भाग २
तेवढ्यात, डोअर बेल वाजली. मंदारने दरवाजा उघडला. "आशाताई आहेत का?" समोरून विचारण्यात आलं.
"हो... आहेत ना." म्हणत... मंदारने त्यांना घरात बोलावलं.
"आई..." मंदारने, आवाज दिला तशा आशाताई रूममधून बाहेर आल्या.
"आशाताई तुम्ही सांगणार होतात? सांगितलं नाही. शिव दर्शनाला येताय ना तुम्ही?" आलेल्या ताईंनी विचारलं.
"थांब.... विचारून, सांगते मी लगेच." आशाताई, मंदारच्या रूममध्ये शिरल्या.
"मंदार अरे, सगळ्या बायका महादेवाला जातायेत. जावू का त्यांच्यासोबत..." आशाताईंनी विचारलं.
"तुला जायचं तर जा.." एवढं बोलून तो थांबला. कोण आहे सोबत वगैरे, मंदारने काहीच विचारलं नव्हतं. आशाताईंनी बाहेर येऊन येत असल्याचं सांगितलं.
"थांब हा, पैसे घेऊन जा.." रक्कम किती ते विचारून त्यांनी हातोहात पैसे सुद्धा देऊन टाकले.
मंजिरी चहा करत होती.. घरात आल्यागेल्याला बसायला सांगून चहा पाणी देणारी संस्कृती... पण , "चहा झालाच आहे, तर चहा घेऊन जा थोडा" म्हणण्याचं धाडस, आशाताईंना झालं नाही. त्यांना वाईट वाटलं....
"चहा घ्यायला या."
मंजिरी लगेच स्वयंपाक घरातून तिघांसाठी चहा घेऊन आली. हॉलमध्ये, तिघेही चहा पित बसले होते.
मंजिरी लगेच स्वयंपाक घरातून तिघांसाठी चहा घेऊन आली. हॉलमध्ये, तिघेही चहा पित बसले होते.
"पैसा आला नाही की गेला..... असे पाय फुटतात ना हल्ली पैशाला, काही मोजदादच नाही. कसा येतो आणि जातो.. खर्च मागे लागूनच राहतात, महागाई पण एवढी... की काय बोलावं." मंजिरी पुटपुटली.
"कुठे जाणार आहात तुम्ही? कुठल्या मंदिरात?" मंदार विचारपूस करत होता.
"इथून सत्तरेक किलोमीटर दूर आहे वाटतं. स्वयंभू महादेवाचं मंदिर." आशाताईंनी पुसटशी कल्पना दिली.
मागच्या सोमवारी पण गेला होतात ना तुम्ही... मंजिरीच्या विचारल्यावर, आशा ताईंनी हलकेच मान डोलावली.
"मागच्या सोमवारी गेलेली, तेच मंदिर असेल ना?" मंदारने पुन्हा विचारलं.
"ते मंदिर जवळ होत. ऑटोनेच गेलो होतो आम्ही... हे थोड दूर आहे तर, गाडी बुक केलीय." आशाताईंनी सांगितलं.
"श्रावणात, दर सोमवारी महादेवाचं दर्शन घेताय. भरपूर पुण्य पदरी पडणार तुमच्या. महादेव प्रसन्न होणार. मस्त आहे बाबा तुमचं. मैत्रिणींसोबत प्रत्येक सोमवारी फिरायला जायला मिळतं."
"आपल्याला इथे कोणी ओळखत नाही. आपल्यापेक्षा जास्ती ओळख्या तर आईंच्या झाल्यात या बिल्डिंगमध्ये." मंजिरी हसत बोलली.
"भजनात जाते, म्हणून झाल्यात ओळख्या. मनमिळावू आहेत सगळ्या. या वयात आणि काय करणार? वेळ असतो.. एकत्र जमतो बरं वाटतं.... श्रावण आहे तर, त्यानिमित्ताने महादेवाचे दर्शन. एवढंच....." आशाताई बाजू सावरत बोलल्या आणि रूममध्ये निघून गेल्या.
"आईला वाईट वाटलं वाटलं, अचानक अशा निघून गेल्या.." मंजिरी हळूच पुटपुटली..
"काय माहिती? पण अचानक निघून गेली ना ती..." मंदारने दुजोरा दिला.
"पण मी तरी काय म्हणाले.. आपल्यापेक्षा जास्ती ओळख्या, झाल्यात त्यामुळे फिरणं वगैरे..." एवढंच तर बोलले मी. टोमणा मारला असं वाटलं असणार त्यांना. म्हणून गेल्या लगेच निघून, आजकाल कुणाला कशाचा राग येईल, वाईट वाटेल.. काही सांगता येत नाही. " मंजिरीने बोललेल्या शब्दांची सारवासारव केली.
आजकाल, आशाताई जरा बुजल्या सारख्या रहायच्या. फार कोणत्या विषयावर बोलायला टाळायच्या. मंदार आणि मंजिरी ऑफिसमधून आले की आपल्या रूममध्ये नित्यवाचन करत बसायच्या. जेवणात ही समोर आलं तेच.. रात्री, जेवण आटोपलं की बाहेर शतपावली करायला जात तोवर... झोपायची वेळ व्हायची. जरा सगळ्यांपासून अलिप्तच राहायला लागल्या होत्या.. हे मंदारच्या लक्षात आलं होतं.
"आई अहो, तुम्ही सकाळी मला विचारलं, डाळ तांदूळ भिजवायचे का म्हणून, भिजत घातले नाही तुम्ही?" मंजिरीने रूममध्ये डोकावून विचारलं.
"तू बोलली नाहीस... नेमकं काय आणि किती टाकायचं सांगितलं नाहीस. मग कशी टाकणारं मी?" आशाताईं बोलून थांबल्या.
"आई.... अगं टाकायचं ना बिनधास्त.... एवढं तेवढं काय तिला विचारायचं? तू तुझ्या मनाने टाकायचं ना.... उद्या छान इडल्या बनवल्या असत्या घरी." मंदार म्हणाला.
"ते... रेडीमेड बॅटर मिळतं ते घेऊन ये... " आशाताईंनी सल्ला दिला.
"नको.. मंजिरीने हळूच मान हलवली... आईंना आवडत नाही, रेडीमेड मिश्रणाची इडली. मंजिरी हळूच पुटपुटली.... असू द्या... उद्या ऐनवेळी बनवेल काही तरी...." मंजिरीने विषयांतर केलं...
"आई , हा घ्या लसूण... निवडून द्या बरं... निवडून असला की, बरं पडतं" मंजिरीने लसणाचे दोन गाठे निसायला आशाताईंना आणून दिले.. आशाताई, लसूण निसायला सोफ्यावर येऊन बसल्या.
"टीव्हीवर मराठी मालिका चालू होती.... मंदार सुद्धा हॉलमध्ये बसलेला. " बघ तुला काय बघायचं ते?" तो आल्या लगेच, आशाताईंनी रिमोट मंदारकडे सरकवला. "
"तुझी मालिका संपायची आहे....पहिले तू बघून घे, संपली की बघेन मी" मंदारने म्हटलं.
"नको... मला काय वेळच वेळ असतो... उद्या बघेन मी. बघ तू तुला काय बघायचं ते." आशाताईंनी लसूण निसण्यात लक्ष घातलं.
क्रमशः
शुभांगी मस्के...