईल केल्यावर कसली गोड दिसतेस गं. यार, असा लटका चेहरा करून नको राहूस गं.” त्याच्या वाकचौतुर्यावर प्रभावीत होऊन त्या क्षणी ती प्रसन्न हसली.


“आता इतकी काय हसतेहेस?”


“आदि, तुझ्याबद्दलची माझ्या मनातील ओढ पूर्वीपासून होती अरे, तुलाच ती कधी कळली नाही किंवा कळूनही वळली नाही. कदाचित वळलीही असावी; पण थोडं पुढे जाण्यापूर्वी तूच ती ओढ संपवून टाकली होतीस. आठवतय ना?”


“धरा, आता कितीदा गं सॉरी म्हणू? चुकलोय मी. खरंच आयुष्यातील खूप मोठी चूक केलीये मी नि त्याचे फळ देखील मला मिळालेय. तरीही तू मला माफ करणार नाहीयेस का? आणि खरं सांगू का? नकोच करुस. मी तर तू जी शिक्षा देशीला ना ती भोगायला तयार आहे. आईशप्पथ!”


तो म्हणाला तसे ती हलकेच हसली. त्याच्यावरची तिची नजर पुन्हा बाहेर भिरभीरली. बाहेर किती छान वाटत होते. सारेच कसे प्रसन्न प्रसन्न. एक जोराची सर कोसळावी आणि आणि मनावरचे सारे मळभ दूर होऊन जावेत. काहीसे असेच तिला वाटत होते. हळूच खिडकीची काच खाली करून तिने बाहेरचा मोकळा वारा श्वासात भरुन घेतला.


मन महिनाभर जरासे मागे जाऊन फिरून आले. या महिन्याभरात किती काय काय घडून गेले होते. अचानक आयुष्य जणू एकशे ऐंशी डिग्रीने फिरावे आणि हातून निसटलेले ते टोक पुन्हा हाती येऊन त्यावरची पकड घट्ट व्हावी असेच तर काहीसे तिचे झाले होते आणि त्याला कारणीभूत होता तो एक फोनकॉल.


“.. अंबर, प्लीज यार किमान यावर्षी तरी आपण आपल्या ॲनिव्हर्सरीला बाहेर जाऊयात ना.”


“धरा, अगं यावेळी नाही जमणार. शेड्युल फूल टाईट आहे.”


“अंबर काय रे हे? वर्षातून एकदाच तर हा दिवस येतो आणि तरीही तू नाही म्हणतोस? तुला ना माझ्याबद्दल काही वाटेनासे झालेय.” तिचा चेहरा गुरफंटला होता.


“धरा..”


“काही बोलू नकोस. आपल्या लग्नाची बारा वर्ष पूरी होत आलीत. बारा वर्ष म्हणजे एक तप होतो मिस्टर अंबर कुलकर्णी. या इतक्या वर्षात एकदा तरी मला कुठे घेऊन गेलात का?” तिचा पारा चांगलाच चढला.


“मिसेस कुलकर्णी कुल डाऊन. जमेल तसे मी प्रयत्न करतो ना. तुम्ही फक्त चिडू नका म्हणजे झाले. आता चिडलात की मग हा राग रात्रीपर्यंत पुरतो आणि तुमचा रुसवा काढता काढता अख्खी रात्र अशीच सरून जाते.” तो मधाळ स्वरात म्हणाला आणि धराने रागाने कॉल कट करून टाकला.


‘जेव्हा पहावं तेव्हा याला फक्त रात्र खराब होऊ नये म्हणून काळजी. माझ्या मनातील सल मात्र कधीच कळत नाही.’ तिच्या डोळ्याच्या पापणीवर एक टपोरा थेंब येऊन विसावला.


“मम्मा, आज फ्रेंच फ्राईज करणार होतीस ना? मला भूक लागलीये.” छोट्या अंशची भुणभुण मागे लागली तशी काहीशी चरफडत ती स्वयंपाकघरात घुसली.


‘नवऱ्याला बायको हवी ती बेड शेअर करायला. पोरांना आई हवी ती काहीतरी चांगलंचुगलं खायला करून द्यायला आणि सासूला सून हवी ती घरातील कामं करायला. बायको, आई, सून या पलीकडे माझं काही अस्तित्वच नाहीये का? ही धरा कुणालाच नकोय का?’ बटाटे चिरता चिरता तिचा एक स्फूट हुंदका बाहेर पडला.


“मम्मा, अगं तुझा मोबाईल केव्हाचा वाजतोय, बघ ना.” तेवढ्यात तिची दहा वर्षांची लेक मोबाईल घेऊन तिच्याकडे आली.


“पूर्वी, अगं बघ ना कुणाचा कॉल आहे ते? मी कामात आहे ना गं.”


“नो मम्मा, बाहेर मस्तपैकी पावसाचं वातावरण झालेय. मला भिजायचे आहे.”


बाहेर अचानक अंधारून आलेल्या ढगांना बघून हातातील मोबाईल पूर्वी आनंदाने अंगणात पळाली. तो धराच्या हाती येईपर्यंत कॉल कट झाला होता.


“अगंऽऽ वळीवाचा पाऊस आहे हा. भिजू नकोस गं राणी.” ती बोलायला आणि परत मोबाईलची रिंग वाजायला एकच गाठ पडली.


“हॅलोऽऽ” जराशी चिडलेल्या स्वरात तिने कॉल रिसिव्ह केला.


“हॅलो.. धरा?”


“हॅलोऽऽ कोण?” एका अनोळखी आवाजाने तिचा स्वर जरासा मवाळ झाला.


“मी आदित्य.. आदित्य शर्मा.” पलीकडची व्यक्ती म्हणाली आणि धराच्या हृदयाचा ठोका चुकला.

कोण आहे हा आदित्य? आणि त्याच्या अश्या अचानक आलेल्या फोनमुळे धराच्या आयुष्यात काय घडेल? वाचा पुढील भागात.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
________


🎭 Series Post

View all