हैं तुझे भी इजाजत.भाग -५(अंतिम भाग.)

वाचा एक अलवार प्रेमकथा.
हैं तुझे भी इजाजत!
भाग -५ (अंतिम भाग.)

“धरा अजूनही किती भारी दिसतेस गं? तुझी ही स्माईल, तुझी खळी अन् हा तीळ.. आजही तसाच आहे. हं, जरासं वय वाढलंय ते एकदोन रुपेरी केसावरून कळतंय. डोळ्याखाली थोडी काळी वर्तुळ दिसत आहेत पण तरीही त्यात सुद्धा तू सुंदरच भासते आहेस.” तो मनभरुन तिची स्तुती करत होता.


“आदि, चाळीशीच्या जवळ पोहचलेय रे. इतकी स्तुती ऐकून असं वाटतंय की तुला ना कवी व्हायला हवं होतं.” ती हसून म्हणाली.


“हम्म. तसा आहेच मी कवी; पण कधी व्यक्त होता आलं नाही. तुला सांगू? मला आणखी काय जास्त आवडलंय?”


“काय?”


“तुझा ड्रेस. मुद्दाम हा रंग घातलास ना? तुला आठवते? पहिल्यांदा आपण भेटलेलो तेव्हाही हाच रंग तू घातला होता.”


“न आठवायला काय झालं? पिवळा रंग प्रेमाचा. म्हणून तर मुद्दाम आजच्यासाठी हा रंग राखून ठेवला होता. चल बसुयात?”


बोलता बोलता दोघे त्यांच्या बुक केलेल्या टेबलजवळ येऊन पोहचले. मुद्दामच एखाद्या हॉटेलमध्ये न भेटता शहराबाहेरच्या रिसॉर्टमध्ये भेटायचे त्यांनी ठरवले होते. तिथे वेळेचे बंधन असणार नव्हते त्यामुळे बोलायला भरपूर वेळ मिळणार होता.


“काय ऑर्डर करूयात?” त्याचा प्रश्न.


“पहिल्यांदी चहा.”


“अगं पण तुला आवडत नाही ना?”


“पण तुला आवडतो की. तुझ्यासारखी चहाप्रेमी नसले तरी एक-दोन कप कंपनी नक्कीच देऊ शकते.”


“धरा, आय रिअली मिस यू. तुझं हे वागणं, तुझी काळजी घेणं सारंच खूप मिस केलं गं. तू मला माफ करशील असं वाटलं नसताना तू भेटायला आलीस, थँक यू. थँक यू सो मच.”


“आदि, आयुष्य असंच असतं नाही? जेव्हा आपल्याला हवी असणारी वस्तू आपल्याजवळ असते तेव्हा तिची किंमत आपल्याला कळत नाही आणि नसते तेव्हा तिच्या मागे नुसतं धावत फिरतो आपण.


इतकंही कश्यामागे धावू नये रे की धावताना आपल्या पायाऐवजी मन दुखायला लागेल.” चहाचा घोट घेत ती म्हणाली.


“म्हणजे?”


“म्हणजे बघ ना. आपल्याला भेटण्यासाठी किती पायपीट करावी लागली? तू तुझ्या बायकोला खरं काय ते बोलला नसशील. मी तरी अंबरला कुठे काय सांगू शकले? अखेर आज आपण भेटलो; पण किती वेळासाठी? आजच्या भेटीचे फलित काय असेल माहितीये? पुन्हा नव्या भेटीचे वेध लागतील आणि मग पुन्हा काहीतरी नवे जुगाड करावे लागतील. अश्याने मन थकेल रे. दोघांचेही.”


“धरा, नेमकं तुला काय म्हणायचंय?”


“आदि, प्लीज चुकीचं समजू नकोस; पण आपण थांबवूयात हे सारं? हे काहीसं एक्स्ट्राच्या अंगाने जातंय असं वाटायला लागलंय.”


“गुड! म्हणजे तू आता आपल्या नात्याला एक्स्ट्राचे लेबल लावते आहेस. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती धरा.” तो दुखावला गेला होता.


“नॉट एक्झ्याक्टली लाईक द्याट. अगदीच तसं नसलं तरी आजकाल हे फॅड आलंय. काय म्हणतात त्याला? हं, सिच्यूएशनशिप. असं आता वाटू लागलंय. म्हणजे मला घरात जरा कमी प्रेम मिळतंय म्हणून मी ते तुझ्या रूपात शोधतेय अँड वाईस वर्सा..”


“धरा, खूप चुकीचा विचार करते आहेस तू. माझ्या मनात असं काही नाहीये. अगं आपली फॅमिली एका बाजूला नि आपण एका बाजूला. फॅमिलीसाठी जे आवश्यक आहे ते करतोहेच की आपण.”


“असं आपण फॅमिलीला वेगळं नाही ना रे करू शकत.”


“धरा, तुझं माझ्यावर खरंच प्रेम आहे ना?”


“आदि,माझं पहिलंवहिलं प्रेम आहेस रे तू. तुझ्यावर जेवढे प्रेम पूर्वी होते ना तेवढेच आजही आहे, कायम राहील. माझ्या मनातील तुला कोणीही हिरावू शकणार नाही.”


“म्हणजे मी तुझ्या मनातच राहावं असं तुला वाटतंय?”


“सी, आपण पुरेसे मॅच्यूअर्ड आहोत. काय योग्य नि काय वाईट हे कळतंय रे आता. वीस वर्षांपूर्वीचे बालिश धरा आणि आदित्य नाही राहिलोत रे आता. मनापासून सांगते की हे थांबवायला हवे. इथेच.

तुला ठाऊक आहे तुझी सवय लागलीये रे मला आणि एखाद्याची अती सवय जडणे हे वाईटच. मग ती सवय वस्तूची असो की व्यक्तीची किंवा मग नात्याची.”


“तू ना लेखिका व्हायला हवी होतीस.” तो पुसटसा हसला.


“शर्माजी, लेखक तर प्रत्येकाच्या आत वसला असतो. गरज असते ते आयुष्य वाचता येण्याची.” ती देखील मंद हसली.


“हो? मग काय वाचलंस या आयुष्यात?” त्याचा मिश्किल प्रश्न.


“मी वाचलं.. बरंच काही. धराच्या आयुष्यातील आदित्य आणि अंबरलाही.”


“म्हणजे?”


“म्हणजे वीस वर्षांपूर्वी ‘तुझ्यावर माझे प्रेम आहे का?’ या प्रश्नाचे उत्तर तू विचारलं होतंस. तू पुढे निघून गेल्यावर जेव्हा अंबर आयुष्यात आला ना तेव्हा त्याने डायरेक्ट मला लग्नाबद्दल विचारलं रे. तू मला काही क्षणासाठी मागू पाहत होतास. अंबरने मला आयुष्यभरासाठी मागितले. आता हेच बघ ना, माझ्या डोळ्याखाली आलेल्या काळ्या वर्तुळात तुला सौंदर्य दिसलं तर मला काही झालं असेल अशी अंबरला काळजी वाटली.


खरं प्रेम हे असंच असतं आदि. सुरुवातीच्या काळात आपण एकमेकांसाठी किती खास आहोत हे दाखवण्यात जातं; पण जसं हे प्रेम मुरत जातं ना तसे माझे तुझ्यावर प्रेम आहे हे सांगावे लागत नाही रे, ते तर कृतीतून कळत जातं.


अंबरला माझ्यासाठी वेळ नसतो, तो मला पुरेसा वेळ देत नाही असे मला कायम वाटत आलेय; पण तो त्याच्या प्रेमाच्या व्यक्तीसाठीच दिवसरात्र झटत असतो हे खरे आहे ना? त्याचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून तर त्याला माझी काळजी वाटते. भलेही प्रेम आहे हे त्याला दाखवून देता येत नसेल पण प्रेम आहेच की.” एक दीर्घ श्वास घेत ती म्हणाली.


“आता मी काय करू गं? एका ठिकाणी स्तब्ध केलेस मला. पुढे पाऊल टाकावं तर तुला वाईट वाटते.
थांबवतेस मला. मागे परत जाऊ शकत नाही. जायचं ही नाहीये. बस्स! स्तब्ध निर्जीव उभा आहे. तूच सांग मी काय करू?” त्याच्या डोळ्यात अश्रू दाटले.


“मागे परत नको जाऊ ना; पण आणखी पुढेही नको जाऊया. थांबूया इथेच. हं?” त्याच्या हातावर तिने हात ठेवला. तिच्याही डोळ्यात आभाळ दाटले होते.


“हम्म. तू म्हणतेस तसंच. तुझी कुठलीही सजा मला मंजूर असेल. किमान माझ्या वाट्याला एक मिठी तरी असेल ना गं?” त्याच्या डोळ्यातील एक टपोरा थेंब तिच्या हातावर पडला.


“आदी. मला वाटलं होतं की तुला भेटेन तेव्हा धावतच तुझ्या मिठीत विसावेन. तुझ्या कुशीत डोके ठेवून मनसोक्त रडेन. तुझ्याशी भांडेन, तुला मारेन. तू पूर्वी तसा का वागलास याचा जाब विचारेन. पण प्रत्यक्षात भेटलो तेव्हा असं काहीच घडलं नाही रे. किती विचित्र नाही?” तिने रडतच त्याच्या मस्तकावर तिचे मस्तक टेकवले.


“धरा, रडू नकोस गं. तू खरंच रडताना वाईट दिसतेस.” तो किंचित हसून म्हणाला तशी तिही हसली.


“तू सुद्धा.” त्याला टपली देत ती.

दोघांच्याही डोळ्यातून अश्रू ओघळायला आणि बाहेर पावसाने फेर धरायला एकच गाठ पडली.


“धरा, पावसाला सुरुवात झालीये. भिजशील तर सर्दी पडसे होईल. आडोश्याला चल की गं.”


“आदि, तब्बल वीस वर्ष! तू ब्रेकअप केलेस नि त्यानंतर मी पावसात कधी भिजलेस नाही रे. आज सगळी किल्मिष दूर झालीत, तेव्हा भिजू दे ना.” तिने पावसात दोन्ही हात पसरले आणि डोळे मिटून घेत वरून बरसणाऱ्या जलधारा चेहऱ्यावर झेलू लागली.


तो तिथल्याच झाडाखाली उभे राहून तिला न्याहाळत होता. जणू त्याचे मन तिच्यासाठी गात होते..

‘..जब मिले थोडी फुरसत, खुदसें कर लें मोहब्बत
हैं तुझे भी इजाजत कर लें तू भी मोहब्बत..’

-समाप्त-
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
___________


🎭 Series Post

View all