हैं तुझे भी इजाजत.भाग -३

वाचा एक अलवार प्रेमकथा
हैं तुझे भी इजाजत!
भाग -३


“मम्मा, शाळा सुरु होतेय. माझ्या पुस्तकांना आज तरी कव्हर लावून दे ना.” पूर्वीने धरासमोर पुस्तकांची पिशवी उघडताच तिचा पारा आणखीनच चढला.


‘सगळ्यांसाठी करता करता मीच या जगातून नाहीशी होईल ना तेव्हाही कुणाला माझी किंमत कळेल की नाही ठाऊक नाही.’ भणभणत्या डोक्याने तिने आवरायला सुरुवात केली.


“मम्मा, का इतकी चिडचिड करतेस गं?” लेक बोलली तसे तिने दुखणाऱ्या डोक्याला घट्ट आवळून घेतले.


“पूर्वी, मी जरावेळ पडते गं. थोडं अस्वस्थ वाटतेय.” म्हणत तिने बेडरूमचे दार ओढून घेतले आणि डोळे मिटून ती बेडवर पडली.


‘का इतकी चिडचिड होतेय? कसली ही तगमग? जे घडतंय ते तर रोजचंच आहे, मग आज साऱ्याचा का इतका त्रास होतोय?’ डोक्यात प्रश्नांचे थैमान माजले होते आणि मनात अगदी तळाशी साचलेल्या आठवणी पिंगा घालू पाहत होत्या.


“आदि, कुठे होतास इतकी वर्ष? का रे माझ्याशी असे वागलास?” मोबाईल हाती घेत व्हाट्सअपच्या डीपीला असलेला त्याचा फोटो बघून ती स्फून्दू लागली.


कॉलेजमध्ये असताना त्याचे ते मागेमागे असणे, तिला सतत छळणे, तिच्यावरच्या प्रेमाची कबुली देणे सारे काही अगदी स्वच्छ आठवत होते.


‘प्रेमाच्या एवढ्या आणाभाका घेतल्यास आणि नंतर माझ्याकडे कायमची पाठ फिरवलीस. का वागलास रे असं?’ आठवणीच्या गर्तेत वाहत ती मनातल्या मनात प्रश्न करत होती.


त्याने तिच्यावरचे प्रेम व्यक्त केले होते तरी तिच्या मनात त्याच्याबद्दल काय आहे हे तिलाच कळत नव्हते. मध्यंतरी तो मात्र तिचे मत जाणून घ्यायचा प्रयत्न करत होता. त्याच्या आधीच्या वागण्याने ती त्रस्त झाली असली तरी आता त्या वागण्याची तिलाही सवय झाली होती. त्याचा राग येत होता; पण काही बोलून तो दुखावला जाऊ नये याची काळजी घेत होती.


त्याला त्रास होऊ नये म्हणून जपणे, त्याच्यासाठी मनात एक हळवा कोपरा तयार होणे, ऐन परीक्षेच्या वेळी त्याला बरे नाहीये म्हणून रात्र रात्रभर तळमळत राहणे, त्याच्या काळजीने रडून रडून डोळे सुजवून घेणे एवढे सगळे घडून गेल्यावर कुठे तिला तिच्या प्रेमाची प्रचिती आली.


‘धरा, इट्स अ लव्ह! त्या वेड्याच्या प्रेमात मी फक्त पडलेच नाही तर पुरते बुडालेय.’ स्वतःची खात्री झाल्यावर मन पाऊस कोसळून गेल्यानंतरच्या मोकळ्या आकाशासारखे झाले होते. त्याला मात्र ती अजून काही बोलली नव्हती.


“आज ना मी तुझा वायवा घेतोय. मला त्याचे अचूक उत्तर हवे हं.” लेखी परीक्षा संपल्यानंतर दोघे त्याच्या आग्रहास्तव फिरायला म्हणून बाहेर गेले तेव्हा तो तिला म्हणाला.


“आदि, घाबरवू नकोस रे. माझा पुरेसा अभ्यास झाला नाहीये.” ती निरागसपणे म्हणाली.


“फार कठीण प्रश्न नाही गं विचारणार. अगदी सोप्पा आणि तुझ्या झालेल्या अभ्यासातीलच असेल, डोन्ट वरी.” एका झाडाच्या सावलीत फतकल मांडून बसत तो नेहमीचे मिश्किल हसला.


“ठीक आहे. विचार.” त्याच्यासमोर बसत ती.


“धरा, डू यू लव्ह मी?” तिच्या डोळ्यात बघत त्याचा थेट प्रश्न.


त्या प्रश्नाने ती जराशी बावरली. तिचे उत्तर तिला ठाऊक असले तरी तो यावेळी असा अनपेक्षित सवाल करेल हे कुठे माहिती होते.


“धरा, प्लीज सांग ना गं.”


“जर हो म्हणाले तर?”


“मी माझं भाग्य समजेल.”


“आणि नाही म्हटलं तर?”


“दुर्भाग्य.”


“आणि जर काहीच बोलले नाही तर?”


“तर मी काही बरंवाईट करेन. तुझं नाही स्वतःचच. म्हणजे मरणार वगैरे नाही; पण..”


“आदिऽऽ”


“धरा, प्लीज सांग ना गं. माझ्यावर प्रेम करतेस ना?” त्याचा स्वर हळवा झाला होता.


“आदि, यस आय डू. तुला माझा चेहरा कधी वाचताच आला नाहीये का? डफर खूप प्रेम करते रे मी तुझ्यावर. खूप, खूप, खूप जास्त.” धरा व्यक्त होत म्हणाली.


त्या क्षणी किती आनंदी होती ती. कुणावर तरी मनापासून केलेले प्रेम आणि ते त्याला सांगू शकल्याची भावना! तिच्यासाठी हे सगळे नवे असले तरी हवेहवेसे होते.

त्याच्या हाती असलेला तिचा हात कधी सुटूच नये असे तिला वाटत होते. आदित्य-धरा, धरा आणि आदित्य, बाकी मग कुणीच नसावे. प्रेमाच्या दुनियेत रंगताना सगळीकडे कसे गुलाबी रंग पसरल्याप्रमाणे वाटत होते. पावसाळा संपून हिवाळा सुरु झाला होता. हिरव्या साजाने नटलेली वसुंधरा अधिकच खुलून दिसत होती आणि प्रेमाच्या रंगाने सजलेली धरा तिची तिलाच मोहक भासू लागली होती.


महिने बदलले. परीक्षा संपल्या. इतर विद्यार्थ्यांप्रमाणे धरा आणि आदित्यही आपापल्या गावी परतले. प्रेमात पडल्यानंतरचा हा पहिला दुरावा. तुझी खूप आठवण येईल म्हणून त्याचे तिला सारखे सांगणे. मनातील भाव चटकन चेहऱ्यावर येणे हे त्याचे नित्याचेच. ती मात्र त्याच्या विरहाची सल मनात लपवून ओठावर हसू घेत त्याला निरोप देत होती. बस सुरु झाल्यानंतर तो नजरेआड होताच तिची आसवे मुक्त होऊन वाहू लागली.


तब्बल दोन महिने.. परीक्षेपासून निकाल लागण्यापर्यंतचा तो काळ. प्रत्येक दिवस आणि दिवसाचा प्रत्येक क्षण ती त्याच्या आठवणीत जगत होती. कॉलेज सुरु होण्याची चातकाप्रमाणे ती वाट बघत होती. त्याला भेटण्याची ओढ, जीवाची होणारी तगमग. ग्रीष्म ऋतुची लागणारी चाहूल आणि मनाची होणारी काहीली!

केवळ काही महिन्यांचा असलेला एखाद्याचा हा विरह एवढा जीवघेणा का असतो हे तिला अजुनतरी कुठे उमजले होते?


“आदिऽऽ”

एकदाचे कॉलेज सुरु झाले होते. कॉलेजमध्ये प्रवेशताच आदित्य दिसताक्षणी धराने साद घातली. त्याच्याशी किती बोलू नि किती नाही असे तिला झाले होते. या दोन महिन्यातील प्रत्येक क्षणाचा लेखाजोखा त्याला सांगायचा होता. तिच्या सारखाच तोही तिला भेटायला आतूर असेल, तिच्या एकवार बघण्यासाठी त्याची नजर आसूसली असेल या भ्रमात असलेली ती.. पुढच्याच क्षणी मात्र तिच्या भ्रमाचा भोपळा फुटला होता.


“आदि तुला ठाऊक आहे? किती मिस केलं रे मी तुला.”


“धरा.. एक मिनिट. ही तुझी डायरी. मी ठेवून घेतली होती. होस्टेलवर परत गेलीस की वाच. आता बाय.”


“आदि, काय झालंय? तुला बोलायचे नाहीये का?”


“असंच काहीसं. बाय.”


त्याच्या तुटक उत्तराने ती चकित झाली. हा दोन महिन्यापूर्वीचा तो आदित्य नव्हता. त्याचे रूप वेगळे होते, काहीसे गूढ, काहीसे अनाकलनीय. किती बोलण्याचा प्रयत्न केला; पण तो तिला केवळ टाळतोय हेच तिला कळत होते, त्याचे कारण मात्र अनभिज्ञच.


कॉलेज संपल्या संपल्या ती होस्टेलवर पळाली. आवरायचे सोडून त्याने परत केलेल्या डायरीचे प्रत्येक पान चाळून काढले आणि एका पानावर आपल्यातील नाते संपुष्टात आल्याचा त्याचा कबुलीजबाब तिला दिसला.

ना कुठले कारण, ना कशाचे स्पष्टीकरण.


“आदि, इतके दिवस माझ्या मागे मागे करायचास ते काय होते?” आलेला हुंदका बाहेर आणण्यापासून रोखत तिने विचारले.


“माहित नाही; पण आता खरंच आपल्यात काही नाहीये आणि एक गोष्ट यापुढे आपण एकमेकांशी कधीच बोलायचं नाही. कधीच नाही.”


ज्या ठिकाणी पहिल्यांदा दोघे भेटले होते तिथेच आताही भेटायला आले. ती पहिली भेट नि ही शेवटची. त्या भेटीत तिने तिच्या प्रेमाची कबूली त्याला दिली होती आणि या भेटीत तो नाते तोडून मोकळा झाला होता.


पहिले प्रेम, पहिला स्पर्श, पहिला पाऊस, पहिला दुरावा आणि पहिले ब्रेकअप! सारेच पहिले पहिले. तो त्रास, ते रडणे.. या साऱ्यातून बाहेर पडायला धराला किती कठीण गेले तिचे तिलाच ठाऊक.


नेमके असे काय घडले होते? वाचा पुढील भागात.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
________


🎭 Series Post

View all