भाग १
303 इ बिल्डिंग, मिस्टर मंदार तुम्हीच का? स्वतःच नाव ऐकताच, मंदारने मागे वळून आवाजाच्या दिशेने बघितलं. एक काका, पटापटा पावलं टाकत, घाईने मंदारकडे येत होते.
मंदार थबकला, "हो मीच मंदार."
"मी सोसायटीचा अध्यक्ष... पी. एस. पवार..." पवारांनी, शेक हॅण्ड करण्यासाठी हात पुढे केला.
"नमस्कार... " म्हणत, मंदारने हात मिळवला.
"मी परवा आलो होतो तुमच्या घरी... गणपतीची वर्गणी घ्यायला. सोसायटीत गणपती बसणार आहे आपल्या." पवारांनी सांगितलं.
"ओके...... आई होती घरी. आईने दिली असेल ना वर्गणी. आम्ही दोघेही म्हणजे, मी आणि माझी बायको ऑफिसला जातो. आई घरीच असते." मंदारने सांगितलं.
"हो..... होत्या त्या घरी. पण वर्गणी मुलगा देणार म्हणून बोलल्या त्या. तुम्ही आता दिसलात, म्हटलं ओळख होईल आणि वर्गणी ही मागून घेता येईल. कारण का, माझी एवढ्यातच अध्यक्ष पदावर नियुक्ती झाली, नवीन आहे मी." पवार बोलते झाले.
"किती द्यायचीय वर्गणी..." मंदारने विचारलं.
"तुमच्या मर्जीने, शक्य तेवढी देऊ शकता पण कार्यकारी मंडळातील सदस्यांना, एक हजार पेक्षा कमी देता येणार नाही."
"आशाताई, तुमच्या आई... आपल्या सोसायटीच्या कार्यकारी मंडळात आहेत. भजनी मंडळाच्या सदस्य आहेत. सर्व कार्यात अग्रेसर असतात." पवार कौतुक करत बोलले.
"ओके..... आता सध्या पैसे नाहीत माझ्याकडे पण संध्याकाळी आणतो काढून किंवा बँक ट्रान्स्फर असेल तर करतो." मंदार बोलला.
"ओके..... संध्याकाळी निवांत द्या. काय न की, नोकरी करणारे तुम्ही लोक, दिवसभर ऑफिसमध्ये जाता त्यामुळे भेट होत नाही. तसे आम्ही सुट्टीच्या दिवशीच फिरतो वर्गणीसाठी.. पण त्या दिवशी तुम्ही नव्हतात." पवारांनी पुन्हा हात पुढे केला. मंदारने हात मिळवला.
"ओके निघतो." म्हणत मंदार ऑफिसमध्ये निघून गेला.
"मंजिरी, उद्या सुट्टी आहे न तुम्हाला. नाश्त्यासाठी काही भिजवायला टाकायचं आहे का. इडली, डोसे बनवायचे असतील तर डाळ तांदूळ आजच भिजवावे लागतील." आशाताईंनी मंजिरीला विचारलं.
"आई, उशिर होतोय मला. बघा, काय टाकायचं ते." पायात बूट सरकवत मंजिरी पटकन गडबडीने ऑफिसमध्ये निघून गेली.
आशाताईंच, डायनिंग टेबल वरच्या पनीर कडे लक्ष गेलं.. 'पनीर फ्रिजमध्ये ठेवायचं विसरली वाटतं मंजिरी... ठेवून देते नाहीतर खराब व्हायचं.'
'पण खरंच विसरली असेल की, मुद्दाम बाहेर ठेवलं असेल तिने. मागे फ्रिजमधल्या पनीरची भाजी, रबर खाल्ल्या सारखी वाटतं होती. पनीर फ्रिजमध्ये ठेवू की नको? आशाताईंना प्रश्न पडला. ' कॉल करून विचारते.' विचारण्यासाठी त्यांनी मोबाईल हातात घेतला... "मंजिरी अगं, पनीर.. बाहेर ठेवायचं की फ्रिजमध्ये?" आशाताईंनी विचारलं.
"आई अहो, फ्रिजमध्ये....!! विसरली असेल मी फ्रिजमध्ये ठेवायला. माझं लक्ष नसलं की, घरात कुणाचं लक्ष नसतं." मंजिरी पटकन बोलून गेली.
आशाताईंनी, पनीर फ्रिज मध्ये ठेवलं.
मंदारने मंजिरीला कॉल केला. फोन उचलल्या आणि लगेच मंजिरीने विचारलं. "पोहचलात ऑफिसमध्ये?"
मंजिरीने विचारलेल्या प्रश्नाची दखल न घेता, तो घडाघडा बोलायला लागला. "सोसायटीत गणपती बसणार आहे वाटतं आपल्या. घरी, वर्गणी मागायला आले होते काल.. आईने वर्गणी दिली नाही. वर्गणी, मी देणार म्हणून सांगितलं.. आणि आज, अध्यक्षांनी मला गेटमध्ये पकडलं.. घाईत घाई, उगाच उशीर झाला मला. आपण आईला पैसे ठेतो... तरी आई असं करते काय माहिती?... आहेत ना पैसे, खर्च करायचे ना मग. एवढ्या तेवढ्यासाठी आपला सल्ला कशाला हवा असतो माहिती नाही. उगाच धावपळ झाली माझी, उशीर झाला आज." मंदार चिडला होता.
"अरे, आजकाल साध्या साध्या गोष्टी सुद्धा मला विचारतात. आताच पाच मिनिटापूर्वी कॉल येऊन गेला बघ त्यांचा. काय तर पनीर, फ्रिजमध्ये ठेवायचं आहे का विचारत होत्या. अगदी निघायच्या वेळेवर, उद्या नाश्त्यासाठी काय टाकू म्हणून विचारलं त्यांनी.. आपल्याला आपली घाई आणि ह्याचं वेगळंच सुरू असतं." मंजिरी सांगत होती.
"बरं ठेवते मी, बोलू संध्याकाळी" म्हणत मंजिरीने कॉल कट केला.
संध्याकाळी मंदार ऑफिसमधून घरी आला.
"आई अगं, गणपतीची वर्गणी मागायला आलेलं का कोणी? मंदारने विचारलं.
"हो आले होते. तुम्ही नव्हतात घरी," आशाताईंनी सांगितलं.
"तुझ्याजवळ पैसे होते तर देऊन द्यायचे होते. वर्गणीसाठी काय विचारायचं?" मंदार चिडक्या सुरात बोलला.
"हे घे पैसे आणि उद्या आठवणीने दे." मंदारने खिशातून नोटा काढल्या.
"अहो, मी पण तुम्हाला, पैसे काढून आणायला सांगितले होते... आणले का तुम्ही?" मंजिरीने मंदारला विचारलं.
मंदारने पाचशे पाचशेच्या दोन चार नोटा... आशाताईंच्या हाती दिल्या...
"आणि हे घे तू.... सात हजार सांगितले होते... आठ आहेत.. थकून भागून आल्यावर, पावसात ATM च्या रांगेत उभं रहावं लागलं.. कॅशलेसच्या जमान्यात, कंटाळा येतो." मंदारने मंजिरीसमोर नोटा धरल्या.
"अहो, मला नको... आपण कुठे पैशाने व्यवहार करतो. आजकाल, ऑनलाइन पेमेंट सोप्प पडतं. आईंला कॅश लागते. मावशीचा पगार वगैरे पण देतात त्या. ते पैसे त्यांना द्या." मंजिरीने पैसे आईंना द्यायला सांगितले.
मंदारने आशाताईंना पैसे दिले... आशाताईंनी, नोटा मोजून घेतल्या.
"वर्गणी किती रुपये द्यायची आहे रे?" आशाताईंनी पुन्हा विचारलं..
"आई अगं, 1000 रुपये द्यायचे आहेत." पवार बोलले.
"दे की तेवढे.... हजार रुपये."
"बरं....." उरलेले पैसे ठेवण्यासाठी, आशाताई रूममध्ये गेल्या.
क्रमशः
शुभांगी मस्के...