Login

हळदी कुंकू आणि तीर्थ प्रसाद

Funny Incident On Sankranti
#कथा
*विषय :- हळदी कुंकू*

*हळदी कुंकू आणि तीर्थ प्रसाद!*

*लेखिका ©® स्वाती बालूरकर, सखी*


मी नवरा नावाचा एक गरीब प्राणी रविवारी सकाळी नवीन वर्षाच्या खर्चाचा हिशोब मांडत होतो . बायकोच्या हट्टापायी यावर्षी जरा जास्तच खर्च झाला होता.

इतक्यात सकाळी सकाळी अगदीच सुंदर मूडमध्ये माझी बायको जान्हवी अगदी जवळ येऊन बसली.

“अहो s काय करताय?” पेपरवर आकडेमोड पहात तिने लाडाने विचारलं.

तिच्या त्या प्रश्नाने काही क्षण मला धडकीच भरली.

इतकं मधाळ हसू, जान्हवीच्या चेहऱ्यावर फारच दुर्मिळ वेळी पहायला मिळतं.


“काय विचार आहे?” मी बिचकत विचारलं.

“अहो असं काय करताय? सहजच विचारलं?”

“काय गं? तुझ्या तब्येत बरी आहे ना . . म्हणजे आज लाडीगोडीने बोलते आहेस म्हणून विचारले ?”

“म्हणजे काय मी प्रेमाने कधी बोलतच नाही का? जा बाबा तुम्ही असंच करता? तुम्हाला ना माझ्या प्रेमाची किंमतच नाही?”

“ अगं हे सगळे डायलॉग सगळ्या बायकांनी बोलून झालेले आहेत काहीतरी नवीन बोल की” अर्थात हे मी मनात म्हणालो.

“ ऐका ना दहा बारा दिवसांवर संक्रांत आलीय .”

“ हो ती तर दरवर्षीच येते, “ माझ्या मनातले शब्द (कंसामध्ये.)
“ हे विचारायचं होतं की. . . म्हणजे मग आपण हळदीकुंकू कुठल्या दिवशी ठेवूया?”

“हळदी कुंकाचा माझा काय संबंध ? कधी ठेवूया आपण का म्हणतेस? मी हजर असतो तरी का तुझ्या हळदी कुंकवाला?” मी विचारपूर्वक.

“तसं नाही गडे, तुमच्या सोयीने . . तुम्ही घरी असाल त्या दिवशीच मी हळदीकुंकू करते नाही का?”

“जान्हवी , साफ खोटं! मी घरी नसेल त्या दिवशी तू बायकांना हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवतेस , एवढं काय ते मला इतक्या वर्षात कळलं नाही ?”

“अहो, तसं नाही,तुमच्या सोयीने ठेवते असं म्हणायचं होतं मला. आणि हो संक्रांत म्हणल्यावर ते वाण समान वगैरे?” जान्हवी अडकली.

“म्हणजे यावर्षी काय लुटण्याचा बेत आहे तुझा?”
म्हणालो खरा पण मनात वाटले -
'काय लुटण्याचा पेक्षा कुणाला लुटण्याचा आणि कितीला लुटण्याचा ? हे प्रश्न जास्त तीव्र होतात.'

“तुम्ही सुचवा बरं काही यावर्षी. . तेच आणुयात.”

मला शंभर टक्के खात्री होती की मी ज्या गोष्टी सांगेन त्यापैकी नक्की ती कुठलीच गोष्ट मनावर घेणार नाही पण ती विचारते म्हणल्यावर तिच्या सन्मानात प्रतिक्रिया दिलीच पाहिजे -
पितळेच्या , स्टीलचा, प्लास्टिक , घरगुती गोष्टींचा, पूजेच्या उपयोगी वस्तू वगैरे सूचना मी दिल्या.

तिने ठरल्याप्रमाणे तिच्या मनात जे आहे तेच माझ्या कडून वदवून घेतलं , तिने त्या वस्तूचं नाव सांगताच लक्षात आलं की माझा जानेवारी महिन्याचा हिशोब डळमळून गेला आहे.

“इतकी महाग वस्तू ? किती डझन लागेल ? “ मी हिशोब मांडायला लागलो.

दरवर्षी माझ्या खर्चाच्या हिशोबात संक्रांत घेत नाही आणि जान्हवीच्या मनात हा सण महत्वाचा असतो.

“अहो, इतकं काही नाही, जास्त नको , म्हणजे 60 बायकांना वगैरे बोलवणार मी !”

“इतक्या बायकांना घरी बोलणार ?” मी धक्क्यात.

“ हो मग इतक्या घरी तर मी जाते ना , मग त्यांना नको का बोलवायला?”

* हा पण तर दरवर्षीचाच बोलून गुळगुळत झालेला डायलॉग का माझ्या लक्षात येत नाही.*

यावर्षी पुन्हा तेच
संक्रांत बदलणार नाही , ती बदलणार नाही ना मी!

“बरोबर. मग आता म्हणणं काय आहे तुझं?”

“ नाही हो, मी हळदी कुंकू कधी ठेवायचं हे विचारण्यासाठी आले होते पण त्या अगोदर वाणाच्या आपल्याला वस्तू नको का आणायला? कधी जाऊयात बाजारात?” जान्हवी तयारीतच आली होती.

“ हे बघ तुमच्या त्या लुटण्याचे सामानात तू मला गुंतवलं नाही तर बर, तुझं काय बजेट आहे ते सांग प्रमाणे मी तुला पैसे द्यायला मोकळा . पण प्लीज बघ जास्त खर्चात पडू नकोस . . .
म्हणजे समजून घे ना गेल्या महिन्यात ऑलरेडी ख्रिसमसच्या सुट्ट्यात आपण फिरायला गेलो,
नवीन वर्षाच्या रात्री आपण बाहेर पार्टीला गेलो हो किनई! त्याच्या खर्चाचाच मेळ लागत नाहीय ग!”

तिने पावित्राच बदलला,
“जळलं मेलं लक्षण! कधी नव्हे ते थोडी हौस मौज केली तर लगेच हिशोब!
नवीन वर्ष सुरू होऊन पाच दिवस पण झाले नाहीत तुम्ही लगेचच खर्चाचा ताळा दाखवायला सुरुवात केली . म्हणजे माणसाने हौसमौज करावी की नाही की त्या खर्चाचा विचार करूनच डोक्याला ताण द्यावा !”
ती चक्क रुसून बसली आत्ता?

“ जानू ऐक ना, डोक्याला ताण तुला नाही ग, मला होतो. तुला काही आहे का त्याचं?”

“ पण राहू द्या. . . ताण नको आणि हळदी कुंकू नको. . सांगून मी बायकांना आम्हाला हळदी कुंकू आणि तुम्हाला बोलावणे परवडत नाही ! “ आता तिचा बदललेला सुर पाहून मी गर्भगळीत झालो.

“काहीही काय? हळदी कुंकू नको कसा म्हणेन मी? बरं , राहूदे माझं बजेट तुला मी दोsन हजाsर रुपये देतो, मग तर झालं . कर हळदी कुंकू.”

ती आनंदाने उठली आणि लगेच बसली.

“दोन हजारात काय होणार आहे?. . . बर ठीक आहे अडीच हजार द्या . . त्यात काहीतरी बसवते आणि हो माझ्या साडीचे काय ?”

“जान्हवी , यावर्षी तीपण घ्यावीच लागणार का?”

“अहो, असं काय करता? संक्रांती सारखा इतका मोठा सण . . म्हणजे त्याच त्या जुन्या साड्या त्याच बायकांसमोर नेसू का? . . बघा म्हणजे त्या सगळ्या जणी नवीन साड्या नेसून मिरवतील. . ? तुम्हाला कसं वाटेल?”

“बरोबर आहे. . . मग त्याचं काही बजेट आहे का?”( मी जड अंतकरणाने)

“अहो, साडीचं काय बजेट असतं? तशी मी हलक्यातलीच घेते आणि दोन-तीन हजार रुपये असू देत , दुकानात गेल्यानंतर नेमकी कुठली पटेल काही सांगता येत नाही . . नाही का!”

“ओके मान्य .”

म्हणजे आज मला , याघडीला असा साडेपाच हजाराचा चुना लागला होता पण संक्रांत अजून बाकी होती.

आठवड्याभराने अशीच ती लाडाने जवळ आली, हातात शिऱ्याची प्लेट दिली आणि मला म्हणाली,” ते शेजारचे भाऊजी किती हौशी आहेत ना!”

“का ग, काय झालं?”

“अहो ,आपल्याला पत्ता पण नाही आणि रंगरंगोटी करून घेतली घराला त्यांनी!”

“अरे सावंत आणि रंगरंगोटी? आता कशी काय? कधी?”
“हळदी कुंकू आहे ना त्यांच्या घरी 19 तारखेला!”
“अरे वा! हळदी कुंकवासाठी रंगरंगोटी ?
“ आणि मिसेस सावंत तर उद्या परवा नवीन पडदे आणायला जाणार आहेत , मला पणं चल म्हणालीस सोबत.”

“ ते कशासाठी? म्हणजे पडद्यांच काय मधेच?”
“आता? अहो , तुम्हाला तर काहीच कळत नाही . घराला रंग दिला की भिंतीचे रंग बदलले ना . . तिथे त्या रंगाचे नवीन मॅचिंग पडदे नको का? हळदी कुंकवाला इतक्या बायका येतील तर कसं दिसेल ते ?”

“ हम्म् ते आहेच म्हणा, मला इतकं अपडेट नसतं ग जानू.”
“आणखी एक यावर्षी मी पण बाई पार्लरला जाऊन तयार होऊन यावं असा विचार करते . . हळदी कुंकवाच्याच दिवशी. फुलं हवीत सजावटीसाठी, थोडे पतंग पणं आणेन, काही झाडांच्या कुंड्या बघते . . . म्हणजे वर्षातून एकच एवढा मोठा सण येतो मग . . .”
ती बोलत होती, मी ऐकत होतो.

आता मात्र हे हळदी कुंकू प्रकरण त्याच्या डोक्याच्या वर जायला लागलं.

बायको पैसे घेवून आनंदात गेली. मी मात्र विचारात पडलो.
‘लहानपणापासून संक्रांतीचा सण मला आवडायचा पण त्यात कधीच या सगळ्या गोष्टी आल्याचे मला आठवत नाहीय. तिळाचे लाडू, तिळाच्या पोळ्या आई सुंदर करायची. वाण वशाचा त्यावेळी खर्च कमी असून सुद्धा आईला दरवर्षी सुगडे नवीन घ्यावे की नाही असा प्रश्न पडायचा. कधीतरी जपून ठेवलेले एखादे दोन जुने सुगडे वापरायची, दोनच नवीन आणायची..नंतर त्याचाही आपण उपयोग करायचो.
काळीच साडी हवी असं नाही पण आई नवीन साडी संक्रांतीला नेसली असेल हे देखील मला विशेष आठवत नाही. “या सणाला नसते रे नवीन घ्यायची, आहेत ना इतक्या साड्या त्या कधी नेसणार?” अशी म्हणायची. किती ती काटकसर.
हा अनुभव जान्हवीला सांगायला गेलो तर तिला आवडेल का?
नवीन एखादी साडी घरात असली तर तिचीच घडी मोडून वगैरे शेजारणी सोबत हळदी कुंकवाला जायची. कधी तर असलेल्या पैकीच बऱ्यापैकी साडी नेसून ती जायची, तेंव्हा देखील इतक्या महागाच्या साड्या नसायच्या. या सर्वांमध्ये बायकांना एकमेकांना भेटायला मिळतं, गप्पा होतात , रूटीन बदलतं, स्वयंपाक घरातून थोडीशी उसंत मिळते, स्वतःच्या दिसण्याकडे थोडं लक्ष देता येतं, यातच जास्त आनंद असायचा. किती साधेपणा होता.
बरं हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हणून वेगळे आमंत्रण नसायचे.
आमच्या कडे आजच या, उद्याच या असं काही नव्हतं.
कुणीही कुणाच्याही घरी येता जाता हळदी कुंकाला येऊन जाई.
त्यामुळे सतत हळदी कुंकवाचे ताट तयारच असायचे. आई एका वाटीमध्ये तिळगुळ टाकून ठेवायची आणि तो हमखास रात्रीपर्यंत संपलेला असायचा. आम्ही संपवायचो, म्हणजे आईने सणा दिवशी लाडू दिले तरीही तिच्या हळदी कुंकवाच्या ताटामधलाच तिळगुळ खायला मजा यायची.
माझी बहीण आईसोबत हळदी कुंकवाला जायची सोबत एक डब्बा न्यायची आणि दिलेले सगळे तिळगुळ आणि हलवा जमा करून आणायची .
कित्येकदा तो हलवा घरी केलेला असायचा आणि येता येत होता बायकांची त्यावरून चर्चा निघायची की कोणी कशाचा हलवा केला आहे?
त्या साधेपणात जो आनंद होता तो आता राहिला नाही.
सगळ्या गोष्टींना उत्सवाचं स्वरूप आलं आहे आणि त्यानंतर आर्थिक स्टेटस दाखवण्याची ही एक संधी आहे . हौसेपोटी लोकांच्या मनात असे विचार येवू लागले, हळूहळू चहा, दूध करायला सुरुवात झाली.
आता तर नाश्ता किंवा टिफिन शिवाय कुणाच्या घरी हळदीकुंकू होत नाही म्हणजे हळदी कुंकू कमी आणि किटी पार्टी जास्त! संस्कृती अशी बदलते आहे, ज्याची त्याची आवड. हे मला भावत नसलं तरीही आलिया भोगासी असावे सादर !'

आता आजुन एक माझ्या लक्षात आलं की जान्हवी फक्त माझेच दिलेले पैसे वापरेल असे नाही, स्वतः जवळ साठवलेले पैसे टाकून खूप भारी ची साडी आणणार. स्पेशल बुटिक मधे ब्लाऊज शिवायला टाकनार, त्याचा खर्च, शिवाय पार्लरमध्ये तयार होणार. . . तो खर्च ही ती माझ्याच हिशोबत लावणार!

एक बरं की
याच निमित्ताने घराची आवराआवर होणार , एक दोन बेडशीट किंवा गालीचांची खरेदी होणार , हळदी कुंकवाचे खास सेट काढले जाणार, सगळी चांदीची भांडी बाहेर येणार , अत्तरदाणी , गुलबदाणीला प्रकाश दिसणार . . . घराचा कायापालट होणार! होऊ देत.

*तिला आनंद मिळतो ना! मग ते मला खूपच आवडतं.*

वरून कितीही उदासीनता दाखवली तरीही मला हल्ली काही वर्षात संक्रांत हा सण खूप आवडायला लागला आहे ,त्याचे वेगळेच कारण आहे.

त्या हळदी कुंकवाच्या एकाच दिवशी बायको संध्याकाळी पाचपासून रात्री अकरा पर्यंत बिझी असते, बायको मला काही प्रश्न विचारत नाही.
कुठे आहात? घरी कधी येतात? जेवायला काय करू वगैरे? स्वयंपाक केलेलाच असतो किंवा बायकांसाठी जो आणलेला नाश्ता आहे तोच आपणही खायचा असतो.
तेवढेच तिचे कष्ट वाचले.

आणि त्या एका दिवशी मी आणि माझ्या तिच्या सगळ्या हळदी कुंकू करणाऱ्या मैत्रिणींची नवरे आमची एक सभा असते.
मुद्दाम सगळेजण वीकेंड सुचवतो.
त्या दिवशी कुणाच्याच बायका आपल्या नवऱ्याला फोन करत नाहीत .
त्यामुळे त्यांच्या हळदी कुंकवा दिवशी आम्ही तीर्थप्रसादाचा कार्यक्रम ठेवतो यातच आनंद मानायचां , पुन्हा असा चान्स मिळणार नाही, इतका मोकळा वेळही मिळणार नाही.
कधीतरी हौस म्हणून तीर्थ घेणाऱ्या पुरुषांना नक्की कळेल की या तीर्थ प्रसादाच्या कार्यक्रमात किती एक्साईटमेंट असते.
महिलांची वाणाची तयारी चालते तेव्हा आमचे व्हॉट्स ॲप वर कोणता ब्रँड आणि किती आणायचे, कुठे बसायचं या सर्वांची मुक चर्चा होत असते.
पण बायकोला असं दाखवायचं की घरातून विस्थापित केलेल्या एखाद्या माणसाप्रमाणे दुःखी होऊन निघत आहे.अगदी साधी जीन्स आणि टी-शर्ट घालून निघायचं म्हणजे शंका येणार नाही आणि परत आल्यानंतर काहीही न बोलता चुपचाप बडबड न करता झोपायचं.

पण नेमका

त्या दिवशी तिला बोलण्याचा खूपच मूड असतो.
कोण कोण तिच्या साडीला काय म्हणाले , मेकअपला काय म्हणाले ,तिळगुळा बद्दल काय बोललं या सगळ्या चर्चा तिला सांगायच्याच असतात.

मी एकच उत्तर तिला देतो . . “झालं की नाही तुझ्या मनासारखं , आता खुश? मी बाहेर खूप बोर झालो आहे .आता मला झोपू दे!”
ती पण आनंदाने ते समजून घेते

आणि अशा प्रकारे

*आम्ही दोघेही पुन्हा पुढच्या संक्रांतीची वाट पाहतो*

*समाप्त*
*©® स्वाती बालूरकर, सखी*
*दिनांक १८.०१.२५*