Login

हक्क 6

मराठी कथा
तिने सासूबाईंना प्रेमाने विचारून पाहिलं, पण त्यांनी स्पष्टपणे संगीतलं,

"तुला शिक्षण घेऊ द्यायची परवानगी फक्त दिलीये, त्याची जबाबदारी नाही उचललेली आम्ही.."

आता वडिलांकडे पैसे मागण्याशिवाय तिच्याकडे पर्याय नव्हता. तिने आईला फोन केला,

"आई, अगं... कॉलेजची फी भरायची आहे मला, घरून पैसे मिळणार नाही.."

हे ऐकून आई काही क्षण सुन्न झाली. पण लगेच सावरत म्हणाली,

"साहजिकच आहे, जास्तीचा पैशाचा भार का घेतील ते?"

"अगं आई पुरून उरेल इतका पैसा आहे यांच्याकडे..यांच्या घराची जबाबदारी मी घेतली तर आवडतं पण माझी जबाबदारी घ्यायला कुणी तयार नाही, सुदर्शन कडून ही अपेक्षा नव्हती.."

आईने तिला कसेबसे समजावले. वडिलांनी दुसऱ्याच दिवशी फी चे पैसे तिला पाठवले.

आदितीची चांगलीच धावपळ व्हायची. घरातलं सगळं करून कॉलेजला जायचं आणि आल्यावर सगळं परत आवरायचं यात ती थकून जायची. फक्त कॉलेज करून काय होणार, सोबत अभ्यासही व्हायला हवा ना? अभ्यासाला कसला वेळ मिळतोय तिला...

पण तिनेही जिद्द सोडली नाही. कॉलेजमध्ये तास नसताना लायब्ररीत जाऊन बसायची. घरी ओटा आवरताना खिडकीत पुस्तक उघडून ठेवायची, काम करता करता वाचायची. नोट्स चे ऑडिओ रेकॉर्डिंग करून प्रवासात रिविजन करायची.

मध्ये काही दिवस माहेरी राहायला गेली. तेव्हा त्या वेळेचा पुरेपूर वापर करून अभ्यास करायची. ती जागरण करत असताना आई तिला कॉफी बनवून द्यायची, तिला आयतं जेवण मिळायचं..अदितीला रडू यायचं.

एकदा आईकडे तिने नीट निरखून पाहिलं, आईच्या कानात कानातले नव्हते,

"आई चेहरा वेगळाच दिसत होता मला तुझा, आत्ता लक्षात आलं की तुझे कानातले नाहीयेत.."

"अगं, जखम झाली होती तर काढून ठेवले..तू अभ्यास कर, गप्पा मारू नकोस.."

अदिती चार दिवस माहेरी राहिली, निघताना तिचं सामान भरत असताना कपाटात तिला एक पावती दिसली, त्याच्यावरही तारीख बघून तिच्या लक्षात आलं, तिची फी भरण्यासाठी आईने तिचे कानातले मोडले होते.

आदितीने खोलीचं दार लावून घेतलं आणि ती खूपवेळ रडली. नंतर डोळे पुसले, आणि मनात एक निर्धार करून बाहेर पडली.

इतकी मेहनत केल्यानंतर आदितीला यश मिळणारच होतं. ती अव्वल आली आणि एका मोठ्या कंपनीत तिचं प्लेसमेंट झालं. पगाराचा आकडा ऐकून सुदर्शनचा जळफळाट झाला. त्याच्याहुन दुप्पट पगार तिला मिळणार होता..पण आता तो दाखवुही शकत नव्हता.

रिझल्टच्या दिवशी तिच्या माहेरचे पेढे घेऊन आपल्या लेकीकडे आले. सासूबाई tv बघत होत्या. आदीतीचे आई वडील येताच त्यांनी त्यांचं स्वागत केलं. सुदर्शन सुद्धा बाहेर आला आणि त्यांना बसण्याची विनंती केली.

"घ्या आदीतीच्या सासूबाई, पेढे घ्या.."

"कसले पेढे?"

हे ऐकताच आई वडील एकमेकांकडे पाहू लागले..

0

🎭 Series Post

View all