Login

हलगी भाग- ५ ( अंतिम )

विलास व कस्तुरी यांची अधुरी प्रेमाची कहाणी

#जलद लेखन स्पर्धा

विषय- अधुरी कहाणी प्रेमाची

शीर्षक:- हलगी

भाग- ५ (अंतिम)

कस्तुरीचं नाव वाचून हसावं की रडावं हे त्याला कळेना आणि त्यात ही चिठ्ठी तिनेच लिहिली की काही घातपात तर होणार नाही ना. अनेक प्रश्न त्यांच्या मनात पिंगा घालत होते. तो एका जागी त्या चिठ्ठीकडे बघत स्तब्ध उभा होता. त्याला तसे पाहून प्रकाश त्याच्या जवळ जात ती चिठ्ठी वाचली. काय कळावं ते कळतं नाही तोच ती मुलगी पुन्हा आली व म्हणाली,"चल लवकर, भैय्या." म्हणत त्याच्या हाताला धरून ओढत एका रूमजवळ घेऊन आली. तिने प्रकाशला बाहेर थांबवले व विलासला आत पाठवून देत बाहेरून दार लावून घेत ती बाहेर येऊन प्रकाशसोबत थांबली.

आत जाताच अंधार बघून विलासला प्रचंड घाबरला त्याच्या अंगालादरदरून घाम सुटला. भीतीचा एक आवंढा गिळत तो हिम्मत एकवटत हळूहळू पुढे पाऊले टाकत होता तोच लाईट लागली. त्याने दचकून पाहिले तर नवरीच्या वेशात एक मुलगी पाठमोरी उभी होती. तिला पाहून तर तो आणखीनच घाबरला.

"तू ऽऽतू कोण आहेस? मला इथे का बोलवसं?" तो घाबरत तिला म्हणाला.

"विलास, ओळखलंस नाहीस का मला?" ती मुलगी वळून त्याला म्हणाली.

तिला पाहून तो तीनताड उडाला. कारण ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नव्हती ती त्याची कस्तुरी होती.

थोडा वेळ त्याला कळलच नाही की ती खरीच आहे की स्वप्न आहे की भास आहे. तो तिच्या जवळ जात तिला हात लावणार तर ती थोडी पुढे आली. तेव्हा
तिचे आसवांनी तुडुंब भरलेले डोळे दिसले. ती रडत त्याला बिलगली. त्याला हे सगळे स्वप्नच वाटत होते. तो अजूनही धक्क्यातच होता. जेव्हा तिची मिठी घट्ट झाली तेव्हा भानावर येत तिला घट्ट मिठीत आवळून घेतलं. थोडावेळ कोणीच काही बोललं नाही.

नंतर तिची मिठी सैल झाली तसा तोही मिठी सोडत तिला काही बोलणार तोच ती त्याला म्हणाली, "विलास, आधी माझं पूर्ण बोलणं ऐकून घे, मध्ये काहीही बोलू नकोस, प्लीज. मला माहिती आहे की तुझं काॅलेजमध्ये असल्यापासून माझ्यावर प्रेम आहे, माझंही तुझ्यावर प्रेम आहे रे. पण आपल्यात खूप मोठी दरी आहे. फक्त गरीब-श्रीकांतीची नाही रे, जातीची पण भिंत आहे. जे भेदणे तुलाच काय मलाही शक्य नाही रे."

ते बोलताना ती रडत रडत होती. तो काही बोलणार तर मध्येच थांबवत म्हणाली "म्हटलं ना मला बोलू दे, आज थांबवू नकोस, विलास. माहिती नाही पुन्हा कधी बोलू शकेन की नाही. तुला वाटलं असेल ना की आपण पळून जाऊन लग्न करू, लांब जाऊ. ते शक्य नाही रे, मला माझ्या जीवाची पर्वा नाही रे, तुझी काळजी वाटते, माझे घरचे राक्षस आहेत राक्षस. आपण जर पळून गेलो ना तरीही ते पाताळातूनही आपल्याला शोधून काढतील. तुझे हाल हाल करून मारतील. एवढच नाही तर तुझ्या घरच्या लोकांनाही फक्त देशोधडीला तर लावतील, आयुष्यातून उठवतील. कुत्र्यापेक्षाही बेकार हाल करतील रे. म्हणून मी काॅलेजमध्ये माझ्या मनातलं तुझ्याबद्दलचे प्रेम व्यक्त करू शकले नाही. माझ्या घराच्यांना थोडी जरी भनक लागली असती ना तर तेव्हा सगळे संपल असतं म्हणून मी तुला ना एकांतात भेटले ना कधी पूर्ण नाव, पत्ता व फोन नंबर सांगितला. एवढंच काय माझ्या बाकी मित्र-मैत्रिणांनाही जास्त काही माहिती नाही. घरी मैत्रीबद्दल जेवढ्याच जेवढं वागायचं बोलायचं परमिशन होती. थोडं जरी मी जास्त जवळीक साधायचा प्रयत्न केला की मग माझे शिक्षण बंद झालं असतं. म्हणून तर मी जास्त कशात सामील होत नसायचे. तुला आठवत का परीक्षेच्या आधी मी काही दिवस काॅलेजला आले नव्हते, त्याचं कारण आता कळलं असेल तुला? पण नशीब तुझ्याबद्दल कोणी काही बोललं नाही. तेव्हा माझा जीव भांड्यात पडला. परीक्षा पण मी खूप विनवणी केल्यावर द्यायला परमिशन मिळाली होती. मी जाणून बुजून तुला टाळत आले ते यासाठीच. आता माझी एक इच्छा पूर्ण करशील. आज माझ्यात लग्नात हलगी वाजवशील. त्यासाठी तुझं नाव मीच घरच्यांना माझ्या विश्वासू माणसाकडून सुचवलं होतं. आता जास्त प्रश्न विचारू नकोस. जा तू तुला माझी शपथ आहे. कोणी बघायच्या आधी. जा पटकन."

त्याला काहीही बोलू न देता ती त्याला पुन्हा एकदा मिठी मारून त्याला रूमबाहेर पाठवून दिले. काय चाललंय काहीच कळतं नव्हतं. तो प्रकाशला घेऊन खिन्न मनाने पुन्हा त्या आलीशान घराच्या बाहेर आला. इतके लोक होते म्हणून कोणाला काही लक्षात आलं नाही.

त्याने सगळी हकीकत प्रकाशला सांगितली त्यावर कसं व्यक्त व्हावं हेच त्याला कळेना. तिची इच्छा म्हणून तो जड अंतःकरणाने हलगी वाजवू लागला. प्रकाशही त्याला साथ देत होता. पण त्या दोघांना कुठे माहिती तिची इच्छा ही तिची शेवटची इच्छा होती. इकडे हलगी वाजली आणि तिने शेवटचा श्वास घेतला.

तेव्हा वरूणराजाने जोरदार सौदामिनीच्या कडकडाटाने वर्दी दिली. जणू त्यालाही ही अधुरी प्रेम कहाणी पाहावले नाही. 

समाप्त:-

©️ जयश्री शिंदे

सर्वच प्रेम कहाणी पूर्ण होत नाही. काही कहाण्या गरीब-श्रीमंत, जात- धर्म आड आल्याने अधुऱ्या राहतात. खरं प्रेमात हा भेदभाव नसतोच पण तरीही समाजात ते मानलं जातं आणि विलास- कस्तुरी यांच्या सारखी अधुरी कहाणी प्रेमाची बनते.

सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे.

🎭 Series Post

View all