मागील भागात आपण पहिले आपल्या पुतण्याच्या अजिंक्यच्या शिक्षणासाठी सासूबाईंनी पैसे दिलेत हे समजल्यामुळे स्नेहलचा जळफळाट होत होता आता पुढे….
“आपल्यालाही आईंनी पैसे दिले तर चिरागला एम. एस. करायला लंडनला पाठवता येईल.” शांतपणे पेपर वाचत बसलेल्या आपल्या नवऱ्याकडे पहात स्नेहल म्हंटली.
“काहीही काय बोलतेस तू? ती कुठून आणणार एवढे पैसे?” स्नेहलच्या बोलण्याने माधव चक्रावून गेला.
“कुठून म्हणजे काय? सांगलीच्या वाड्याच्या वाटण्या करायच्या.”
“वाटण्या करायच्या” स्नेहलच्या बोलण्याने माधवचा काळजात एकदम धस्सच झाले.
“नाना गेले तेव्हा वाटले आपला हक्क आपल्याला मिळेल पण नानांनी गपचूप सगळे आईंच्या नावावर कधी केले ते कळले सुद्धा नाही आणि आता तुझी भावंड गोड गोड बोलून कधी आपल्या नावावर करून घेतील कळणार सुद्धा नाही. लवकरात लवकर सांगलीला जायचं आणि आपला हिस्सा मागायचा.” लांब रहात असल्यामुळे आपल्याला इस्टेटीतून बेदखल केलं जाईल स्नेहलला याची भीती वाटत होती.
“जाऊ तेव्हा बोलू. गणपतीत जाणं होईलच की” या कामासाठी मुद्दामून जाणे माधवला उचित वाटतं नव्हते.
“गणपतीत जाऊ तेव्हा म्हणशील, सणवारी वाद कशाला. घरात पाहुणे आहेत. मग बोलायचं तरी कधी.” आपल्या नवऱ्याला चांगलं ओळखत असलेली स्नेहल तोंड वाकड करत म्हणाली.
“मुळात बोलायचं कशाला? माझी माणसं माझ्याशी चुकीची वागणार नाहीत.”
“असं तुला वाटतं. प्रथमेशच्या लग्नात रंजूच्या गळ्यात आईंची बोरमाळ पहिली. विचारलं तर म्हणते कशी, प्रवासात जोखीम नको म्हणून मी दागिने आणले नाहीत म्हणून आईने घालायला दिली. जाताना परत देणार आहे वाहिनी, तू काळजी करू नकोस.” वर्ष दीड वर्षापूर्वी नात्यातल्या लग्नात घडलेला प्रसंग स्नेहलने जसाच्या तसा कथन केला.
“दिसतात तश्या नाही आहेत शितल आणि रंजू, न बोलून शहाण्या आहेत दोघी. एक नंबरच्या खाली मुंडी अन् पातळ धुंडी नुसत्या. आतपर्यंत आईंचे एकूण एक दागिने लंपास केले असतील. सगळंकाही धाकट्या सुनेला आणि लेकीला मला काही दयावसं वाटत नाही. आधी नानांची पेन्शन खाल्ली. आता त्यांच्या पश्चात आईला मिळणारीही खात आहेत, वरून पैसे सुद्धा मागत आहेत कमाल आहे बाई मोहन भावजी आणि शितलची.”
स्नेहलाची बडबड कमी होत नव्हती. यावर काय बोलावे माधवला कळत नव्हते. तो काही बोलणार इतक्यात बेल वाजली. आपल्या कडील चवीने दार उघडून स्वयंपाक करणाऱ्या मावशी आल्या. त्या आल्याने विषय आपसूकच थांबला.
“मावशीं समोर नको, नंतर बोलू” स्नेहलने माधवला खुणावले आणि मावशींना स्वयंपाकाच्या सूचना देण्यासाठी त्यांच्या मागोमाग किचन मध्ये गेली. संधीचा फायदा घेत माधवही पटकन उठत अंघोळीला गेला. दहा मिनिटात तयार होत कारची चावी घेत कामानिमित बाहेर पडला.
‘पाहिजे तेव्हा वेळेवर येत नाहीत, आज मात्र वेळेच्या आधी हजर’ पोळ्या करणाऱ्या मावशींकडे बघत स्नेहल मनातल्या मनात चरफडली.
माधवकडून काहीच होणार नाही, पैसे मिळाले तर सगळ्यांनाच हवे आहेत पण वाईटपणा घ्यायला नको त्यामुळे मलाच पुढाकार घ्यावा लागेल. लवकरात लवकर सांगलीला जायचं ह्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचा स्नेहलने मनाशी पक्का निर्धार केला.
क्रमशः
©मृणाल महेश शिंपी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा