हैं तुझे भी इजाजत.भाग -२

वाचा एक अलवार प्रेमकथा
हैं तुझे भी इजाजत!
भाग -२


“आदित्य? आदित्य शर्मा?” तिच्या आवाजाची धार अचानक खाली आली.


“ओळखलंस?”


“आदि? तू?” तिची जीभ काहीशी थरथरली.


“थँक गॉड! ओळखलंस म्हणजे.” पलीकडून एक मिश्किल हसू.


“आदि तुझ्याकडे माझा नंबर कसा? तू तर आपल्या कॉलेज ग्रुपवर देखील नाहिस.”


“तो मी बरोबर मिळवलाय. बाय द वे, थँक यू हं.”


“थँक यू? कशासाठी?”


“अगं मला वाटलं की माझं नाव ऐकून तू तोंडावर कॉल कट करशील, शिव्यांची लाखोली वाहशील; पण तसे काही घडले नाही ना म्हणून थँक यू.” त्याचे स्पष्टीकरण.


“आदि..”


“मम्मा, माझे फ्रेंच फ्राईज तयार झालेत का?” ती आदित्यशी काही बोलू पाहत होती तेवढ्यात लहानगा अंश धावत आला.


“धरा, बहूतेक तू बिझी दिसतेस. मी तुला नंतर कॉल करतो. बाय.”


“बाय.” त्याने कॉल कट करताच धरानेही तिचा मोबाईल बाजूला ठेवला आणि ती अंशसाठी त्याची आवडती डिश बनवू लागली.


कामात गुंतली होती खरी; पण तिचे चित्त मात्र थाऱ्यावर नव्हते. आदित्य शर्मा? नव्हे, आदित्य. अहं.. तिचा आदि!


“धराऽऽ” किती वर्षांनी त्याचा स्वर तिच्या कानावर पडला होता.


त्याने घातलेली ती साद. थोडथोडकी नव्हे तब्बल वीस वर्षानंतर ऐकलेला तो आवाज. त्याच्या बोलण्याची ती मिश्किल अदा. सारे काही कसे एखाद्या वावटळीप्रमाणे तिच्या भोवती रिंगण करून गोल गोल फिरू लागले होते.


कामात व्यस्त झाली तरी त्याच्या आठवणीत गुंतलेले मन बाहेर पडायला तयार होत नव्हते, नव्हे ते तर अधिकच भूतकाळात रमू पाहत होते.


“धरा, कम ऑन यार. मुलं झोपलीत. ये की गं जवळ.” रात्री नवऱ्याचा अर्थपूर्ण हात तिच्या हातावर आला.


“अंबर, सॉरी. आज नको. आज मी थकलेय रे.” तिने हलकेच त्याचा हात हातून सोडवून घेतला.


“तुझं हे नेहमीचंच झालंय.” त्याने चिडून कुस पालटली आणि तिच्या डोळ्यात पाणी तरळले.


‘माझं नेहमीचंच तर मग तुझंही हे नेहमीचच आहे की रे. हल्ली त्या गोष्टीशिवाय कधी प्रेमानं जवळ तरी कुठे घेतोस?’ मनातल्या मनात कुढत तिने गालावर आलेला थेंब टिपून घेतला आणि कुस बदलत डोळे मिटले.


डोळे मिटले, मन:चक्षु मात्र उघडले होते. त्या नजरेसमोर एकच चेहरा येत होता,तो म्हणजे आदि आणि कानावर ऐकू येत होती त्याची ती साद..

‘धराऽऽ’


आदित्य शर्मा! कॉलेजमध्ये असताना या नावाभोवती एक वेगळेच वलय होते. ती कॉलेजमध्ये नव्याने आलेली. काही कारणामुळे हिची उशिरा झालेली ॲडमिशन, वर्गात सगळे स्थिरस्थावर झालेले आणि आपण उगाच मागे पडल्यागत वाटत असताना तिला भेटलेला तो, आदित्य.


काळा सावळासा, मस्तीखोर आणि सतत तिच्या मागेमागे करणारा. कॉलेज, क्लास, कॅन्टीन, लायब्ररी, प्रॅक्टिकल्स.. काहीच सुटले नव्हते. त्याच्या वागण्याचे गमक तिला कळेचना. का सतत हा आपल्या भोवती घुटमळतो हे कोडे सुटेना आणि ते कोडे उलगडता उलगडता ती त्याच्यात कधी आणि केव्हा गुंतली तिलाच उमगले नव्हते.


“का वागतोस असं?” त्याआधी एकदा चिडून तिने त्याला विचारले होते.


त्याच्या सततच्या अश्या वागण्यामुळे सगळा राग उफाळून आला होता. त्यात त्या दिवशी असलेली तोंडी परीक्षा आणि त्याचे तिच्याभोवती गोंडा घालून तो फिरणे. ती वाचायला बसली तर तोही तिच्या बाजूला. दुसरीकडे गेली को तोही तिच्या मागेच. उद्विग्न होऊन ती वर्गाबाहेर आली तर तोही बाहेर आला. कधी नव्हे ते ते तिने त्याला सणसणीत झापले आणि नंबर येताच परीक्षा द्यायला गेली. परतली तेव्हा त्याला काय चाललेय हे विचारायचे तिने ठाणले होते.


“का वागतोस असं?”आल्यावर तिने त्याला चांगले धारेवर धरले.


“काही नाही.” बाहेर बघत त्याचे शांत उत्तर.


“आदि, सॉरी. ऍक्च्युली माझं चुकलं. तुला असं ओरडायला नको होते; पण तुला कळतंय का? माझी नुसती चिडचिड होतेय अरे.”


“धरा मला तुला काही सांगायचंय. म्हणजे बघ, तुला आवडलं तर ठीक नाही आवडलं तरी माझ्याशी बोलणं तोडू नकोस.” त्याचे तिच्या डोळ्यात बघून अर्जव.


“त्याआधी तू काही बोलशील तरी? तुझ्या अश्या वागण्याने मला त्रास होतोय हे का कळत नाहीये तुला?” तिचा नुसता त्रागा.


“आवडतेस तू मला.” तिच्या काळ्या डोळ्यातील नजर तशीच स्थिर ठेवून तो म्हणाला.


त्याची ती नजर, तो आत्मविश्वास. आतापर्यंत त्याच्या अश्या वागण्याचे समोर आलेले अनपेक्षित कारण. तिच्या डोळ्यात अचानक पाऊस दाटून आला.


“धराऽऽ निघुयात ना आपण. आकाशात बघ किती काळे ढग दाटलेत. केव्हाही पाऊस कोसळेल, चल ना.” तेवढ्यात तिची मैत्रीण, प्रिया तिथे आली.


“मी निघते.” त्याच्याकडे एकवार बघून ती प्रियासोबत जायला वळली.


“काय झालंय?” धराचा उतरलेला चेहरा प्रियाच्या नजरेतून सुटला नव्हता.


“काही नाही.” डोळ्यातील पाणी आतल्या आत पिऊन घेत ती प्रियासह वर्गाबाहेर पडली.


बाहेर रिमझिम बरसातीने फेर धरला होता. अंगावर कोसळणारे तुषार झेलत धरा बाहेर मैदानात आली. तिथे आदित्यच्या ग्रुपमधील काही मुलंमुली फिरत होती. सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळलेल्या. तिच्या चेहऱ्यावरचे भाव वाचण्यात गुंतलेल्या. कदाचित त्याच्या मनातील गुपित आदित्य धराला सांगणार आहे हे त्यांना आधीच ठाऊक असावे.


..वीस वर्षांपूर्वीच्या त्या सांजवेळी सुरु असलेली ती पावसाची रिमझिम अन् त्याचे ‘तू मला आवडतेस’ म्हणून सांगणे आणि आज अचानक वळीवाची बरसलेली बरसात अन् इतक्या वर्षानंतर त्याची ऐकलेली साद! तिच्या डोळ्यातील धारा पुन्हा वाहायला लागल्या.

हा मेळ पुन्हा एकदा बसणार होता का? प्रेमाचा खेळ पुन्हा सुरु होणार होता का? तिला काहीच कळत नव्हते. कळत होते ते फक्त त्याचे तिच्या आयुष्यात परत येणे.
_______


“धरा, बाय. मी ऑफिसला निघतोय.” सकाळी नेहमीप्रमाणे अंबर ऑफिसला निघाला आणि नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे त्याने तिच्या ओठावर ओठ टेकवले.


“अंबर, सॉरी फॉर लास्ट नाईट.” मनात एक अपराधीभाव घेऊन ती म्हणाली.


“इट्स ओके अगं. तशीही मला सवय आहे.” छोटेसे स्मित करून तो उत्तरला आणि निघूनही गेला.


‘हाच तर प्राब्लेम आहे ना रे अंबर. तुला माझ्या अश्या वागण्याची सवय आहे; पण मी अशी का वागतेय ते कधीच जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा नसतो. मला तुझ्याकडून शरीरसुखाव्यतिरिक्तही काही हवंय हेच तुला कधी ध्यानात आलं नाही.


तुझं अटेंशन, तुझं स्पर्शातून उमगणारे प्रेम, आपल्या दोघांचे असे क्षण.. खूप काही अश्या अपेक्षा नाहीतच रे माझ्या. केवळ मी तुझा माझ्यासाठीचा वेळ मागतेय, तेही तू देऊ शकत नाहीयेस. अशाने ही धरा पार कोमेजून जाईल रे. तुला का कळत नाहीये?’ एक हुंदका देत ती परत कामाला लागली.

अंबरशी होणारा दुरावा आदित्य आणि धराला पुन्हा एकत्र घेऊन येईल का?
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
___________


🎭 Series Post

View all