हैं तुझे भी इजाजत.भाग -४

वाचा एक अलवार प्रेमकथा
हैं तुझे भी इजाजत!
भाग -४


हळूहळू मात्र ती पुरती बदलली. तो अवखळपणा, तो अल्लडपणा सारे सरून तिच्यात एक पोक्तपणा येत गेला. पुढे कॉलेज सरले. यथावकाश अंबर आयुष्यात आला. त्याने लग्नासाठी मागणी घातली आणि तिनेही लगेच होकार दिला. नव्याचे नव दिवस सरले. ती तिच्या संसाराला लागली.


म्हटले तर सारे सुरळीत सुरु होते. मनाच्या खिडकीत मात्र आदित्य डोकवत राहिला. कधी आठवणीत.. कधी साठवणीत! पाऊस मग तो वळीवाचा असो की वर्षाऋतुच्या आगमनाचा. पहिल्या पावसाची रिमझिम सर असो की आषाढ श्रावणाच्या जलधारा. तो कायम आठवत राहिला. कधी पावसाच्या थेंबात तर कधी डोळ्यातील आसवात. तिचे पहिले प्रेम ती कशी विसरू शकणार होती?


“धराऽऽ कशी आहेस?” काल म्हटल्याप्रमाणे आज त्याचा परत कॉल आला.


“मी मस्त आहे. तुला मात्र माझी बरी आठवण झाली रे. ती ही इतक्या वर्षांनी?” तिने डोळ्यांच्या कडा पुसत विचारले.


“आठवण काय गं, हल्ली सारखीच येते. फक्त तुला कॉल करण्याची हिंमत तेवढी होत नव्हती.” त्याचे प्रामाणिक उत्तर.


“आदि, आता परत कॉल कधी करशील की नाही माहिती नाही पण मला तुझ्याकडून उत्तर हवंय. माझ्याशी असा रे का वागलास?” तिचा स्वर कातर झाला होता.


“सॉरी गं. अगदी मनापासून सॉरी. मी का तसा वागलो मला नाही कळले. कदाचित मी बालिश होतो म्हणून तुला समजून घ्यायला कमी पडलो. पण त्याची सजा अजूनही मी भोगतोय गं.” तो हळव्या स्वरात म्हणाला तसे तिला रडू कोसळले.


“धरा, ऐक ना. तुला आवडेल की नाही माहिती नाही पण मला तुला भेटायचंय. एकदा तरी. प्लीज?” त्याचे ते अर्जव तिला थेट वीस वर्षांपूर्वीच्या दिवसात घेऊन गेले.


“मला नाही भेटायचेय.”


“तू किती दुखावली आहेस ते मला ठाऊक आहे. धरा, तू देशील ती सजा भोगायला मी तयार आहे गं. प्लीज भेट ना एकदा.”


“आदि, तुला सजा द्यायची असती तर ती केव्हाच दिली असती रे; पण माझं पहिलं प्रेम होतास तू.. अजूनही तूच तो आहेस. कितीही वाईट वागला असशील तरी तुझ्याबद्दलच्या त्या भावना अजूनही तश्याच आहेत रे. मी तुला काय सजा देऊ?” तिचा हुंदका फुटला.


“ए, प्लीज रडू नकोस ना. रडताना अजिबात चांगली दिसत नाहीस.”


“हो? मी कशी दिसते ते तुला आठवतं?”


“न आठवायला काय झालं? तुझ्या हनुवटीवरचा तो छोटुसा तीळ, तुझं स्माईल, गालावर पडणारी ती गोड खळी.. सारंच आठवतं.” त्याने यादी वाचायला सुरुवात केली आणि ती मनोमनी शहारली.


त्याच्या बोलण्याने आरशासमोर जाऊन उगाच ती रेंगाळली. डोळ्यातील अश्रू पुसत ओठ हलकेच रुंदावले. गालावर पडणारी ती छोटीसी खळी आणि आणि हनुवटीवरच्या तिळावरून तिने अलवार हात फिरवला.


हा तीळ आपले सौंदर्य वाढवतो, ही खळी आपल्या हसण्यावर चार चांद लावते हे इतक्या वर्षात तर ती विसरूनच गेली होती. अंबरने कधी या तिळाची आणि खळीची स्तुती केल्याचे तिला स्मरत नव्हते.


“आदि, आपण नको बोलायला.” अंबरची आठवण येताच तिने त्याला म्हटले.


“का?”


“मला भीती वाटते रे.”


“कसली भीती?”


“तुला गमावण्याची. एकदा गमावले होते आता परत हिंमत नाहीये रे.”


“धरा, चिल यार. मी आहे ना? लेट इट फ्लो. जे घडतंय ते घडू दे की. का स्वतःला थांबवतेस? तुझ्याशी मी जे वागलोय त्याचा गिल्ट अजूनही माझ्या मनात आहे गं. तो दूर सारायची एक तरी संधी दे ना, प्लीज?”


आदित्यचे ते मनापासून बोललेले शब्द तिच्या काळजात घर करत होते. इतकी वर्ष तो तिच्याशी चुकीचे का वागला या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात स्वतःला हरवलेली ती त्याच्या एका सॉरीने पार विरघळली होती.


इतक्यात अंबरचे असे कामापुरते वागणे, सगळ्यांचे तिला गृहीत धरणे यामुळे तसेही तिला आतल्याआत कुढल्यासारखे होत होते. सगळे समोर निघून जात असताना आपणच आयुष्यात एकाच ठिकाणी साचलेल्या पाण्यासारखे थांबले आहोत ही खंत तिला स्वस्थ बसू देत नव्हती.


“आदि, तुला खरंच माझ्याबद्दल काही वाटतंय?”


“धरा, स्टील आय लव्ह यू. तू माझ्या मनात आहेस गं. मलाच उमगायला वेळ लागला.”


“खरंच अजूनही प्रेम करतोस माझ्यावर?”


“खरंच.” त्याचा तिच्या काळजात घातलेला हात आणि तिचे भरुन आलेले डोळे.


“यार, का तेव्हा सोडून गेलास रे मला? का आपलं नातं नाकारलंस? माझं सगळं आयुष्य मेस होऊन गेलंय. आपण दोघं एकत्र सुखात असतो ना रे.”


“मग आता नको ना गं स्वतःला थांबवू. या प्रवाहाबरोबर वाहू दे ना स्वतःला.”


लेट इट फ्लो.. त्याने वापरलेला तो शब्द!


‘खरंच वाहत जाऊ ना या प्रवाहाबरोबर? आदि माझं पहिलं प्रेम आहे, ज्याला मी कधीच विसरू शकणार नाही. इतक्या वर्षांनी परत आलाय तो. तो हवाय मला. कारण माझं अजूनही त्याच्यावर तितकंच प्रेम आहे. काय चूक आहे या प्रवाहाबरोबर वाहत जाण्यात? प्रेमच तर करतेय मी? आणखी चुकीचं काहीच नाही. प्रेमापेक्षा कुठे काय श्रेष्ठ असतं?’


स्वतःच्या प्रश्नात अडकलेली ती स्वतःच उत्तर शोधण्यासाठी धडपडत होती आणि मनाने कौल दिला
काहीच चुकीचे नाहीये. सर्वांसाठी जगत आलीहेस आता स्वतःसाठी जगून बघ.

स्वतःसाठी काही करायला कुणाच्या परवानगीची काय गरज? आणि परवानगीची गरज असेल तर.. हैं तुझे भी इजाजत!


‘बेरंग सी हैं पडी जिंदगी,
कुछ रंग तो भरू
मैं अपनी तनहाई के वास्ते
अब कुछ तो करू..’ गाण्याच्या ओळी आळवत तिने डोळे गच्च मिटून घेतले.


महिन्याभराची पहिल्याच प्रेमाची ओळख पुन्हा नव्याने होऊ लागली होती. ते गुंतणे, त्याच्या मेसेज किंवा फोनची तासन् तास वाट बघत असणे.. पुन्हा ही धरा वीस वर्ष मागे गेली होती. त्याच्या प्रेमात चिंब न्हाऊन निघत होती. वीस वर्षांचा हा विरह तिला आत सहन होत नव्हता.


“भेट की रे लवकर. आयुष्याचा काही भरवसा नाहीये बघ. आज काय घडेल नि उद्या काय काहीच सांगता येत नाही. तुला भेटल्याशिवाय आता नाही रे राहवत.” शेवटी मनातील बोललीच ती.


“वेडीच आहेस. असं नको बोलूस. तुला भेटण्यासाठी मी किती आतूर आहे हे तुलाही ठाऊक आहे. तू म्हणशील तर उद्याच तुझ्या पुढ्यात येऊन उभा राहतो.”


त्याच्या त्या बोलण्याने धरा जमिनीवर उरलीच कुठे? उंचचउंच आकाशात केव्हाच विहारायला लागली होती. त्याच्या आठवणीशिवाय क्षणभरही स्वस्थ बसवत नव्हते. प्रत्येक क्षणाक्षणात आता केवळ तोच वसला होता.. तिचा आदि, तिचे पहिले प्रेम!


“काय गं? बरं नाहीये का तुला?” रात्री नवऱ्याने तिला जवळ घेत विचारले.


“नाही तर. मी बरीच आहे की.”

“डोळ्याखाली बघ कशी डार्क सर्कल्स आलीत. मोबाईलचा वापर जरा कमी कर आणि रात्री जरा लवकर झोपत जा. धरा, कुठल्याही गोष्टींची अती सवय लागणे वाईट गं.” तिच्या चेहऱ्यावरून अंबरने हात फिरवला.


“आणि ऐक. मी रजेचा अर्ज टाकलाय. आपल्या ॲनिव्हर्सरीला आपण बाहेर जातोय. आतातरी खुश ना?” स्वप्न पाहिल्यागत ती त्याच्याकडे बघतच राहिली.

______


“धरा आपण रिसॉर्टला पोहचलोय गं. स्वप्नातून बाहेर पड जरा.” आदित्यने कारचा ब्रेक लावत म्हटले तसे ती भानावर आली.


“खरंच की रे, काही स्वप्न किती भारी असतात ना? त्यातून बाहेर पडावंस वाटतच नाही. तूही तसाच. तुझ्या विचारातून बाहेर पडताच येत नाही.” ती स्मित करत कारचा दरवाजा उघडायला लागली.


“एक मिनिट मॅडम, मी आहे की.” तिला थांबवत बाहेर येत त्याने तिच्या बाजूचे दार उघडले आणि हात समोर केला.

:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
_______


🎭 Series Post

View all