Login

हक्क आणि कर्तव्य भाग ३

हक्क आणि कर्तव्य जाणीव नात्यांची
भाग ३

आशा  ताईंच लसूण निसण्यात लक्ष होतं.

मंदारने टीव्ही चा आवाज हळू केला. आणि म्हणाला.
"आई एक विचारू?"


"काय????".... आशाताईंनी प्रश्नार्थक नजरेने मंदारकडे बघितलं.


"आई तुला काय झालं? कशाचा राग आलाय का? काही चुकलं का आमचं? मंदार शांतपणे बोलला.


"नाही तर..." एवढं बोलून त्या पुन्हा लसूण निसायला लागल्या. 


"ठेव बरं तो लसूण... नंतर निवड..." मंदारने आशाताईंच्या हातून.. लसणाच भांड काढून घेतलं.


"का कुणास ठाऊक?? पण तू मला आजकाल जरा, बूजल्या बुजल्या सारखी वाटतेस." मंदार म्हणाला. 


"का तुला का असं वाटतंय? काहीच तर नाही झालं.. मी आहे तशी आहे... " आशाताई सारवासारव करत बोलल्या.


" एवढी वर्ष बघतोय मी तुला... एवढी वर्ष, घरातले, बाहेरचे सगळे निर्णय अगदी आत्मविश्वासाने घ्यायचीस तू. तो कॉन्फिडन्स आता राहिलाच नाहीये तुझ्यात. आजकाल, एवढ्या तेवढ्या गोष्टी आम्हाला विचारतेस. खाण्या पिण्याच्या बाबतीत सुद्धा... आम्हाला काय हवंय तेच... आजचंच बघ ना,  वर्गणीचा विषय असो की, उद्याच्या नाश्त्याला भिजत घालणं असू दे की बाहेर कुठे फिरायला जाण असू दे... आमच्या परवानगीची गरज का पडायला लागलीय तुला." 


"वर्गणी किती द्यायची? कमिटीच, ठरलेलं होतं... देऊन द्यायची होती.. दर्शनाला पण सोबत होती तर न विचारता हो म्हणता आलं असतं.. आणि मंजिरीने इडलीचे तांदूळ नाही सांगितले टाकायला तर तू टाकून द्यायचे होते." मंदार सोज्वळ स्वरात बोलत होता.


"मंदार अरे, वय वाढतं तसं.. आपोआप कॉन्फिडन्स कमी होत जातो माणसाचा... रस्ता क्रॉस करताना, पाहिले मी तुझा हात पकडायचे आता तुझा हात पकडला की... मी निर्धास्त असते." आशाताई समाधानाने बोलल्या.


"आई वय हेच कारण आहे की अजून काही..... बाबा गेले आणि तू इकडे आलीस... घर बदललं, जागा बदलली.... हे तर कारण नाहीये ना." मंदार म्हणाला.


"आई, तुला परकं तर वाटतं नाही ना गं इथे?" मंदार स्पष्टच बोलला. 


"नाही रे... परकेपणा का जाणवेल मला.. नवीन आहे का हे घर माझ्यासाठी...  घर माझं, मुलगा माझा, सून माझी.. नातवंड पण माझीच." आशाताईंनी, घरातल्या भिंतीवर नजर फिरवली. भिंतीवर अडकवलेल्या हार घातलेल्या त्यांच्या यजमानांच्या फोटोवर त्यांची नजर स्थिरावली आणि त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. 


"आई.... काय झालं? बाबांची आठवण आली का गं?" मंदारने विचारलं.


त्यांनी डोळ्यातलं पाणी हळूच पदराने पुसलं.


" काय झालं?" मंदारने पुन्हा विचारलं.


"मंजिरी.... मंजिरी..." मंदारने मंजिरीला जोरात आवाज दिला. 

मंजिरी स्वयंपाक करता करता, ओढणीला हात पुसत लगेच बाहेर आली. 


"का? काय झालं?" मंजिरीने विचारलं.


"काही नाही, बस इथे... गॅस बंद करून ये." मंदारने मंजिरीला बाजूच्या सोफ्यावर बसायला सांगितलं.


"आजकाल, आई शांत असते... गुमसुम वाटते.. काही तरी मनात दडवून ठेवल्यासारखी वागते. तुला पण जाणवलं ना.." मंदारच्या बोलण्यावर मंजिरीने हळूच मान डोलवली. 


"उगाच विचार करता तुम्ही... काही झालं नाहीये मला..." आशा ताईंनी निर्वाणीच उत्तर दिलं.. गप्प झाल्या.

"आई अगं, बोलण्याने प्रश्न सुटतात... काही मनात असेल तर बोल आमच्याशी...... !"  मी लहान असताना तू मला हेच सांगायचीस आता, मी तुला सांगतो... मंदार म्हणाला

आई, तुम्हाला बरं तर वाटतय ना.... बीपी  शुगर, रूटीन चेक अप रेग्युलर सुरू असतं पण काही होतेय का तुम्हाला? डॉक्टरकडे जावूया का आपण." मंजिरीने काळजी व्यक्त केली.

"नाही ग, बरंय मला....!" आशाताई शांतपणे म्हणाल्या.

"पण काय माहिती, आजकाल हातून काही चुका होतील का, उगाच भीती वाटतं राहते. घरात काही काम करताना, तुमची महागातली क्रोकरी तुटेल का फुटेल का?  कप फुटला तर काय? शुल्लक गोष्टींची सुद्धा भीती वाटते. आमच्या वेळी वेगळ होतं, अघळपघळ असायचं सगळं. घरात येणारे जाणारे असायचे, घरात माणसं होती. कमी जास्ती ऍडजस्ट व्हायचं.... आता इन मिन तीन माणसांसाठी अंदाजच बांधला जात नाही. त्यात तुमचं, हे खायचं, ते नाही खायचं... डाएटचे प्रोटीन शेक आणि मिलेट्स वगैरे... खाण्यापिण्याच्या गोष्टी असो की पैशाच्या.... दडपण येतं.... तुम्ही फार कुणाचं लावून घेत नाही. मला मात्र,  जुनी सवय भोवताली आपुलकीची लोक लागतात." आशाताई बोलता बोलता थांबल्या.

"आई पण आम्ही आहोत ना.... आमचं चुकतंय का काही? मंदारने मंजिरीकडे बघत विचारलं.

"आई, हे बघ... हे घर आम्ही आमच्या कमाईतून घेतलेलं असलं तरी... या घरावर पहिला हक्क तुमच्या दोघांचा. बाबा नाहीत आता, माहिती आहे बाबा नसल्याने एक पोकळी निर्माण झालीय आपल्या आयुष्यात, ती नाहीच कधी भरून निघणार." मंदार बोलताना हळवा झाला.

"पण तुझी काळजी घेणं आमचं पहिलं कर्तव्य... तुझा हक्क आणि आमचं कर्तव्य... नंतर सगळं.. कळलं का?"

"अगदी घरातली प्रत्येक वस्तू आम्ही आमच्या पसंतीने घेतली असली, मग ती क्रोकरी असो की हा स्मार्ट टीव्ही... फुटेल तर फुटेल, बिघडेल तर बिघडेल.. फार नाही विचार करायचा."


"हा स्मार्ट टीव्ही सुरवातीला तुला नव्हता चालू करता येत. हळूहळू शिकवलं तुला. आम्हाला ही माहिती आहे. टेक्नॉलॉजीच हे जग... कठीण असणारं... आणि काही चूक झालीच, तर ती तू मुद्दाम केलेली नसेल. आमच्यापेक्षा कणभर जास्त जबाबदारीने वागतेस तू, विश्वास आहे आम्हाला... "


"आम्ही सुद्धा दोन मुलांचे आईबाबा आहोत.. मुलं चुकतील आणि आईबाबा आपल्या मुलांच्या लाख चुका पोटात घालतील. परंतु आईवडिलांना देखील, आनंदी राहण्याचा  आणि स्वतःच मन जपण्याचा अधिकार आहे.  आईवडील मुलांना जन्म देतात, त्यांना शिकवतात, मोठ करतात, त्यांसाठी त्यांना किती त्याग करावे लागतात. स्वतः च्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून, मुलांच्या आवडी निवडी पुरवाव्या लागतात. मग  आता, आयुष्याच्या या पाडावावर... मनाप्रमाणे जगण्याचा तुला सुद्धा अधिकार आहेच." मंदार बोलत होता.
क्रमशः
शुभांगी मस्के...


0

🎭 Series Post

View all