हक्क 5

मराठी कथा
सासूबाईंनी पुन्हा टोकलं,

"अगं घरी पाहुणे येणारेत...जेवायला.."

"कितीजण?"

"आहेत पाच सहा.."

"बरं मी कॉलेजमधून लवकर येते.."

"अगं संध्याकाळी नाही, आत्ता दुपारी.."

"मग मला सकाळीच सांगायचं की..स्वयंपाक करून ठेवला असता जास्तीचा.."

"मग आत्ता कर की.."

"आता मला निघायचं आहे"

असं म्हणताच सासूबाईंच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. आदीतीच्या लक्षात आलं, तिने नमतं घेतलं आणि म्हणाली,

"ठीक आहे आज मी सुट्टी टाकते.."

तिने कॉलेजला सुट्टी घेतली आणि स्वयंपाकाला लागली. स्वयंपाक करता करता तिला रडू यायचं. माहेर ते शेवटी माहेरच... आईकडे जर ती असती तर असा प्रसंग आलाच नसता. शिक्षण करू देऊ असं सांगून सासरची लोकं हवा तो जाच वेगवेगळ्या पद्धतीने करतच होते. याच गोष्टीची तिला भीती होती. पण ती मनाची समजूत घालत शांत होत असे.

या सर्व गोष्टी ती शांतपणे सुदर्शनला सांगायची, तिला काहीतरी खटकत आहे, तिची कसलीतरी धावपळ होतेय हे सुदर्शनने समजून घ्यायला हवं असं तिला वाटायचं. सुदर्शनला मात्र आदितीचं चुकतंय असं वाटायचं..

"अगं आईचं वय झालंय आता, तिच्याकडून कसली अपेक्षा ठेऊ नकोस, तुला शिक्षणाला नाही म्हटलोय का आम्ही? पण आता लग्न झालंय म्हटल्यावर सगळं माहेर सारखं थोडीच राहणार.."

तुला शिक्षणाला परवानगी दिली हीच मोठी गोष्ट आहे हे उपकार सतत तिला बोलून दाखवण्यात येत होते. अदितीला तिचा निर्णय चुकला की काय असं वाटू लागलेलं.

कॉलेजमध्ये तिला पुढची फी भरायची होती. वडिलांकडे मागायला तिला योग्य वाटत नव्हतं. कारण लग्नासाठी भरमसाठ खर्च झालेला. सुदर्शनला भरपूर पगार असल्याने जुजबी फी तो सहज भरू शकेल असा तिचा समज होता.

"सुदर्शन, अरे मला कॉलेजची फी भरायची आहे, 30 हजार देतोस का?"

"30 हजार?"

"हो.."

"मी नाही देऊ शकत.."

"का?"

"का म्हणजे? घरासाठी खर्च होतात पैसे.."

"कालच मी तुला तुझ्या मित्राला उसने 50000 देताना पाहिलं..तुझ्याकडे 30 हजार नसतील यावर माझा विश्वास नाही..हवं तर उसने दे, नोकरीला लागल्यावर परत करेल तुला.."

"ते काही शक्य नाही, आणि आईला समजलं तर घरात भांडण होईल.."

आदितीला आता आपल्या लग्न केल्याचा साफ पश्चाताप होऊ लागला. सुदर्शन असा वागेल असं तिला वाटलं नव्हतं. प्रेम आणि आकर्षण यामागे ती फसली गेली होती.

🎭 Series Post

View all