Login

हक्क की कर्तव्य भाग ... १

पहिले कर्तव्य पार पाडावे मगच हक्क मागावा.
“अजिंक्यला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळाली.”

“ती तर मिळणारच होती. मार्क चांगलेच आहेत त्याला.”

“मार्काच कौतुक राहू दया. खर्चाचं काय? मोहन भावजींच्या तुटपुंज्या पगारात इंजिनिअरिंगचे शिक्षण शक्यच नाही. सासूबाईंनी पैसे दिले असतील” स्नेहल तोंड वाकड करत म्हंटली.

“आधीपासून तरतूद करून ठेवली असेल मोहनने. कोणाकडून का घेईनात. आपल्याकडे मागितले नाहीत ना झालं तर मग” माधवने आपल्या धाकट्या भावाची बाजू घेतली.

“सगळा ओढा धाकट्या लेकाकडे आणि लेकीकडे. मोठ्याला काहीच नाही.”

“तुला काही कमी पडतंय का स्नेहल. कशाला इतकी चिडचिड करत आहेस?”

“तुला फक्त माझी चिडचिड दिसते. आपल्यावर होणारा अन्याय दिसत नाही. आपला हक्क आपल्याला मिळायला नको का. आपण फ्लॅट घेताना मागितले तेव्हा नानांनी हात वर केले. पैसे नाहीत स्पष्ट सांगितले. आपल्याला नाही म्हणतात आणि मोहन भावजी, रंजूला सढळ हाताने मदत करतात.”

“त्यांनी दिले नाही म्हणून आपलं काही अडलं का? झाला ना आपला फ्लॅट? उलट स्वकर्तृत्वावर झाला.”

“हो पण दिले असते तर अजून एक खोली जास्त घेता आली असती किंवा मोठा एरिया तरी.”

“सोड ना. नानांना जाऊन आठ वर्ष होतील आता, तू जुनंपानं काही तरी उकरून काढू नकोस. नातवाच्या शिक्षणासाठी दिले पैसे तर काही बिघडत नाही. नक्की आईने दिलेत कुणी सांगितलं तुला.”

“मंदा आत्या.”

मंदा आत्याचे नाव ऐकून माधवने कपाळावर हात मारून घेतला. “आत्याची एकाच दोन करून सांगायची सवय माहित आहे ना तुला. तिच्या बोलण्यावर कुठे विश्वास ठेवते. नक्की आईनेच दिलेत का पैसे याची तर शहानिशा कर.”

“शहानिशा काय करायची त्यात. मंदा आत्या कशाला खोटं बोलतील, त्या सांगतात म्हणून कळतं तरी आपल्याला. त्यांना सगळ्या जगाच्या खबरी असतात. मोठे म्हणून आपल्याला काही सांगाव, विचारावं कुणाला वाटत नाही.”

मंदा आत्या आणि दुर्गा या दोघी नंडाभावजयांचे कधीच पटले नव्हते. सगळे दुर्गा वहिनीला मानतात, तिच्या म्हणण्याप्रमाणे चालतात हे मंदाला पटत नव्हते. अनेकदा डावपेच रचूनही ती दुर्गाचे वाईट करू शकली नव्हती त्यामुळे तिने आता दुर्गाच्या सुनेला स्नेहलला हाताशी धरले होते. स्नेहलला काहीबाही सांगून भडकवण्याचे काम मंदा करत होती. हलक्या कानाची स्नेहल आत्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत होती.

“रंजूच्या दोघी आणि अजिंक्य एवढेच दिसतात त्यांना. माझा चिराग खिजगणतीतच नाही त्यांच्या.” स्नेहलची धुसफूस मात्र कमी होत नव्हती.

टेबलावर ठेवलेले वर्तमानपत्र हातात घेत माधवने आपल्या परीने विषय संपवला होता.

माधव, मोहन आणि रंजना ही सुधाकरपंत आणि दुर्गाबाई निरगुडकर यांची मुले. मोठ्या माधवची रिअल इस्टेट एजन्सी होती. आपल्या व्यवसायानिमित्त गेल्या अनेक वर्षापासून तो मुंबईत स्थायिक झाला होता. दादर, प्रभादेवी येथे त्याचा आलिशान फ्लॅट होता. घराजवळच स्वतःचे ऑफिस थाटले होते. माधवची पत्नी स्नेहल बँक ऑफ इंडियामध्ये कार्यरत होती. मधला मोहन सांगली एमआयडीसी मध्ये कामाला होता. आपल्या वडिलोपार्जित घरात दुर्गाबाईंसोबत रहात होता. धाकटी रंजना आहे मिरज येथे आपल्या सासरी सुखाने नांदत होती.

सुधाकर आणि दुर्गा या दांपत्याच्या तीन्ही मुलांपैकी माधवची सांपत्तिक स्थिती उत्तम होती. कशाची म्हणजे कशाची कमतरता नव्हती माधव आणि स्नेहलच्या संसारात. ज्याच्याकडे काहीच नसतं ते सुखाने नांदत असतात. असणाऱ्याची हाव मात्र वाढतच जाते. संपत्तीचा मोह भल्याभल्यांची नियत फिरवते, शहाण्या माणसाला वेड करते, अनेकांना वाम मार्गाला जायला भाग पडते असंच काहीसं स्नेहल आणि माधवचे झाले होते.

आपल्याला हवे तेव्हा सासूसासऱ्यांनी पैसे दिले नव्हते याचा राग होताच स्नेहलच्या मनात त्यात आत्याबाईंनी ॲडमिशन प्रकरण तिखट मीठ लावून सांगत आगीत तेल ओतण्याचे काम केले होते त्यामुळे स्नेहलचे डोके फिरले होते.