Login

हाकमारी बाई (भाग २)

अरुणा-बजरंग काका हे दाम्पत्य, प्रणाली प्रणव...
भाग- 2

    अरुणा , बजरंग काका हे दाम्पत्य...प्रणाली, प्रणव दोघे बहिण भाऊ आणि आजी असे छोटस मध्यमवर्गीय कुटुंब गुण्या गोविंदाने नांदत होते. प्रणालीने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती तर प्रणव आठवीत शिकत होता. दोन्ही भावंडे अभ्यासात हुशार होती. पण देव जाणो कोणाची नजर लागली; प्रणूने दहावीत प्रवेश घेताच खूप आजारी पडली. दोन ते तीन महिने ती अंथरूण धरुनच होती. बरेच दवाखाने झाले, देवाला कौल लावून झाले पण काहीच फरक पडत नव्हता. परिणामी प्रणूच्या आयुष्याने एक भयंकर वळण घेतलं. ती दोन्ही कानाने कर्णबधिर झाली. हातवारे करूनच सगळे तिच्याशी बोलायचे. आतातर तीला इतकी सवय झाली होती की ओठांच्या हालचालीवरूनही ती समोरचा काय बोलतोय हे ओळखत होती. डॉक्टरांनी तर हातचं जोडले. पण असा कोणताच आजार नसतो ज्यावर कुठलाच उपाय नाही. विदेशी दवाखाने करणे या कुटुंबाला परवडणार देखील नव्हत. शेवटी नशीब म्हणून सगळ्यांनी माघार घेतली.
          प्रणू तर पुरती कोलमडून गेली होती. भविष्याची किती स्वप्नं पाहिली होती तिनं ... शेवटी दैवाचा खेळ तरी कोणाला कळाला? असो... तरीही प्रणू हार मानणार नव्हती. येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करत ती आपलं भविष्य उज्वल करण्याच्या तयारीत होती पण त्याआधीच ती एका भयंकर संकटात सापडली होती. जे संकट पूर्णपणे तीच्या आयुष्याशी जोडलं गेलंय... एक असं संकट ज्याचा मानवी जगाशी दूरदूर सबंध नाही... ते येणारं संकट एकतर तीच्या मृत्यूवर निभावेल किंवा तीच्या धैर्यावर... यात बाजी कोण मारणार? हे सर्वस्वी प्रणूवर अवलंबून होतं.
-------------------------------------------------------------


         प्रणूनं पाहिलेलं स्वप्न जसच्या तसं सगळ्यांना ऐकवलं जो तो एका अनामिक काळजीने एकमेकांच्या तोंडाकडे बघत होता कारण तेचं ते स्वप्न गेली तीन दिवस झाले प्रणूला पडत होतं आणि दर सकाळी ती अशीच दचकून उठायची वा ओरडायची. आधी तर सर्वांना वाटलं ती गंमत करतेय किंवा मनी वसे ते स्वप्नी दिसे तसच काही असेल पण आज तर चक्क ती बेशुद्धच पडली होती. आता प्रथम दर्शनी तर स्ट्रेस वगेरेच कारण ग्राह्य धरण्यात आलं पण आजी मात्र याचा वेगळाच अर्थ काढत होती. तशी आजी सत्तरी पार केलेली अनुभवी तीचं मतही डावलता येतं नव्हतं.

              "अरुणा मला वाटतं आपणं हिला दवाखान्यात नेऊयात आजच. डॉक्टर काय म्हणतात ते बघू." प्रणूचे बाबा काळजीने तीच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले.
             "कायबी फरक पडायचा न्हाय... मी तर म्हणतेय डाक्टर कडं नका जाऊ येशी जवळच्या पंडित बुवा कडं जाऊन या." आजी
            "अगं आये कधीतरी शुभ बोलत जा की." बजरंग तावातावात बाहेर निघून गेला.
          "अरुणा म्या खरं तेचं सांगतेय माझा जलम गेला याचं गावात. लहानाची मोठी झाली इथचं माह्यार आन सासर बी इथलचं. ऊगाच त्यो गुरूजी येशीवर राहून गावाची रक्षा नाय करत...बग म्या म्हणतेय ते मनावर घ्या." आजी उठून काठी टेकत बाहेर निघून गेली.


     तो काळ 2007 चा... बऱ्याच गावांत एक अफवा पसरली होती. लोकं रात्री अपरात्री बाहेर निघायला सुद्धा घाबरत. लहान थोरांमध्ये दहशत पसरली होती. जेवण खाऊन झालं की लोकं एकदा कवाडं लावून घ्यायचे ते पुन्हा सकाळीच उघडायचे. त्या भीतीने लोकांनी आपापल्या घरावर गुणिले वा अधिक सारखं चिन्ह काढलं होतं. चुन्याच्या पांढऱ्या रंगाचं ते चिन्ह पाहिलं की ती ब्याद घाबरून पळून जायची म्हणे. असं म्हटलं जायचंकी, ते भूत आपल्या सग्या सोयऱ्यांचा आवाज काढून हाक मारत असे या हाकेला कोणी बळी पडला की ती त्याला घेऊन जातं असे. बऱ्याच आया आपल्या रडणाऱ्या लेकरांना तीची भीती दाखवून गप्प बसवत असत. कोण ती? कसली ब्याद?... ती होती प्राचीन काळापासून भटकणारी एक हिडीस शक्ती "हाकमारी बाई"...