Login

हक्क की कर्तव्य भाग ... ३

पहिले कर्तव्य पार पाडावे मग हक्क मागावा.
“केला होतास का घरी फोन, झालं का बोलणं मोहन भावजींशी. ह्या शनिवार, रविवार जाऊ या ना. सांगलीला.”

“कामं आहेत मला. हा वीकेंड जमणार नाही. पुढच्या आठवड्यात जाऊ.”

“जरा सवड काढ. हे काम देखील तितकंच महत्वाचे आहे. मागच्या आठवड्यात देखील हेच म्हणाला होतास.”

दर चार आठ दिवसांनी स्नेहल माधवच्या मागे लागत होती आणि माधव सबबी काढत जाणं पुढे ढकलत होता.

“इतका उतावळेपणा बरा नाही स्नेहल. जेव्हा जाऊ तेव्हा बोलू.” माधव समजावणीच्या सुरात म्हणाला. पण ऐकेल ती स्नेहल कुठली त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत तिने आपल्या जावेला शितलला फोन लावला. शनिवारी येत असल्याचे सांगितले.

“काही विशेष” कधी न येणारे दिर जाऊ अचानक येत आहेत कळल्यावर शितल आश्चर्यचकित झाली.

“अजिंक्यच्या ॲडमिशनचे कळले म्हटलं फोनवरून बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष येऊनच अभिनंदन करूया.” स्नेहलने साखरपेरणी केली.

भोळीभाबडी शितल आपल्या जावेच्या बोलण्याला भुलली. लेकाच्या केलेल्या कौतुकाने सुखावली. फोन ठेवताच दादा वाहिनी येत आहेत ही बातमी नवऱ्याला, सासूला आनंदाने सांगू लागली.

“बेसन आहे ना ग शितल, लाडू करूयात. माधवला फार आवडतात” दुसऱ्या दिवशी लागलीच दुर्गाबाईंनी साजूक तुपावर बेसन भाजायला घेतले. सासू सुनेने मिळून लाडू वळले. बऱ्याच महिन्यांनी मुलगा येतोय म्हंटल्यावर दुर्गाबाईंच्या उत्साहाला उधाण आले होते. सून येऊन आपल्या आनंदावर विरजण घालणार आहे याची सुतराम कल्पना त्या माऊलीला नव्हती.

ठरल्याप्रमाणे शनिवारी स्नेहल, माधव आले. ते येणार म्हणून मसालेभात, टोमॅटो सार, श्रीखंड पुरी, बटाट्याची भाजी असा फक्कड बेत शितलने केला होता. दुपारी छान अंगतपंगत झाली, गप्पा रंगल्या, गोडधोडाचे जेवल्यावर वामकुक्षी सुद्धा झाली. दुपारी भरपेट जेवण झाल्यामुळे रात्री फारसं काही करायचं नव्हतं. “आमटी, भात कर किंवा बाहेरून ऑर्डर करू” स्नेहलने शितलला आधीच सांगून ठेवलं होतं. जेवणंखाणं यात वेळ घालवण्यापेक्षा ज्यासाठी आलो आहोत ते बोलणं तिच्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं.

“आल्या सारखा चार दिवस तरी रहा माधवा, रंजूला बोलवून घेते तिची भेट होईल.” दुर्गाबाई लेकाला आग्रह करत होत्या.

“ह्या वेळी धावती भेट आई, उद्या सकाळीच निघू. पुढच्या वेळी निवांत येऊ तेव्हा बोलावा तिला.” माधवला बोलू न देता स्नेहल पटकन म्हंटली. तिला वाटणी प्रकरणात नंडेचा हस्तक्षेप नको होता.

संध्याकाळी परत बैठकीच्या खोलीत गप्पा रंगल्या. माधव शेजारीपाजारी, सवंगडी सगळ्यांची ख्यालीखुशाली जाणून घेत होता. स्नेहलला या चांभार चौकश्यात काडीमात्र इंटरेस्ट नव्हता. ती माधवला वाटणीचे बोलण्यासाठी खाणाखुणा करत होती.

“आई, अजिंक्यच्या ॲडमिशनसाठी जसे पैसे दिलेत तसे चिरागच्याही दया. मोठ्या नातवासाठी काही तरी ठेवा. धाकट्यावर सगळं उधळू नका. चिरागला पुढील शिक्षणासाठी परदेशात पाठवायचा मानस आहे आमचा ” माधव आता बोलेल नंतर बोलेल याची वाट पाहून कंटाळलेली स्नेहल म्हंटली.
तिच्या बोलण्याने सगळे गोंधळून गेले. खेळीमेळीचे वातावरण क्षणार्धात गढूळ झाले.

“मी कुठून देणार एवढे पैसे. तुझ्या लेकाची परदेशवारी मला कुठून परवडणार? थोडेफार कमी पडत होते तेवढेच मी दिले. बाकीची सोय मोहनने केली.” स्वतःला सावरत दुर्गाबाई म्हणाल्या.

“आम्हाला द्यायची वेळ आली की तुमच्याकडे पैसे नसतात. तुमचा हात आखडतो. बाकीच्यांना मात्र सढळहस्ते देता.” स्नेहल ठसक्यात बोलली.

“असं काही नाही स्नेहल, तू गैरसमज करून घेतला आहेस.”

“असंच आहे.”

“जे काही बोलायचे ते स्पष्ट बोल.” दुर्गाबाई कडाडल्या.

“स्पष्टच बोलते. ताकाला जाऊन भाडं लपवायची मलाही सवय नाही. ह्या घराच्या वाटण्या करा. आम्हाला आमचा हिस्सा देऊन मोकळं करा.” लांबण न लावता स्नेहलने मूळ मुद्द्याला हात घातला.

वाटण्या हा शब्द ऐकून दुर्गाबाईंच्या पायाखालची जमीनच सरकली. सगळं घर आपल्या भोवती फिरत आहे वाटू लागले. स्नेहल आणि माधवचा तातडीने यायचा हेतू कळल्याने, बायकोला विरोध न करता, खाली मान घालून बसलेल्या माधवची या सगळ्याला मूकसंमती आहे समजल्याने दुर्गाबाई कमालीच्या दुखावल्या गेल्या.

क्रमशः

©मृणाल महेश शिंपी.

होईल का स्नेहलच्या मनासारखे पाहूया पुढील भागात.

0

🎭 Series Post

View all