Login

हलगी भाग- १

विलास व कस्तुरी यांची अधुरी प्रेमाची कहाणी

#जलदलेखन

विषय- अधुरी कहाणी प्रेमाची

शीर्षक:- हलगी

भाग- १

"अरं इल्या, हिथं हायसं व्हयं रं तू, अन् म्या समदं गाव पालथं घालून आलो. च्यामारी, कुठं कुठं हुडकलं हुत तुला? अन् तू इथं बसलास व्हयं, ते  काय थोबाड केलं हाईस रं, ते बी सिनेमातल्या हिरोवानी, त्यो नाय का रं त्यो, काय बरं त्याचं नाव? ( एक हात कमरेवर व दुसऱ्या हाताने डोकं खाजवत वर बघत) हा, त्यो म्हणतु नाय का पारो पारो म्हणूनस्यान झिंगत फिरत असतो बघ, मरू दे तिकडे, नाव आठवं ना गड्या." डोकं खाजवून प्रकाश वैतागत म्हणाला.

"त्याचं नाव शाहरूख खान हाय, बे." चिंचेच्या झाडाखाली झाडाच्या बुंध्याला पाठ टेकवून बसलेला विलास डोक्याखाली हात टेकवत व पायावर पाय टाकत त्याच्याकडे बघत सुस्कारा टाकत म्हणाला.

"हा बे तेच म्हणायचं हुतं मला पर नावच इसरलो बघ. " प्रकाश दात विचकत म्हणाला.

"तुझं दात विचकून झालं असलं तर सांगशील का काय झालं माझ्या नावानं कोकलायला तुला?" विलास त्याच्याकडे बारीक नजर करून म्हणाला. 

"अरं, इसरलोच बघ, तुझ्या त्या पारोच्या नादात." तो कपाळावर हात मारून घेत म्हणाला.

"ये पक्या, तिचं नाव कायपायी घेतोस, हिथं तिचा काय बे संबंध?" विलास रागात ताडकन उठून उभा राहतं कपडे झटकत म्हणाला.

"आरं, चुकलंच माझं, तिच नावं पारो नाय नव्हं का? ते जाऊ दे बे, सुपारी मिळाली हाय ते सांगायला आलतु. लय मालदार पार्टीबी हाय बघ." प्रकाश विषयाला बगल देत खुशीत म्हणाला.

"ये नाय बे येणार मी, कितीबी मालदार पार्टी असू दे, पक्या मी नाय येणार कुठंबी. तुला जायचं असलं तर तू जा." असे म्हणत विलास त्याच्याकडे पाठ करून माळवणाऱ्या सूर्याकडे पाहू लागला.

संध्याकाळी अस्ताला जाण्याऱ्या सूर्याचे ते केशरी रंग धरतीवर विखूरली असल्याने क्षितिजाचा रंगही खूप विलोभनीय दिसत होतं. त्यात त्या चिंचेच्या झाडाजवळ थोडे पुढे एक तलाव होतं. त्या तलावातील सूर्याचे प्रतिबिंब अतिशय सुरेख दिसत होतं. विलास तेच दृश्य न्याहाळत होता.

"अबे, पुढे ऐकून तर घे. ती पार्टी काय हिथली नाय बरं, ती दुसऱ्या गावातील हाय." प्रकाश दोन पावलं त्याच्या मागे जात त्याला म्हणाला.

"हा मंग, जा की तू त्या गावात." तो खाली वाकून दोन-चार खडे हातात घेत त्यातील एक खडा तलावात भिरकवत म्हणाला.

"अरं ये खुळ्या, अजून कशी तुझी बत्ती पेटली नाय. म्या एकटा कसा जाऊ? मला काय तुझ्यावानी भन्नाट थोडी ना हलगी वाजविता येते. तसा तर म्या बी झॅकच हलगी वाजवितो म्हणा पर तुझी सर न्हाय येतं मला. त्यात ते मालक म्हणल्याती की इल्याला आवर्जून घेऊ ये म्हणूनस्यान अन् हे बघ बिदागी बी दिलीया ते बी हजार रूपये." प्रकाश खूश होतं शर्टाच्या खिशातील पाचशेच्या नव्या कोऱ्या करकरीत नोटा विलाससमोर नाचवत म्हणाला.

"तुला ठाव हाय नव्हं, पक्या की मला पैशाची अजिबात हाव नाय. मला हलगी वाजवायला आवडतं म्हणून मी वाजवतो. अन् हेच मी थोड फार पैसे भेटतात म्हणून पण वाजवतो पण ते बी माझ्या समाधानासाठी. पोटापुरतं मिळतं ना मंग कशापायी जास्तीची हाव करायची. अन् ही बिदागी घ्याया आधी तुला मला एकदा इचारावं असे नाय वाटल का बे?" विलास हातातले सर्व खडे एकामागोमाग एक त्या तलावातील पाण्यात भिरकावत चिडत म्हणाला.

"समद ठाव हाय रं, पर म्या ती सुपारी तुझ्यापायी घेतली. तुझी ती त्याच गावात हाय ना, म्हणूनस्यान ही सुपारी घेतली. चिडतोस कशापायी?" प्रकाश डोळे मिचकावत व डोकं झुलवत म्हणाला तसा विलास चमकून त्याच्याकडे पाहत गरकन मागे फिरला व त्याचे दोन्ही खांदे पकडत म्हणाला,"तू खरं सांगतोस ना."

"आईची आण बे. एकदम खरं सांगतो. तुझ्या हलगीच्या आवाजाने ती गावात कुठेबी असू दे पळतच येती का नाय, बघच तू." प्रकाश स्वतःच्या गळ्याला बोटाच्या चिमटीत पकडून म्हणाला.

"ठीक हाय मंग, कधी जायचं हाय? ते सांग म्हंजे मी घरी सांगतो तसं, हलगी वाजवायला इतकी मोठी रकम मिळतिया हे ऐकून आईला लय आनंद होईल बघ, लय मोठं थँक्यू बे तुला." विलास हसत त्याला मिठी मारत म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावर आता एक वेगळीच चमक आली होती.

"अय, ते थँक्यू बिंक्यू मला नग म्हणूस. ठाव हाय मला तिच्यासाठी त्या गावाला यायला तयार झाला हाईस तू. म्या काय खुळा हाय व्हयं मला न समजाया." प्रकाश त्याची मिठी सोडवत म्हणाला.

क्रमशः

कोण असेल ती ? काय झालं असेल विलासच्या पूर्वायुष्यात? ती त्याला पुन्हा भेटेल?

वाचू या पुढील भागात-