हक्क 7 अंतिम

मराठी कथा
"अदिती, तू सांगितलं नाहीस का तुझ्या निकालाचं यांना?"

"सांगितलं आहे."

"अच्छा... ते होय, पास झाली ना ती? सांगितलं तिने आम्हाला.."

त्यांच्यासाठी ती गोष्ट क्षुल्लक होती. अदितीला वाईट वाटलं. पण सासूबाईंना जेव्हा पगाराचा आकडा कळला तसा त्यांचा चेहरा फुलून गेलेला..

"बरं झालं बाई कमवायला लागशील... कधीचं नवीन फ्रीज घेऊ म्हणतोय, आणि वर भर टाकून अजून एक खोली बांधायचं चाललंय, आता सगळं कसं पटापट होणार.."

अदिती हसली... काहीही बोलली नाही...

आदितीची नोकरी सुरू झाली. तिचं काम चांगलं होतं त्यामुळे तिचं कौतुक होऊ लागलं. पहिला पगार हातात आला..पगार झाला आणि ती घरी आली, सासूबाई तिची वाटच बघत बसल्या होत्या,

"सुनबाई म्हटलं आज एखादं फ्रीज पाहायला जाऊया.."

"जाऊया की..पैसे ठेवा सोबत...आवडलं की लगेच आणू.."

सासूबाई चिडल्या,

"मग तुझा पगार कशासाठी??"

आवाज ऐकून घरातले सगळे बाहेर आले. सुदर्शन आला..

"तुला शिक्षण करू दिलं, त्यासाठी परवानगी दिली...आणि पगार स्वतःकडेच ठेवणार??"

"अजिबात नाही आई, हे घ्या...घरखर्चासाठी 10 हजार रुपये... मी इथे राहते, इथल्या वस्तू वापरते त्यासाठी एवढे पुरेसे आहेत आणि वर किराणा, बिल सुटेल एवढी रक्कम आहे यात.."

"आणि बाकीचे काय करणार?"

"बाकीचे पैसे मी माझ्या माहेरी देणार.."

सुदर्शन पुढे आला आणि म्हणाला,

"यासाठी तुला शिक्षणाला परवानगी दिली का? की तुझ्या माहेरी पैसे पुरवावेत??"

आता आदितीचा संयम सुटला, तिने सर्वांना चांगलंच सुनावलं..

"माझ्या शिक्षणाला तुम्ही परवानगी दिली म्हणजे उपकार केलेत असं ला दाखवून देतात तुम्ही लोकं? शिक्षण घेणं हा माझा हक्क आहे, तुम्ही फक्त परवानगी दिली..पण जबाबदारी घेतली? काय मागितलं होतं मी? फी साठी फक्त 30 हजार द्या, मी परत केले असते, तेवढंच नाही तर सगळा पगार घरासाठी वापरला असता.. पण तुम्ही दाखवून दिलंत की माझी जबाबदारी कुणी घेणार नाही, मात्र माझ्या पैशांवर हक्क मात्र सर्वांना हवाय..या फी साठी माझ्या आईने तिचे सोन्याचे कानातले मोडले..वडील अजूनही लग्नाचं कर्ज फेडताय..तुम्ही जर माझी फी भरली असती तर तुमचा मान नक्कीच राखला असता, नुसतं फ्रीज काय तर घरातील एकूनेक वस्तू आणून दिली असती..पण तुमच्या वागणुकीमुळे आता मला हे वागावं लागत आहे.."

सुदर्शन आणि त्याच्या आईकडे काही उत्तर नव्हतं. तेव्हा तिच्या फी चे पैसे भरले असते तर किती बरं झालं असतं असं त्यांना वाटू लागलं. सुदर्शन तिला घरातून चालती हो असं म्हणू शकत नव्हता, कारण तिला आता इतका पगार होता की स्वतः एकटी आरामात जगू शकत होती. आता तिला त्रास न देण्यात आणि इथे टिकवून ठेवण्यातच आपली भलाई आहे असं समजून दोघेही मन मारत तिची तोलतोल करू लागले...

तुम्हाला आदितीचा निर्णय कसा वाटला??

🎭 Series Post

View all