स्नेहलचा फटकाळपणा, लोभी स्वभाव सगळ्यांनाच ठाऊक होता पण ती इतकी स्पष्ट बोलेल याची कल्पना नसल्याने दुर्गाबाईंबरोबरच मोहन आणि शितल सुद्धा गांगरून गेले होते. सांगलीचे घर, थोडीफार असलेली इस्टेट सगळे सगळे दुर्गाबाईंच्या नावावर होते त्यामुळे वाटणी प्रकरणांवर काय बोलायचे दोघांना कळत नव्हते.
कमी शिक्षणामुळे चांगली नोकरी नाही, पैसा नाही हे मोहनला कळून चुकले होते. आपल्या सारखे आपल्या मुलाचे असे होऊ नये म्हणून तो झटत होता. दुर्गाबाईंनी स्वतःहून पैसे दिले होते, परिस्थितीमुळे मोहनला स्वीकारावे लागले होते.
“एकरकमी जमणार नाही, जमेल तसे मी आईला पैसे परत करेल.” आपल्यामुळे होणाऱ्या वादामुळे कानकोंड झालेला मोहन म्हंटला. शितलने त्याच्या बोलण्याला दुजोरा दिला.
“पैसे परत करायची गरज नाही मोहन. दुसऱ्याला बोल लावणाऱ्यांनी आधी स्वतःची कर्तव्य पूर्ण करावीत.” दुर्गाबाई स्नेहलवर बरसल्या.
“आम्ही कधी कर्तव्यात कसूर केली? कधीच रिकाम्या हाताने येत नाही. काहीना काही घेऊन येतो. आता सुद्धा अजिंक्य साठी स्मार्ट वॉच घेऊन आलो आहोत.” स्नेहल तितक्याच फणकऱ्याने बोलली.
“तुझ्या भेटवस्तू तुलाच लखलाभ. तुम्हाला कोणीतरी दिलेली, न आवडलेली गिफ्ट तू इकडे चिटकवतेस. गेल्या दिवाळीत शितलाला ड्रायक्लिन केलेली पैठणी नवीन म्हणून दिलीस कमीतकमी लॉन्ड्रीच लेबल तरी काढायचं होतेस. तुला वाटतो तेवढे अडाणी नाही आम्ही, सगळं समजत आम्हालाही.”
माधवला दिवाळी, दसरा, न्यू इयरला अनेक गिफ्ट्स मिळायची स्नेहल तीच आपल्या सासरच्या मंडळींना द्यायची. नुसता पैसा असून चालत नाही, दानत देखिल असावी लागते तीच तिच्यात नव्हती. ‘लेबल काढायला कसे विसरले एवढी मोठी चूक कशी झाली’ स्नेहलने आपली जीभ चावली. ह्यातलं काहीच माहीत नसलेला माधव तिच्याकडे संतापाने बघत राहिला.
“दोन वर्षापूर्वी मोहनने घराची गळती काढली, पत्रे बदलले, डागडुजी केली. तेव्हा तू थोडा हातभार लाव असे मी म्हंटले होते माधव, त्यावेळी जो ह्या वास्तूत राहतो, त्याचा उपभोग घेतो त्यानेच खर्च करावा मला भुर्दंड कशाला म्हणत तू पैसे दयायचे नाकारलेस तसंच मी ज्याच्याकडे राहीन माझी पेन्शन तोच घेईल. माझी पेन्शन माझ्या गोळ्या औषधांनाच पुरत नाही. मोहन काय हडपणार ती. नवऱ्याच्या पश्चात मिळणाऱ्या पेन्शनच मी काहीही करेन यावर बोलण्याचा अधिकार कोणालाही नाही. एक माणूस वाढला की किती खर्च वाढतो हे मी वेगळे सांगायला नको. नवीन फ्लॅट घेतल्यावर तुमच्याकडे पंधरा दिवस होते तेव्हा वाढलेल्या अर्धा लिटर दुधाचा हिशोब सुद्धा लावला होतात तुम्ही” माधवकडे बघत रोखठोक बोलत दुर्गाबाईंनी पेन्शनचा मुद्दा खोडून काढला.
“हे गेल्यावर गौरी गणपती एक जण बसवा, नवरात्र एकाकडे राहू दे मी सुचवले होते. त्यावेळी सुट्ट्यांचे कारण देत तू जवाबदारी झटकली होतीस स्नेहल.”
“खरंच सुट्ट्या मिळत नाहीत आई. देव कशाला हलवायचे मूळ घरी राहू द्यावेत एवढाच हेतू होता आमचा. दरवर्षी गणपती, दिवाळीत इथे येतोच की आम्ही.” चेहऱ्यावर शक्य तितके भोळे भाबडे भाव आणत स्नेहल उत्तरली.
“ऐनवेळी यायचं, कुठल्या कामाला हात लावायचा नाही. ना मागच आवरायचं ना पुढचं फक्त मिरवायचं. स्वतःच्या घरी कार्य असलं की सगळं करावं लागतं, इथे सगळं आयतं मिळतं. एक दोन वर्षातच तुझा हेतू कळला आम्हाला आणि पंधरा पंधरा दिवस फिरायला जाताना बऱ्या सुट्ट्या मिळतात ग तुम्हाला?” दुर्गाबाईंना बोलताना त्रास होत होता,धाप लागत होती. आवाजाला कंप सुटत होता.
“शांत हो आई, त्रास होतोय तुला, नंतर बोलू आपण. आतल्या खोलीत जाऊन पड बघू.”
“वाहिनी तुम्ही तरी विषय वाढवू नका.”
माधव दुर्गाबाई आणि स्नेहल दोघींना विनवत होता.
क्रमशः
©®मृणाल महेश शिंपी.
स्नेहल माघार घेईल की दुर्गाबाई तिला पुरून उरतील पाहूया पुढील अंतिम भागात…
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा