Login

हाकमारी बाई (भाग १)

धाडss धाडss धाडss कानाचा पडदा फाडून आवाज मन, मती, मेंदूचा थरकाप उडवत होता.
ईरा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
(जलद कथालेखन )
शीर्षक - हाकमारी बाई (भाग -1)



            धाs ड... धाs ड... धाs ड... कानाचे पडदे फाडून आवाज मन, मती मेंदूचा नुसता थरकाप उडवत होता. साय साय करत वारा भुतासारखा इकडून तिकडं धावत होता. नाही भुतासारखा नाही... तो जणू भुतालाच घाबरून पळ काढत होता. मधेच एखाद्या टिटवीची कर्णकर्कश टिवटिव, काळीज हादरवून सोडत होती.  जवळच कूठे कुत्र्याच्या रडण्याचा भेसूर आवाज भीती द्विगुणित करण्यासाठी पुरेसा होता. त्या बंदिस्त घरात काळोखाचा डोह साचला होता... जणू युगानयुगे तिथे प्रकाशाचा लवलेशही नसावा. त्या काळोखाच्या गर्तेत "ती" अडकली होती. भीतीने अंग थरथरत होतं, सर्वांगाला घाम सुटला होता. दोन्ही हातात गुडघे गच्च धरून ती वटारलेल्या डोळ्यांनी कवाडाकडं बघत होती. तीच्या नजरेत मूर्तिमंत भीती तरळत होती जणू साक्षात ती समोर उभ्या ठाकलेल्या मृत्यूलाच बघत होती...
    
             दोन दगडी खोल्यांचं कौलं उडालेल ते भयानक घर, त्यात एका मोडक्या बाजेच्या आड जीव मुठीत घेऊन बसलेली "ती " , एखाद्या निष्णात कत्तलकारान सुरीच्या पात्याला दगडावर हळुवार इकडून तिकडं फिरवावं अगदी तसाच  आवाज करणारा भयाण वारा,  अधूनमधून येणारे त्या सजीवांचे आवाज... सजीवांचे?? खरचं ते सजीव होते का? का फक्तं एक भुलवणारा देखावा? की सारे मनाचेच खेळ?  मृत्युदंड द्यायच्या आधी एखाद्या क्रूर जल्लादाने ढमss ढमss ढमss ढोल वाजवून आनंद साजरा करावा अगदी तसाच समोर आवाज करणारा तो लाकडी दरवाजा... याव्यतिरिक्त तिथे होतं तरी काय? काहीच नव्हत... ना तिला स्वतःच अस्तित्व होतं ना वाचवणार कोणी... होती ती फक्तं एक काळोखाची पोकळी... खोल मृत्यूच्या गर्तेत अडकलेली... आणि तो आवाज... तो आवाज अनंत, अनगिनत काळापासून तीच्या शोधात आलेला... अतृप्त...

   अचानक दरवाजावरच्या थापा बंद झाल्या अन् तीच्या जीवत थोडा जीव आला. थरतरत्या हातानं तीने घाम पुसला. बाजंवर हात ठेवून कशीबशी ती उभी राहिली तरीही पाय लटलटत होते. जमिनीवर पाय घासत ती दरवाज्याच्या दिशेने जाऊ लागली तोच एक खर्जातला घोगरा आवाज तीच्या कानावर पडला तशी ती जागीच गोठली....
            "प्रणू"ssss......

तीच्या आईने तीला आवाज दिला होता पणनेहमीप्रमाणे यावेळी ती फसणार नव्हती. पुन्हा एकदा तीचं नाव उच्चारलं गेलं... आवाज मात्र बदलला होता. तो आवाज तीच्या बाबांचा होता.
         "प्रणू बाळा दार उघड" ....
त्या आवाजात एक प्रकारची नाट्यता ठासून भरलेली होती. आता तीच्या मानसिक संतुलनाला तडा जात होता. ती हळुहळु त्या आवाजाच्या प्रलोभनाला बळी पडत होती. माया- मोहाच जाळं माणसाला फसवत हे काही खोटं नाही. तीची गत पण वेगळी होत नव्हती. हळुहळु ती एक एक पाऊल पुढे टाकू लागली. आतातर आवाज आणखीच फसवा झाला. तीने हळूवार दाराची कडी खाली ओढली दरवाजा क्षणात दूर झाला आणि काळाकुट्ट धारदार नखाचा हात तिच्या गळ्यावर पडला. जीवाच्या आकांताने ती शेवटची किंचाळली...
      "आई"ssss

तीची आई धावतच दारातून आत आली.  प्रणू बेडवर निपचित पडली होती. आईच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. तीने प्रणूला गदागदा हलवून उठवलं पण तीच एकही प्रत्युत्तर आलं नाही. गेल्या दहा बारा दिवसांपासून प्रणूची तब्येत ढासळली होती. नेहमी बोलकी, हसतमुख असणारी प्रणूची अवस्था जणू एखाद्या रोग्यासारखी झाली होती.

         "अहो... आत येता का? ही बघा पोर कशी करतेय" त्या माऊलीने काळजी पोटी नवऱ्याला हाक दिली. बाहेर वर्तमानपत्र चाळत बसलेले बजरंग काका कपाळावर आठ्या पडूनच आत आले कारण तिसऱ्यांदा असं होण त्यांनाही अपेक्षित नव्हत.

     "अरुणा,  आता खरचं आपल्याला काहीतरी करावं लागेल. हे जरा अतीच होतंय. आजच हिला आपणं हॉस्पीटल मधे घेऊन जाऊ.

       "अहो पण सासूबाई म्हणाल्यात ना की हे काही बाहेरवासाच असेल"

        "पुरे... एकतर तीनेच अश्या भांपक गोष्टी सांगून तीला लहानपणापासून वेड केलंय वरून बाहेरवास म्हणून अजून ह्या पोरीला गुंतवायच आहे का?" बजरंग काका अरुणाच्या बोलण्याला मधेच तोडत गरजले.
   
         "अरे बाबा खरं तेचं सांगतेय मी पोरगी पुरती वाळून चाललीय. मला हाय अनुभव. म्या काय ऊगाच नाय म्हणत. कुणीतर हाय आपल्यावर वाईट डोळा ठीवून... ही दुनिया काय चांगली हाय व्हय? बघितलं ना कसं चांगल्या पोरीच मातेर झालंय? "  नुकत्याच उठून बसलेल्या आजीनं तोंडाचा पट्टा चालू केला.

     "आई मी तुला आधीच सांगत होते हिला नको त्या गोष्टी नको ऐकवत जाऊ. लहानपापासून तू तीच्या मनावर हे सगळं लादत गेलीस. बघितलंस् ना, काय परिणाम झालाय तीच्या डोक्यावर? कशाची भीती दाखवायची याचं पण लिमिट असावं. नाहीतरी हे असं होतं."

         "आता तू माझ्यावरच आळ आण " आजी हात नाचवत बरळली .

           "प्रणवsss...उठतोस का आता." अरुणाने म्हणजेच प्रणाली आणि प्रणवच्या आईने आवाज दिला. प्रणव नुकताच उठला होता. घरातला गोंधळ ऐकून तो बाहेर आला तर प्रणू जवळ सगळे जमले होते.
        "काय झालं गं दिदीला?" प्रणव पण घाबरून धावतच आला. तीच्या जवळ बसून प्रणवने तीच डोकं तपासल. ताप नाही पण तीच अंग कमालीचं गारठल होत.
        "काय बडबड चालूय तुमची दिदिला थंडी किती वाजतेय" प्रणवने वैतागून तीच्या पायाच पांघरून हातापर्यंत सरकावल. किचन मधुन पाण्याचा ग्लास आणून त्यानं आईच्या हाती दिला. अरुणाने ओंजळीत थोड पाणी घेऊन प्रणूच्या तोंडावर शिंपडल तश्या तीने पापण्यांची उघडझाप केली. डोळ्याच्या कमानीत आईचा चेहरा हळूवार उमटत गेला. समोर आईला पाहताच प्रणूने तीच्या पोटाला घट्ट मिठी मारली आणि
मुस्मुसून रडू लागली. आईने तीच्या डोक्यावर हात फिरवला आणि तिला स्वतःपासून बाजूला करत तीने हातानेच काय म्हणून इशारा केला. सगळेच तीला ओठांची व हाताची हालचाल करून 'काय झालं?'  म्हणून विचारत होते. रडवेल्या डोळ्यांनी तीने बारी बारीने सगळ्यांकडे पाहिलं आणि ती बोलू लागली...

काय पाहिलं असेल प्रणूने स्वप्नात? जाणून घेण्यासाठी वाचत रहा...