Login

हलगी भाग-३

विलास व कस्तुरी यांची अधुरी प्रेमाची कहाणी

#जलद लेखन स्पर्धा

विषय:- अधुरी कहाणी प्रेमाची

शीर्षक:- हलगी

भाग-३

तिचे पाणीदार डोळे, थोडसं बसकं नाक, लाल ओठ, गोल चेहरा, लांब सडक काळेभोर वाऱ्याने भूरूभूरू उडणारे केस, रंग एकदम गोरा, मध्यम बांधा व उंची असलेल्या तिने गुलाबी रंगाचा पंजाबी सूट परिधान केला होता ज्यात ती खूपच आकर्षक दिसत होती. बोलताना तिचे केस वारंवार तिच्या चेहऱ्यावर येत होते. तेव्हा कधी ती झटका देत होती तर कधी वैतागत मागे सारत होती. ती दोघं भांडत होती, हा बघ्याची भूमिका करत भान हरपून बघत होता.

"अगं कस्तू, तू इथे काय भांडत बसली आहेस? चल लवकर तास सुरू होईल?" असे म्हणत दुसरी एक मुलगी तिला हाताला धरत तिथून बळजबरीने ओढत वर्गात घेऊन गेली. ती मात्र जाता जाताही प्रकाशला रागात बोट करत डोळे मोठे करून बघून घेईन असे सांगत तेथून गेली.

ती निघून गेली तरी विलास मात्र अजूनही त्याच दिशेला पाहत होता. प्रकाश काय बोलत होता याकडे त्याचं अजिबात लक्ष नव्हतं. किती वेळ तो त्याला आवाज देत होता पण तो होता टस की मस झाला नाही. त्याने जोरात खांदे धरून हलवले तेव्हा तो भानावर आला.

"अय, इल्या कवापासून आवाज देतोय, ऐकू येत नाही का तुला? किती बोलली ती पोरगी मला अन् तू काय ढिम्मासारखा उभा होतास. मला काय म्हणालास मगाशी हा, म्या म्हणू का आता पोरगी कवा बघितली नाय का म्हणून?" प्रकाश चिडून त्याला म्हणाला.

"बघितल्यात किती तरी पोरी, पण हिची बातच निराळी हाय बघ, कसली भारी दिसती ती !" विलास त्याच्या बाकी बोलण्याकडे दुर्लक्ष करत तिचा चेहरा आठवत म्हणाला.

"हे बेन तर, गेलं कामातून याला बोलून काय फायदा नाय, पुन्हा ती भेटू दे मंग दावतो तिला?" प्रकाश रागात चरफडत मनात बोलला.

"ओय, आपण हिथं शिकायला आलो हाय नव्हं, पोरी बघाया नाय. चल गुमान आत. सर आले असतील. आयला पहिल्या दिवशी मांजर आडवी आली." प्रकाश रागात त्याचेच वाक्य म्हणत त्याला घेऊन त्यांच्या वर्गात जाऊन बसला.

थोड्यावेळाने त्याचं लक्ष गेलं त्याचं मुलीकडे गेलं तेव्हा तो आणखी वैतागत तोंड वाकड करत पुटपुटला,"अरे देवा, या मांजरीला आमच्या वर्गात यायचं होतं का?"

तो कुठे बघतोय हे बघण्यासाठी जेव्हा विलासने मान वळवली तेव्हा त्याला सुखद धक्का बसला आणि  चेहऱ्यावर आनंद झळकला. कारण ती तिच होती मगाशी प्रकाशबरोबर भांडणारी. त्याला पहिल्या नजरेत तिच्यावर प्रेम झालं होतं. आपल्याच वर्गात तिला पाहून त्याचा आनंद द्विगुणीत झालेला. पण अजूनही तिचं नाव त्याला व्यवस्थित माहिती नव्हतं. नंतर ओळख करून देताना तिचं नाव कस्तुरी असून ती त्याच गावची असल्याची त्याला माहिती झालं.

रोजचं त्याचं काॅलेजला येणं जाणं चालू झालं. रोज तिच्या ओढीने तो काॅलेजला लवकर येण्याची घाई करत यायचा. ही गोष्ट प्रकाशच्या नजरेतून सुटली नाही. तो त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता पण विलास प्रेमाच्या एकतर्फी नावेत सवार झाला होता, त्यामुळे त्याचं समजावणं त्याने समजूनच घेतले नाही. प्रकाश व कस्तुरी जेव्हा जेव्हा भेटायचे तेव्हा तेव्हा एकमेकांना खुन्नसच द्यायचे. पण विलास मध्यस्ती करून सोडवायचा.

असेच काही दिवस निघून गेले. विलास मात्र तिच्यात पूर्ण गुंतला होता. तो दिसायला तसा देखणा होताच. चारचौघात उठून दिसावं असं त्याचं देखणं रूप होतं.
कस्तुरीला पाहिल्यापासून तो आपल्या राहणीमानावर थोडा लक्ष देऊ लागला होता.

गणेशोत्सव सुरू झाला तेव्हा काॅलेजमध्येही गणेश मिरवणूक काढण्यात आली तेव्हा विलास व प्रकाश दोघेही बेफामपणे हलगी वाजवायला लागले. विलासची हलगी धरण्याची व वाजवण्याची स्टाईल पाहून सगळ्या मुली त्याच्यावर फिदा झाल्या. त्यात कस्तुरी पण होती. तो कस्तुरीलाही आवडू लागला. तिने स्वतःहून त्याच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला. मग काय विलासराजे सातव्या आसमानावर विराजमान झाले. प्रकाशची तिने माफी मागून त्याच्याशीही पण मैत्री केली. त्यानेही विलासमुळे तिची मैत्री कबूल केली.

हळूहळू त्यांची मैत्री छान वाढू लागली. विलास तर तिचा दिवाना होताच. तिच्यावर तो जीव ओवाळून टाकायचा. पण मनातले प्रेम शब्दाने ओठांपर्यंत त्याला सांगता आलेच नाही. तीही हसत खेळत वागायची. तिला तो आवडतो हे तिच्या वागण्या-बोलण्यातून दिसून येत होतं. पण ते प्रेम आहे की नाही हे कळत नव्हतं. प्रकाश विलासला कित्येकदा मनातला तिला सांग म्हणत होता पण योग्य वेळी तो सांगेल असे म्हणत त्याने सांगितलेच नाही. तिला विलासने हलगी वाजवलेले खूप आवडायचे. ते वाजवताना त्याचे डोक्यावरचे केसही एका लयीने नाचतात असे तिला वाटायचे तेव्हा ती नेहमी तो हलगी वाजवत असताना त्याचे केस न्याहाळत असायची.

क्रमशः-

कस्तुरी व विलास एकमेकांना आपल्या मनातील सांगतिलं का?