Login

हलगी भाग-४

विलास व कस्तुरी यांची अधुरी प्रेमाची कहाणी

#जलद लेखन स्पर्धा

विषय:- अधुरी कहाणी प्रेमाची

शीर्षक:- हलगी

भाग-४

बघता बघता काॅलेजचे दिवस सरून गेले. शेवटच्या दिवशी तो तिला सांगणार होता. पण ती त्या दिवशी आलीच नाही. नंतर पण तो प्रकाशसोबत काॅलेजमध्ये जाऊन आला ती भेटेल या एकाच आशेने पण प्रत्येकवेळी त्याच्या पदरी निराशाच पडायची. त्याला तिचे नाव व गाव सोडता बाकी काहीच माहिती नव्हतं. त्यालाही कधी तसी गरज वाटली नाही. फोन तर त्याच्या जवळ नव्हता. कधी तरी प्रकाशचा फोनवर बोलायचा पण जास्त नाही. त्याच्या खिशाला ते परवडणारे नव्हतेच. तिनेही तिच्या बाबांना आवडणार नाही म्हणून नंबर कोणालाच दिला नव्हता. त्यामुळे तिच्याशी संपर्क साधणे अवघड होतं. काॅलेज संपून सुट्ट्या असल्याने दुसरे कोणी मित्र-मैत्रिण भेटण्याची शक्यता नव्हतीच. त्यामुळे तो खूप हताश झाला. नंतर निकालाच्या वेळीही ती आली नसल्याने भेट झालीच नाही. तिच्याबद्दल कोणाला काही माहितीही नव्हते. त्यानंतर ते गावाकडे आले. पण तेव्हापासून विलास खूपच उदास राहू लागला.

आता वर्तमानात

कस्तुरीच्या गावची हलगी वाजवण्याची सुपारी भेटताच त्याच्या मनात तिला भेटण्याची आशा पल्लवित झाली. तिच्या भेटीच्या विचाराने तो आनंदाने रात्री आकाशातील चांदण्या टिपत होता. त्यातील एका चमकत्या चांदणीला मनात म्हणाला,"तुझ्यापेक्षा जास्त सुंदर माझी कस्तुरी चांदणी आहे. उद्या तिला भेटलो ना माझं तिच्यावर किती प्रेम हाय हे सांगू टाकेन आणि मला माहिती तिचंही माझ्यावर प्रेम हाय. ती होकार देईल याची खात्री हाय. अन् तिने जर होकार दिला ना तर कधीच तिला स्वतःपासून दूर करणार नाय. अगदी राणीवानी ठेवेन तिला. खूप प्रेम देईन. आता काही दिवसांनी मला चांगली नौकरी लागणार हायच. मग कशाचाच प्रश्न येणार नाय."

कस्तुरीसोबतचे सुखी संसाराचे स्वप्न बघत तो  खूप उशिरा झोपी गेला. तरीही सकाळी लवकर उठून तो मस्त आवरून तयार झाला. आधीपेक्षा आता छान दिसत होता. तब्बेत थोडी कमी झाली होती. दाढी राखल्याने त्याच्या मर्दपणा आणखी रांगडा वाटत होता. कित्येक दिवसांनी आज तो आरश्यासमोर उभा राहून स्वतःकडे बघत होता. पुन्हा पुन्हा केसावरून कंगवा फिरवत होता. चेहऱ्यावरून हात फिरवत होता. त्याची आई कधीपासून त्याचे चाळे बघत होती.

"काय रं इल्या, आज काय इशेश हाय व्हय रं, एवढं कशापायी नटून तटून बघतोस आरश्यात? लगीन कराया तर नाय नव्ह चाललास मल न सांगता?" त्याची आई त्याची फिरकी घेत हसत म्हणाली.

"काकी, तसं समजा तुम्ही आता." प्रकाश आत येत म्हणाला.

"ये आई, याचं काय बी ऐकू नकोस, तसं काय बी नाय. ये पक्या चल लवकर आपल्याला वेळ होतोय." तो पक्यावर मोठे डोळे करत त्याला ओढत घराबाहेर घेऊन गेला.

त्याची आई आतून आवाज देत होती तर तो "आई, येतो मी." असे बाहेरून आवाज देत निघून गेला. 

आपल्या मुलाला कित्येक दिवसांनी खूश बघत ती माऊली मात्र सुखावली. "असाच सुखात राहा माझ्या लेकरा." त्या माऊलीने आनंदाने डबडबलेल्या डोळ्यांनी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीला पाहून आशीर्वाद दिला.

घरापासून थोडं लांब गेल्यावर विलास त्याची मानगूट पकडत म्हणाला,"पक्या, गैबान्या, अरे तुला अक्कल हाय काय नाय, आईसमोर काय बडबडत होताच? अजून कशात काय नाय अन् तू लग्नाचं बोलतोस?"

"आरं, चुकलं बाबो, सोड की मान. दुखायला लागलयं लका. असं बी आता चाललो हाय नव्हं. तर लगीन करायचं म्हण की तिला?" प्रकाश त्याच्या मानेवरील हात सोडण्यास गयावया करत म्हणाला.

"भेट व्हायची हाय अजून, काय माहिती होईल की नाय? " तो त्याची मानगूट सोडत उदास होत म्हणाला.

"आता तू गैबान्या हाईस, आधीच कशापायी ना चा नाट लावतोस. चल गपचिप." प्रकाश थोडा रागात म्हणाला तसा तो चुपचाप झाला.

दोघेही त्या गावी दिलेल्या पत्त्यावर पोहोचले. त्या ठिकाणी कोणाचे तरी लग्न होते असे तेथिल लगबगीवरून दिसून येत होतं. लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. सकाळचे साडे दहा वाजले होते. घर तर मोठं खानदानी व श्रीमंत वाटतं होतं. मग असे असताना त्यांनी डाॅल्बी ऐवजी हलगीवाल्याला का बोलावले असेल हा प्रश्न त्या दोघांना पडला. तेवढ्यात एक मुलगी त्यांच्याजवळ आली. तुमच्यापैकी विलास कोण आहे हे तिने विचारले, विलासने तो विलास आहे हे सांगताच तिने त्याच्या हातात एक चिठ्ठी दिली, पटकन वाचून माझ्यासोबत चला असे सांगून ती थोड्या अंतरावर जाऊन उभी राहिली. दोघेही गोंधळून गेले. भरल्या लग्न घरात कोणी चिठ्ठी पाठवली, कशासाठी या त्याच्या मनातील प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी तो एका बगलला गेला. प्रकाश आजूबाजूला नजर ठेवायला सांगून तो चिठ्ठी उघडून वाचू लागला.

"तुला भेटायचं आहे शेवटचं, त्या मुलीसोबत ये.

कस्तुरी."

क्रमशः

चिठ्ठी कस्तुरीचीच असेल का? कस्तुरी विलासला भेटेल का?