Login

हाकमारी बाई (भाग ५ अंतिम)

पंडित गुरुजींना भेटून आल्यापासून प्रणू आनंदी दिसत होती...
भाग - 5 (अंतिम)

पंडित गुरुजींना भेटून आल्यापासून प्रणू आनंदी दिसत होती. रात्री तीला वाईट स्वप्न देखील पडलं नव्हतं. दोन्ही नवरा बायकोने आजीचे आभार मानले. अजूनही एक दिव्य बाकी होतं मग प्रणू कायमची सुटणार होती. प्रणू एकटीच नव्हे पूर्ण सजीव सृष्टी विषारी विळख्यातून बाहेर पडणार होती. कारण त्या हडळीचा डावच होता... प्रणूचा बळी देऊन ती पुन्हा एकदा सजीव सृष्टीवर आपला आतंक माजवणार होती. आज अमावस्या होती.  दिवस कसाबसा पूढे सरला आणि सूर्य तिमिरात बुडाला, तशी सगळ्यांच्या मनावर भीतीची आणि निराशेची मळभ चढली. अरुणाने देवापुढे तिन्ही सांजेचा दिवा लावला. सगळ्यांनी भरल्या डोळ्यांनी हात जोडले तोच दरवाजावर ठक ठक आवाज झाला आणि प्रणू सोडता बाकी सगळे टुणकन उडाले. दार सताड उघड होतं आणि दारात पंडित गुरूजी खांद्यावर झोळी अडकवून स्मितीत चेहऱ्याने उभे होते... जणू तिन्ही संजेच्या वेळी कोणी देवदूतच दारी आलाय. त्यांना पाहताच प्रणूने नमस्कार केला.

           बजरंग काका हात जोडूनच दाराकडे गेले.
"या गुरुजी..."
       "मला ईथेच हॉलमधे हवन मांडायच आहे. त्यासाठी आवश्यक असणारी सामग्री मी सोबत आणलीय. हॉलच्या मधोमध मोकळी जागा करून ती स्वच्छ करून घ्या. गुरुजी आत आले. प्रणूच्या आईने रजई अंथरली होती त्यावर आसनस्थ झाले व एक एक सामग्री बाहेर काढू लागले. अरुणाने  तांब्या भरून पाणी आणून दिले पण गुरुजी ते प्यायले नाहीत.
     "जो पर्यंत विधी पूर्ण होतं नाही तोपर्यंत मी या घरच्या अन्नाचा वा पाण्याचा एकही कण प्राशन करणारं नाही. हा आमचा नियम आहे." झोळीतून चंदनाची लाकडे, सुगंधित तेलाची लाल बाटली, छोट्याश्या शिशित भरलेलं द्रव्य, गोमूत्र असं साहित्य जमिनीवर मांडलं गेलं. कुंकवाने पंच तरांकित चिन्ह काढून त्यावर विटांनी अंग्निकुंड मांडण्यात आले. हळुहळु बाहेर झाकळ पडू लागली.
       "प्रणूला इथं ठेऊन तुम्ही सर्वांनी एका खोलीत जा. जेवण पान उरकून घ्या. खोलीतून कोणीही बाहेर पडू नका. जेव्हा विधी पूर्ण होईल तेव्हा मी तुम्हाला बाहेर बोलवेन. गुरुजींनी आदेश दिला.
        "पण गुरुजी प्रणू?" आईनं काळजीनं विचारलं.
    "तीची काळजी करू नका मी आहे सोबत विश्वास ठेवा. आणि हो जाताना सगळे दिवे बंद करून जा चुकूनही कोणी दिवा लावू नका" गुरुजींनी ठामपणे सांगीतलं तेव्हां सगळे आतल्या खोलीत गेले. गुरूजींनी प्रणूला हातानेच खाली बसण्याचा इशारा केला. अग्नी कुंडाच्या समोरासमोर दोघेही ठाण मांडून बसले. गुरूजींनी डोळे मिटले तीच कृती आपोआप प्रणूकडून घडली गेली. गुरूजींनी मंत्र चालू केला. मंत्राचा आवाज जसजसा वाढत होता तसतशी कुंडात ठिणगी पेटत होती. अखेरीस मंत्र शक्तीने यज्ञाच्या ज्वाला भडकल्या. आणि अंधारलेल्या घरात अग्निचा उजेड पडला. त्या आगीच्या प्रकाशाने दोघांचे चेहरे उजळून निघाले. हळुहळु गुरूजींनी प्रणूच्या अंतर्मनाशी संपर्क साधला.
      "तयार आहेस ना बालिके?"
   "होय गुरुजी... "
        "तुलाच तीच आव्हान करायचं आहे. मी अदृश्य अवस्थेत जात आहे. घाबरु नकोस फक्तं आत्मविश्वास ठेव." गुरुजी तीला आश्वस्त करत अदृश्य समाधीत गेले. आता प्रणू एकटीच राहीली होती. घड्याळात रात्रीच्या बाराचा गजर पडला. प्रणूच्या मनात धाकधूक वाढली. पण जर यातून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला हे करावच लागेल. शेवटी प्रणूने डोळे मिटले आणि थरथरत्या सुरात तीच आव्हान करायला सुरुवात केली.
      "हे चांडळने, हे हाकमारी बाई... तुला माझा जीव हवाय ना?... ये ये... तुझ्यासाठी मी हाजिर आहे... घे माझा जीव... अमर हो... ये..." ती प्रणू नव्हतीच तीच्या मुखातून जणू गुरुजीच बोलत होते. हळुहळु हवेत गारठा वाढू लागला. देवघरात मिणमिणता दिवा झपकन विझला गेला. दारं खिडक्या कंप पावू लागली. "हा ss हा sss हा sss" तीच भयंकर हसू सगळीकडे घुमत राहिलं. तीच्या स्वागतासाठी क्षणभर दरवाजा उघडला आणि काळसर धूर आत शिरला. मागे धाडकन दरवजा बंद झाला.
      "मी आले मी आले... तू बोलावलं मला... आता आपणं जाऊ... तुला मी नेईन... हा ss हा sss हा sss..." ती ब्याद आनंदाने अक्षरशः थयथय नाचत होती. वेडेवाकडे हावभाव करत ती बेभान सुटली होती. प्रणू डोळे वटारून तीचा तांडव बघत होती. पण ती काय बडबडतेय तीला कळत नव्हतं.
       "ख... खरचं तू मला बोलावलं... हा?... का या भटान बोलावलं... हा हा हा sss... बोल ना रे भटा कसा दडून बसलाय." तीने गुरूजींकडे मान वळवत विचारलं. क्षणभर गुरुजींना आपणं अदृश्य अवस्थेत आहोत ना यावर शंका निर्माण झाली. पण ती हडळ पाहू शकत होती शेवटी तिचीही अघोरी शक्ती काही कमी नव्हती. अजूनही ती रिंगणाबाहेरच होती.
         "गेल्या वेळी माझ्याच हातून मेलास तू आता पण मरणार ... आज मला कोणी रोखू शकणार नाही. ए पोरी फक्तं आज माझ्या हाकेला प्रतिसाद दे ... एक जन्म तरसावल तू मला..." हाकमारी दात ओठ खात होती.

           "प्रणू..." लाडिक आवाजात तीने आवाज दिला पण प्रणूच काही एक उत्तर आलं नाही. तशी ती चिडली आणि मोठमोठ्याने हाक मारू लागली पण प्रणू फक्तं तिच्याकडं एकटक पाहत होती. हाकमारीचा राग अनावर झाला. ती तीच्या शक्तीने घरातल्या वस्तू उचलून फेकू लागली. रागात ती प्रणूच्या दिशेने धावली पण पंच तारांकित चिन्हाला पाय लागताच तिला चटका बसला. एखादा क्रूर प्राणी शिकार मिळत नाही पाहता जसा गुरगुर करतो तशीच हाकमारी गुरगुरत होती. प्रणूच्या अंतर्मनातून आवाज आला "रिंगण सोडू नकोस."  भयभीत प्रणू अंग आकसून बसली होती. पण हाकमारी एवढ्यावर थांबली नाही. प्रणूच्या बरोबर डोक्यावर लटकणार पंखा तीला दिसला तशी ती वेडवाकड हसली. मान, कडकड मोडली... मानेला झटका देताच बंद असलेला पंखा वेगानं खाली आला... प्रणूच्या डोक्यावर पडणारच होता इतक्यात वेगानं प्रणू बाजूला झाली... गुरूजींनी तिला बाजूला केलं होतं. धडम करत पंखा रिंगणात येऊन पडला पण एक चूक झाली प्रणू आता सुरक्षा कवचाच्या म्हणजेच रिंगणाच्या बाहेर आली होती. हेच तर हवं होतं त्या चांडाळनीला....

          प्रणू घाबरली होती. समोरच्या रिंगणातले गुरूजी देखील बाजूला झाले होते. हाकमारी क्षणभर अदृश्य होऊन अचानक प्रणूच्या पुढ्यात ठाकली. तीचे पांढरे डोळे जणू काळजाचा ठाव घेत होते. प्रणू त्यात हरवत होती. पण त्याचवेळी गुरुजींचा आवाज आला...
         "रिंगणात आण तीला... तेव्हाच तुला वार करायचा आहे. लक्षांत ठेव."
         हाकमारीने प्रणूच्या दिशेने हात वाढवायला सुरुवात केली तशी प्रणू हळुहळु मागे सरकू लागली. सरकत सरकत ती रिंगणाच्या दिशेने येत होती. प्रणू रिंगणात आली आणि तीने हाकमारीला देखील आत खेचून घेतलं. हाकमारीला भान उरलं नव्हत ती फक्तं आपल्या विजयाचा जल्लोष करु पाहत होती. तीचा हात प्रणूच्या गळ्यावर पडला... ती करकचून गळा दाबू लागली. प्रणू खोकू लागली. घामाने डबडबली... आता आपला अंत जवळ आहे असच तीला वाटू लागलं. तीच्यात प्रतिकाराची क्षमता उरली नव्हती.  क्षणभर डोळ्यासमोर आई, बाबा, आजी, प्रणव दिसले, गुरुजींना चेहरा दिसला... मीरा दिसली... "उठ प्रणू लढ... हा तुझाच नाही समस्त मानव जातीचा लढा आहे... मीरा ओरडत होती" 
"वार कर बालिके विजय आपलाच आहे...वार कर" आवाज कानात घुमू लागले... वेळ मंद झाला... अग्नीकुंड भडकून उठले... रिंगण तेजाळले... प्रणूच्या मुठीत क्षणभर सोनेरी चमक आली.
       "ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिंपुष्टिवर्द्धनम्"  हाताच्या मुठीत लपलेला सोनेरी मुठीचा धारदार सुरा उंचावला गेला...

       "प्राण तीच्या कंठाशी"
     उचलेला सुरा थेट हाकमारीच्या कंठात घुसला. सुऱ्यातून सोनेरी शलाका बाहेर पडल्या... प्रणूच्या गळ्यावरची पकड सैल झाली. प्रणू बेशुद्ध होऊन खाली कोसळली. रेतीचा डोंगर हळुहळु ढासळावा तशी हाकमारी हवेत विरून गेली उरली ती तीची राख... ती ही अग्नी कुंडात सामावली. झप झप करत घरातला एकेक दिवा आपोआप पेटला गेला. पहाटेचे चार वाजले होते. गुरूजी अदृश्य अवस्थेतून बाहेर आले. शंखनाद झाला तसे सगळेजण धावत आले.

        "प्रणू... काय झालं गुरूजी प्रणूला?" बाबांनी विचारले.

       "काळजी नसावी मीरा अर्थातच प्रणू सुरक्षित आहे."

(फ्लॅशबॅक- "हा सुरा म्हणजे एक वरदान आहे. अनादी काळाच्या तपस्येतून हा सूरा मला मिळाला. याचा एकाच वेळी योग्य वापर केल्यास तो आपोआप नष्ट होतो. याच हत्याराने तुला तीचा वध करायचा आहे." यज्ञाची सुरुवात तो सुरा प्रणूच्या हाती सोपवून झाली.)
-------------------------------------------------------------

        हॉस्पिटलच्या बेडवर प्रणू निपचित पडली होती. हाताला सलाईन लावली होती. हळुहळु तीने डोळे उघडले. डोळ्यांच्या कक्षा रुंदावल्या आणि सामोरं आई दिसली.

      "आई..." क्षीण आवाजात तीने आवाज दिला.

   "अहो काकू... पेशंटला थोडा आराम करू द्या... चला बर बाहेर." नर्स ओरडली पण तितक्याच प्रणू देखील ओरडली

      "आई... मला ऐकू येतंय..."

समाप्त!

लेखिका - सौ. प्रणाली निलेश चंदनशिवे.
0

🎭 Series Post

View all