हम मिले भी तो ऐसे - ४

" मिलिंद खूप रिस्क आहे रे यात. दोघांनाही हे नाही आवडले तर हे दोघेही दुरावतिल आपल्यापासून
हम मिले भी तो ऐसे -४

"सारा, चल लवकर फ्रेश हो ना. मग नाश्ता करायला जाऊया. मी मिलिंदला सांगून आले आहे." काजल


"आता हा मिलिंद कोण आणि मी कशाला येऊ तुमच्या दोघांमध्ये कबाब मे हड्डी बनून." सारा तिची चेष्टा करत बोलली.

सारा चं बोलणे ऐकून खरं तर काजलला काय बोलावं ते कळत नव्हतं पण ती थोडी मोकळी झाली हे बघूनच तिला छान वाटलं.

"आगाऊ कुठली,थांब सांगतेच तुला." म्हणत काजलने तिचे बोलणे हसण्यावारी नेले आणि दोघीही पुढच्या तयारीला लागल्या.


काजल आणि सारा तिथे पोचल्या तेव्हा मिलिंद आधीच तिथे पोहोचलेला. त्यांचं हाय हॅलो एकमेकांचा परिचय झाला आणि नाश्ता उरकला.


"काजल तुम्ही दोघे बोला ना तोवर मी इथेच थोडी डेक वर जाऊन येते." म्हणत सारा तिथून गेली.


"मिलिंद, तू तुझ्या मित्रासोबत आला म्हणालास ना मग मी जेव्हा बघते तेव्हा तू एकटाच फिरताना दिसतोस. मी घरच्यांना सांगेन म्हणून थाप तर मारत नाही आहेस ना!"


"थाप मारून काय करणार काजल,तसं मुळात काही नाहीये.माझा हा मित्र आहे ना तो थोडा दिलजला प्रेमी झालाय ग. तुला खरं नाही वाटणार या टूर वर मी तिसऱ्यांदा येतोय. त्याला म्हणे साक्षात्कार झालाय समुद्राच्या साक्षीनेच त्याला त्याचं प्रेम मिळेल म्हणून. एरवी बंदा एक नंबर आहे पण सलग सुट्या आल्या की वेड लागल्यागत क्रुझ टूर वर येतो आणि त्याचं प्रेम शोधत असतो."

"ये किती अद्भुत आहे ना हे सगळे. खरंच वेडा प्रेमी दिसतोय तो."

"काय इंटरेस्टिंग,अद्भुत वगैरे काही नसते यार. इतकं काय ते प्रेमासाठी झुरायचं. जिचा अजिबात काही मागमुसच नाही तिच्यासाठी इतकं झपाटल्यासारखे फिरत शोधत राहायचं, मला तर सारं नॉनसेन्स, निरर्थक वाटते."

"अरे मग येतोस कशाला सोबत तू?" काजल

"अगं अतिशय चांगला मित्र आहे तो माझा आणि मला पण हा समुद्र आवडतोच की. इथला हा निवांतपणा ,एकांत हे सगळं खूप खूप आवडते मला.तेवढाच त्याच्या वेडेपणाचा तिटकारा आहे मला." मिलिंद

" किती रे रुक्ष आहेस तू,त्याच्या प्रेमाला वेडेपणा म्हणून मोकळा झालास! तुला थोडीच कळणार प्रेम काय असते ते,त्यातले वेडेपण वगैरे." काजल

" ओ मॅडम,प्रेमात वगैरे पडलात की काय? फारच भारी बोलत आहात."

" अरे मी नाही ती आता होती ना सारा ती प्रेमात पडलीय, आधी तर या टूर वर यायलाच तयार नव्हती कारण तिच्या मनातला राजकुमार तिला अशाच टूर मध्ये भेटला होता म्हणे. ती पण त्याच्याच शोधात आहे.तिची अवस्था बघून बोलले मी." काजल

" म्हणूनच मघापासून बघतोय तर ती कुठे तरी हरवलेलीच दिसत आहे,अगदी आमच्या भिडू सारखी." त्याने असे म्हणताच तो आणि काजल दोघेही हसले.

"काजल माझ्या डोक्यात एक आयडिया येतेय,तुला पटते का ते बघ. अगं हे दोघेही समदुःखी दिसत आहेत आपण या दोघांना एकदा भेटवून बघायचे का?" मिलिंद

"मिलिंद खूप रिस्क आहे रे यात. दोघांनाही नाही आवडले हे तर दोघेही दुरावतील आपल्यापासून." काजल.

" हे बघ आपण यात पडायचं पण नाही फक्त भेट घडवून आणायची ती पण अगदी त्रयस्थपणे.बघ ती डेक वर गेली आहे ना तू पण तिथे जा मी एक काम करतो मी माझ्या मित्राला घेऊन येतो.जमलं तर जमलं नाहीतर तिथेच तो विषय सोडून द्यायचा. कारण त्याची अवस्था मला पण बघवत नाही आता. असं वाटते त्यानी आता यातून बाहेर पडावं म्हणून ही सगळी उठाठेव.काय म्हणतेस मग,पटलं का?" मिलिंद


"चालेल,हेतू जर चांगला आणि प्रामाणिक आहे तर प्रयत्न करायला हरकत नाही.शेवटी जे घडेल ते त्यांच्या नशिबाने हो की नाही!" काजल


"चल तर मग लागुया कामाला." म्हणत दोघेही तिथून निघाले.


क्रमशः