भाग ५
तिघेही एकमेकांकडे फक्त बघत होते... अगदी शांतपणे.
मंजिरीने जेवणाची ताट वाढली. जेवणं आटोपली... बाहेर छान रिमझिम पाऊस सुरू होता. बडीशोप चघळत पुन्हा सगळे सोफ्यावर बसले.
आशा ताई बोलायला लागल्या...
"मागच्या आठवड्यात आम्ही एका शिव मंदिरात गेलेलो. आमच्यातल्याच एक, त्यांची सुद्धा इच्छा होती आमच्याबरोबर दर्शनाला यायची. पण त्यांची सून पटकन म्हणाली.. जायलाच पाहिजे का? सगळी मंदिर सारखीच, कशाला गर्दी करायला जायचं मंदिरात." इच्छा असूनही त्यांना येता आलं नाही.
"आमच्यातल्याच एकीने, घरी न सांगता दर्शनाला येणं पसंत केलं. पण आल्यावर मुलाला कळलं तर तो खूप रागावला म्हणाला उद्या काही कमी जास्ती झालं तर जबाबदार कोण? कुठे जायचं नाही गपगुमान घरात बसायचं." त्यांना बजावलं.
"आमच्यातल्याच एक, वयस्कर आहेत. भजनात येतात.. भजनाला येताना प्रत्येकजण, प्रसादाला काही तरी घेऊन येतात. खडीसाखर, कधी गुळ शेंगदाणे, तर कधी गुळ खोबरं वगैरे.. त्यांना मात्र उजगिरीने काहीच आणता येत नाही. त्यांची इच्छा असते पण सून घरात. त्या म्हणतात भजनाला येऊ देते तेच खूप."
"मध्यंतरी, आम्ही भजनासाठी लागणार सगळं साहित्य घ्यायचं ठरवलं. ढोलकी, तबला, पेटी... वगैरे," आशाताई सांगत होत्या.
"मी दिलेले पैसे, म्हणजे मंजिरीला द्यायला सांगितले होते." मंदारने मध्येच अडवलं आणि हळूच मंजिरीकडे बघितलं. "दिलेस ना तू आईला पैसे." मंदारने विचारलं.
"हो तिने दिले मला पैसे..." आशाताईंनी सांगितलं.
"मी दिले रे पैसे, पण एक आहेत आमच्यातल्याच. भजनाला येतात.. छान पहाडी आवाज आहे त्याचा.. सगळी भजन तोंडपाठ असतात. त्यांचा मुलगा त्यांना खूप रागावला म्हणे. घरचा खर्च, हफ्ते वगैरेच कारण सांगून त्याने विषय टाळला. पैसे तर दिलेच नाही, अखेर हळूहळू त्यांनी भजनात यायचं बंद केलं. दिसल्या की, आम्ही त्यांना म्हणतो.. नाही तर नाही निदान भजनाला तरी या. पण त्यांच्या स्वाभिमानाला चटका बसला, कशा विसरतील त्या?"
"मध्यंतरी... एकीच्या हातातून, घरी टेबलवर ठेवलेलं फ्लॉवर पॉट फुटलं... आता सून खरडपट्टी काढेल म्हणून, एवढ्या घाबरल्या होत्या त्या, की काय सांगू."
"मध्ये एक दिवस, एकीने आपल्या नातीला बागेत फिरायला आणलं. नात घसरगुंडीवरून घसरताना पडली.... तुझंच लक्ष नसेल? माझी मुलगी पडली वगैरे... त्यांच्या मुलाने त्यांनाच धारेवर धरलं... आमच्या सर्वांसमोर त्यांच्यावर रागवायला जरा सुद्धा मागे पुढे बघितलं नाही. बिचाऱ्या रडायला लागल्या. पडून लगेच खेळायला लागलेल्या, त्याच्या छोट्या लेकीच्या डोळ्यातली आसवं मुलाला दिसली पण आईच्या डोळ्यातली आसवे त्याला दिसली नाही."
"अशा अनेक जणी आहेत रे परिचयाच्या.... जगता सुद्धा येत नाही आणि मरता सुद्धा येतं नाही. आपला स्वाभिमान बाजूला ठेवून अपमान मुकाट्याने गिळत राहतात. "
"खाली बागेत दोघे, नवरा बायको फिरायला येतात. स्वतःची पेन्शन आहे. तरी सुद्धा, एका एका पैशासाठी मुलासमोर हात पसरावे लागतात. मुलाने पैसे दिल्यावर " तुम्हाला कशाला हवेत पैसे?" चार गोष्टी सुनेच्या ऐकाव्या सुद्धा लागतात."
"मध्यंतरी आम्ही भिशी टाकली.... पंधरा पैकी, दहा जणी तयार झाल्या. प्रत्येक महिन्यात पैसे भरावे लागायचे. उपकार केल्यासारखे मूल जेव्हा भिशी टाकण्यावरून बोलायला लागले तेव्हा हळूहळू आमची भिशी बंद पडली.... "
"असेही असतात लोक, बापरे... मंदारला आश्चर्याचा धक्काच बसला होता. एवढ्या चांगल्या सोसायटीत राहणारे, सुशिक्षित लोकही असे वागतात आपल्या आईवडिलांशी. आणि महत्वाच म्हणजे स्वतःची पेन्शन असल्यावर सुद्धा उजगिरी नाही." त्याचं त्याला जास्ती नवल वाटलं होत. "
"एक, काकू काका आहेत.. म्हातारे आहेत ते बिचारे, नातवंडांना सांभाळायला म्हणून ते गावावरून शहरात आले. मुलाला फ्लॅट घ्यायचा म्हणून.... आपलं रहातं घर विकून मुलाला फ्लॅट घ्यायला पैसे दिले. पण झालं उलट आता त्याचं गावच हक्काच घर ही गेलं आणि इथे उपेक्षित जीवन वाट्याला आलं. सून तर सून पण मुलगा ही, जेवले का म्हणून सुद्धा विचारपूस करत नाही? सांगतात तेव्हा वाईट वाटतं. "
"तुम्ही का दिले त्यांना पैसे?" सोसायटीतले लोक त्यांनाच दोष देतात.. तेव्हा म्हणतात आज ही त्यांचचं होतं आणि उद्या ही त्यांचंच... उद्या प्रॉपर्टीवरून भांडण्यापेक्षा, हिस्से करून दिले... आता पश्चाताप करतात पण आता फायदा नाही.. सगळे सारखेच, म्हातारपणात जाणार तरी कुठे?" म्हणतात आणि सहन करतात.
भजनी मंडळात सर्वांनी एकसारख्या साड्या घ्यायचं ठरलं. पण घरी काय म्हणतील? तेवढीशी गोष्ट सुद्धा, शक्य होत नाही सर्वांना.
हे वय राहिलं का मज्जा करायचं, मनाप्रमाणे जगायचं.. असे म्हणतात तेव्हा वाईट वाटतं.... स्वतःच्या मनाप्रमाणे जगणं विसरून गेलीत.
"खूप दुःख आहे या जगात. लोकांचं ऐकल्यावर आपण खूप सुखी असल्याचं जाणवतं.... मला माहिती आहे तू आणि मंजिरी दोघे ही चांगले आहात, मला जपता... सरड्यासारखी माणसं रंग बदलताना बघते आणि ऐकते, तेव्हा मन खचतं माणसाचं. आपल्याच माणसांकडून लोक फसवली जातात तेव्हा भीती वाटते. आशाताई बोलत होत्या.. मंदारने आईचा हात हातात घेतला...
"आई!!!" पुढे तो काही बोलूच शकला नाही. फक्त हात हातात घेऊन... बरंच वेळ आईच्या मांडीवर डोक ठेवून फक्तच बसला होता. आपल्या हातून तर या चुका घडत नाहीयेत ना जणू काही आत्मपरीक्षण करत होता. "हक्क आणि कर्तव्य...." जाणीव नात्यांची.
समाप्त
शुभांगी मस्के...