हक्क-3

परवानगी

आदिती आणि तिच्या घरच्यांशी सुदर्शन कुटुंबियांसोबत चर्चा करण्यासाठी त्यांना एके दिवशी घरी बोलावलं. आदितीचे वडील म्हणाले,

"आमची आदिती तुम्हाला कधीच नाराज करणार नाही, तिच्या फक्त काही अपेक्षा आहेत तेवढ्या तुम्ही समजून घेतल्या तर तिच्यासाठीही सोपं होईल.."

"तुम्ही निर्धास्तपणे सांगा.."

"तिला लग्नानंतर तिचं शिक्षण पूर्ण करायचं आहे आणि त्यानंतर नोकरी, त्यामुळे घरात तिचं लक्ष कमी जास्त होऊ शकतं..तेवढं सांभाळून घ्याल अशी अपेक्षा.."

"हे काय सांगणं झालं? शिक्षणाचं महत्व आहे आम्हाला..तुम्ही काळजी करू नका, तिच्या शिक्षणाला आणि नोकरीला आम्ही पूर्ण सपोर्ट करू.."

घरच्यांनी हिरवा कंदील दिला, तिकडे आदिती आणि सुदर्शन बोलण्यासाठी बाहेरच्या बागेत गेले होते.

"आदिती, आपण एकाच शाळेत होतो, पण कधी वाटलं नव्हतं आपलं लग्न होईल म्हणून.."

आदिती लाजली,

"खरं सांगू? मला तू आवडायचा...तेव्हापासून.."

"खरं की काय?" असं म्हणत तो गोड हसला..त्याच्या हसण्यात अदिती पुन्हा हरवून गेली..

"पण मला एक सांग, म्हणजे अगदी खरं सांग... तू इतका लोकप्रिय होतास सर्वांमध्ये, तुला एक से एक मुली मिळाल्या असत्या, तू माझ्या स्थळाला कसा होकार दिलास?"

"तुला काय वाटलं? फक्त तुलाच मी आवडायचो? अगं मीही तुझ्याकडे लक्ष ठेऊन असायचो. तू सर्वात वेगळी होतीस. बाकी मुली माझ्याशी बोलायला सारख्या माझ्या मागे पुढे करायच्या, पण तू त्यातली नव्हतीस...माझ्या मनात तुझ्याबद्दल वेगळं स्थान निर्माण झालं...आणि आजकालच्या मुली बघ ना, एक तर शिक्षण असलं तर संस्कार दिसून येत नाही, आणि संस्कार असतील तर शिक्षणाचा पत्ता नाही..तुझ्यात मात्र सगळं अगदी योग्य प्रमाणात आहे.."

"शिक्षणावरून आठवलं..मला एक सांगायचं आहे.."

"बोल ना.."

"हे बघ, मला पुढचं शिक्षण घ्यायचं आहे, मी एन्ट्रान्स दिलीये आणि चांगल्या कॉलेजला ऍडमिशन सुदधा घेतलं आहे..तर मला पूर्णवेळ कॉलेज करावं लागेल.."

सुदर्शन काहीश्या विचारात पडला..

"काय झालं? तुला चालेल ना?"

"हो मग...त्यात काय एवढं.."

सुदर्शन हो म्हणाला खरा, पण त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळंच सुरू होतं. सुदर्शनने फक्त डिग्री घेतली होती, पुढचं शिक्षण करायच्या आतच त्याला चांगली नोकरी मिळाली होती, पगारही चांगला होता...पण होणारी बायको आपल्याहून जास्त शिकलेली असेल हे त्याला कुठेतरी खटकत होतं..


🎭 Series Post

View all