#जलद लेखन स्पर्धा
विषय:- अधुरी कहाणी प्रेमाची
शीर्षक:- हलगी
भाग- २
विलास गालात हसत डोक्यावरील केसांवर हात फिरवत खाली बघू लागला. तसा प्रकाश खाली वाकून त्याच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाला, "ओय, होय किती भारी हसतोस तू. मगाशी तर देवदासवानी थोबाड लटकलं हुतं, आता फकस्त तिच्या गावाला जायचं म्हणलं तर माझा दोस्त किती हसतोय अन् लाजतोय बी. ती भेटल्यावर तर काय तुझी शिट्टी बिट्टी गुलच हुईल नव्हं." तो त्याच्या खांद्याला धक्का मारत डोळा मारत हसत म्हणाला.
विलास हसत त्याची मान बगलेत पकडून त्याला ओढत घरी घेऊन गेला.
दोघेही संध्याकाळी आपापल्या घरी गेली. रात्रीच्या जेवणानंतर विलासने आईला तो दुसऱ्या गावात हलगी वाजवायला जाणार आहे. त्यासाठी त्याला चांगले पैसे पण मिळणार आहेत असे सांगितल्यावर ती खूप खूश झाली. सकाळी लवकर उठवायला सांगून तो झोपायला बाहेर अंगणातल्या बाजेवर पहुडला. त्याचे घर झोपडी वजा होते. त्याचे आईवडील व तो त्या घरात राहायचे. एक बहिण होती तिचे लग्न झाले होते. वडिल दारूच्या आहारी गेलेले. त्याची आई लोकांच्या घरी धुणभांड्यांची काम करायची. त्याचे वडिलही आधी हलगी वाजवायचे, ज्यात ते पैसे कमवायचे ते सगळे दारू पिण्यात घालवायचे. आई जे चार घरचं उरलेले अन्न दिले जायचे तेच खाऊन कसंबसं जगायचे. हा थोडं मोठा झाल्यावर वडिलांबरोबर हलगी वाजवायला जायचा तो लवकरच ते वाजवायला शिकला होता. तो मोठा होत गेला तसा त्याच्या वडिलांनी त्याच्या जबाबदारीतून अंग काढून घेतलं. त्याच्या व आईच्या जीवावर तो जगू लागला.
विलास इतका सुरेख, समरसून हलगी वाजवायचा की त्या तालावर कित्येकांचे पाय थिरकल्याशिवाय राहत नसायचे. अख्ख्या पंचक्रोशीत त्याच्याच हलगीचा नाद घुमायचा. त्याला साथ द्यायला त्याचा लंगोटी यार प्रकाश प्रत्येकवेळी त्याची साथ द्यायचा. दोघांची जोडी म्हणजे शोले चित्रपटातील जयविरूच जणू. शाळा शिकत शिकत त्याची आवड तो जोपासायचा. गावात कोणाचाही सुखदुःखाचा कार्यक्रम असो इल्याची हलगी घुमायचीच. गाव फार मोठं नव्हतं म्हणून दहावी नंतरच्या शिक्षणासाठी दुसऱ्या गावी किंवा शहरात जावं लागायचं. विलास व प्रकाश दोघेही पुढील शिक्षणासाठी शेजारच्या गावी गेले.
अंगणातील बाजेवर एक हात डोक्याखाली घेत पहुडलेला विलास रात्रीचे आकाशातील सुरेख चांदणे पाहत होता. त्यात पौर्णिमा असल्याने चंद्राचा शीतल प्रकाश पडलेला. त्या चंद्रात त्याला तिची छबी दिसली तसा तो गालात हसला. उद्या तिच्या गावाला जाण्याचा आनंद होता. आपल्या हलगी तिला आपल्याकडे खेचून आणेल यावर त्याचा दृढ विश्वास होता. तिला आपण किती दिवसांनी भेटणार आहोत, पण ती भेटेल का? आणि भेटली तरी ती आपल्याला ओळखेल का? आपल्या मनात जे आहे ते आपण सांगू का? तिच्या डोळ्यात, वागण्यात बोलण्यात तर आपल्याबद्दल अपार प्रेम दिसायचं, जाणवायचं. माझ्या वागण्या बोलण्यातून ते तिला दिसलं असेलच ना? बघू या उद्या जातच आहोत तर कळेलच की? आकाशातील चंद्र, तारे निरखत तो मनातल्या मनात बोलत होता.
काही वर्षांपूर्वी..
दहावी नंतरच्या शिक्षणासाठी विलास व प्रकाश दुसऱ्या गावी येऊन जाऊन करत होते. त्यांच्या गावापेक्षा हे गाव जरा आधुनिक पध्दतीचं होतं, त्यामुळे दोघांनाही त्याचं कुतूहल वाटू लागलं जास्त करून प्रकाशला.
"अरं, इल्या कसलं भारी काॅलीज हाय बे. माझं तर डोळे दिपून गेले. अन् पोरी तर बघ अप्सरावानी एकापेक्षा एक सुंदरा हायती. बाबो, असं पहिल्यांदाच बघतुया म्या." काॅलेज व तेथील मुली पाहत प्रकाश विलासला हसत म्हणाला.
"अय, घुम्या. हे आपल गाव नव्हं हे ध्यानात ठेव. आपण दुसऱ्या गावात आलोय आणि काय रे काॅलिज काय म्हणतोस काॅलेज म्हण. आणि हो आपल्या गावाकडे मुली न्हायती व्हयं, याच्या परीस मस देखण्या पोरी हायती की. तोंड बंद ठेव तुझं. हिथ आपण शिकायला आलो आहोत, पोरी बघाया नाय, समजलं का? " विलास त्याच्या डोक्यात टपली मारत हसत म्हणाला.
"व्हय रं, पर हिथली गोष्ट वेगळी हाय." प्रकाश म्हणाला. तस याचं काही होऊ शकत नाही असे मान हालवत ते काॅलेजच्या पायऱ्या चढू लागले.
ते दोघे गप्पा मारत चालले होते तोच पुढून एक मुलगी घाईत चालल्याने त्यांना धडकली. तिच्या हातातील वह्यापुस्तके खाली पडली. त्यात तिच्या डोक्याला विलासचे सॅक लागले तसे ती "आऽऽस्सऽऽ" करत डोके चोळू लागली.
ती वैतागत डोके चोळत म्हणाली,"ये, डोळे फुटले का रे? नीट बघून चालता येत नाही का?"
"ये पोरी, तू आम्हाला धडकलीस, उलट आम्हास्नीस बोलतीस व्हयं. कमालच हाय. डोळं तुझं फुटल्यात, तूच बघून चालयच हुतसं." प्रकाश त्या मुलीशी हुज्जत घालतं होता तर विलास तिच्या सौंदर्यांत अडकून पडला होता.
क्रमशः
कोण आहे ती? काय होईल पुढे? पुढच्या भागात वाचा..
©️ जयश्री शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा