Login

हक्क की कर्तव्य ... भाग ५ अंतिम भाग

आधी कर्तव्य पार पाडावे मग हक्क मागावा.
“शांत हो आई, त्रास होतोय तुला, नंतर बोलू आपण. आतल्या खोलीत जाऊन पड बघू.”

“वाहिनी तुम्ही तरी विषय वाढवू नका.”

मोहन दुर्गाबाई आणि स्नेहल दोघींना विनवत होता. स्नेहल तत्परतेने आत जाऊन लिंबू पाणी घेऊन आली. पाणी पिऊन दुर्गाबाई डोळे मिटून शांतपणे खुर्चीवर रेलून बसल्या होत्या. घरात नीरव शांतता पसरली होती. पुढे काय? चे प्रश्न चिन्ह सगळ्यांनाच सतावत होते. काही वेळाने दुर्गाबाईंनी डोळे उघडले. स्वतःला सावरत स्नेहलकडे बघत त्या बोलू लागल्या.

“एक दिवस रंजूला दागिने घालायला काय दिले लगेच तुझ्या डोळ्यात आले. तुझ्या पहिल्या मंगळागौरीला तुला सुद्धा माझी बोरमाळ घालायला दिली होती. तेव्हा सुनेला जुने दागिने दिले म्हणत तू नाक मुरडले होतेस. खरं तर ती माळ मोडून तुला हवा तसा नवीन दागिना घडवून घे मी सांगणार होते तुला पण तुझ्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून पुढे बोलावेसेच नाही वाटले. समजूतदारपणा दाखवला असतास तर ती माळ आज तुझ्याकडे असती.”

मंगळागौरीचीच्या वेळी केलेला हंगामा, मुंबईला परत गेल्यावर रागावून, चिडून माधवशी अबोला धरून केलेली नवीन नेकलेस खरेदी स्नेहालला जशीच्या तशी आठवली.

“लगेच रंजूने सांगितले वाटतं तुम्हाला, मी अगदी सहज विचारले होते” स्वतःच्या वागण्या बोलण्याचा जराही पश्चाताप नसलेली स्नेहल फणकारली.

“वाद वाढवू नकोस” माधवने स्नेहलला गप्प केले.

“आता बोलून काय उपयोग? जेव्हा बोलायला पाहिजे तेव्हा तिला पाठीशी घातलेस. तिच्या इतका तू सुद्धा दोषी आहेस. माझे पथ्यपाणी, वयानुसार सुरू असलेल्या प्रकृतीच्या तक्रारी, तुझ्या वडिलांचे दुखणीखूपणी सगळेकाही मोहनने काढले. ह्यांच्या आजारपणात हॉस्पिटलात रात्रभर उशाशी बसून असायचा तो. तुला मात्र फोन करून बोलावून घ्यावे लागले तेव्हा कुठे शेवटच्या क्षणी तू उगवलास. तू फक्त स्वतःच पाहिलंस, मोहनने आम्हाला जपलं. तू जबाबदारी झटकली, त्याने नेहमीच निभावली. तुला पहिल्यापासूनच मुंबई खुणावत होती. आम्ही तुझ्या स्वप्नाच्या आड आलो नाही. तू तिकडे गेलास आणि तिकडचाच झालास, सोयीस्कररित्या सर्वकाही विसरलास. स्नेहलचा दुपटीपणा, तुझी तिला असलेली साथ सगळं डोळ्यांना दिसत होतं, इतरांकडूनही कानावर येत होतं पण वाद नकोत म्हणून बोलत नव्हते. आज सुनबाईंनी हद्दच केली म्हणून बोलावे लागले. बोलले नसते शितल, मोहनवर अन्याय झाला असता. तुमच्या चुकीची झळ चिरागला बसू देणार नाही. अजिंक्यच्या शिक्षणासाठी जशी थोडीफार रक्कम दिली तशीच त्यालाही देईन. बाकी वाटणी, हिस्सा योग्य वेळ आल्यावर मला ज्याला द्यायचा त्याला देईन.” निर्वाणीच बोलत डोळ्याला पदर लावत, दुर्गाबाई उठल्या. मोहन, शितल त्यांना सावरत आतल्या खोलीत घेऊन गेले. आपली चूक उमगलेला माधव आईची माफी मागण्यासाठी त्यांच्या पाठोपाठ आत गेला.

मृदु स्वभाव, गरीब गाय असलेल्या आपल्या सासूबाईंच रोखठोक बोलणं ऐकून स्नेहल अवाक झाली. एवढा प्रखर विरोध होईल याची कल्पना नसल्याने अचंबित होऊन त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिली. चपराक बसल्यासारखी तिची अवस्था झाली. आधी कर्तव्य मग हक्क याची जाणीव झालेली स्नेहल काही न बोलता चुपचाप आपल्या सामानाची आवराआवर करत निघण्याची तयारी करू लागली.