हम मिले भी तो ऐसे -१

कसं सांगू तुला मलाच कळत नाही पण मनात साचलेलं तुला सांगायचा प्रयत्न करते मी.
# हम मिले भी तो ऐसे. -१


आज ती मैत्रिणींसोबत मुंबई गोवा क्रुझ टूर ला आली होती. तिची जायची अजिबात इच्छा नव्हती पण मैत्रिणींच्या दांडगाई पुढे तिचे काहीच चालले नव्हते.

सगळ्या मैत्रिणी उत्साहाने सगळं एन्जॉय करत होत्या. म्युझिक सिस्टिम वर सुरू असलेल्या गाण्यावर सगळ्या जणींचे पाय थिरकत होते अन् सारा मात्र इकडे डेकच्या त्याच फ्लोअर वरच्या काचेतून दूरवर शून्यात बघत होती.


ती कुठे गेली म्हणून शोधतच काजल तिला बघायला आली अन् तिला असं शून्यात नजर लावून बसलेली बघून काय झालं नेमकं हिला? हा विचार तिच्या मनात तरळून गेला.

काजलचा अचानक थोपटल्यासारखा खांद्यावर पडलेला हात बघून ती दचकलीच अन् डोळ्यांमधले अश्रू लपवत हसण्याचा केविलवाणा प्रयत्न करू लागली.

काजलच्या डोळ्यातील प्रश्नार्थक भाव बघून "अगं तसं काही नाही,चल आपण जाऊ बाकीच्या आहेत तिथे.मी सहजच बसली होती इथे." म्हणत सारा नी लगेच विषय पालटला.


नंतर सुद्धा सारा सगळ्यांमध्ये सामील असूनही अलिप्तच भासली काजलला. आपल्या लाडक्या मैत्रिणीच्या मनात काहीतरी सलत आहे ,काय ते नेमकं जाणून घ्यायलाच हवं, मनाशीच निश्चय करत ती सुद्धा मैत्रिणींसोबत सामील झाली.

सगळ्या मैत्रिणी जमलेल्या अन् अथांग सागरातून चाललेलं ते छोटेखानी क्रुझ. मैत्रिणींच्या घोळक्यात मस्ती मजा,गप्पा यांना उधाण आलं होतं अन् तितकंच साराचं अबोलपण काजलला खुपत होतं.

रात्र झाली तशी सगळ्यांची पांगापांग झाली. डॉर्मेट्री मधे आल्यावरही कुस पलटणारी सारा तिला अस्वस्थ करू लागली.

तिला खुणेनेच बाहेरच्या गॅलरी मधे घेऊन आली ती.
शेजारी शेजारी असलेल्या आरामदायी खुर्च्यांवर दोघीही विसावल्या...


"सारा, काय सुरू आहे तुझे नेमके? मला सुद्धा सांगू नये इतकं काय ग खाजगी आहे?
आजपर्यंत कधी एकही गोष्ट माझ्यापासून न लपवलेली तू ,तुला काय वाटलं ग तुझ्या मनाची अस्वस्थता माझ्यापासून लपून राहील?" , काजल.


" काजल,काही सांगावं असं काही खरं तर घडलंच नाही . काही घडलं असतं तर तुला न सांगता मी राहिले असते का? अन् ते न घडणंच माझ्या मनाला कुठेतरी खुपत आहे."

एक उसासा सोडून ती पुन्हा बोलायला लागली.l

" कसं सांगू तुला मलाच कळत नाही पण मनात साचलेलं तुला सांगायचा प्रयत्न करते मी. मग त्याला माझं वेडेपण समज नाहीतर अजून काही...!


तुला आठवते दोन वर्षांआधी मी सिंगापूरला गेली होती आईसोबत फिरायला. अचानक बाबांना तेव्हा अर्जंट काम असल्याने आणि नेमक्या त्याच काळात कंपनीची टूर असल्याने बाबांनी आई सोबत मला पाठवायचं ठरवलं.

त्या टूरला आई आणि मी गेलेली आणि तुला माहीत आहे,तो टूर क्रुझ टूर होता. सिंगापूरला उतरून फ्रेश होऊन ब्रेकफास्ट ,लंच वगैरे सगळे आटोपल्यावर आमची रवानगी संध्याकाळ पर्यंत क्रुझ वर झाली. सिंगापूर - मलेशिया - सिंगापूर असा क्रुझ प्रवासाचा सुंदर अनुभव मी घेतला.


*मरिनर्स ऑफ द सी* नामक ते भव्य चौदा पंधरा मजली क्रुझ होते! आजच्या आपल्या क्रुझ पेक्षा कितीतरी मोठे क्रुझ होते ते.त्या क्रुझ वर मी गेली अन् एका वेगळ्याच विश्वाची अनुभूती घेत असल्या सारखं वाटलं.

बाबा सोबत नव्हते त्यामुळे एकतर वेगळेच अनोळखीपण तिथे वाटत होते. आमच्या ग्रुपचे बाकीचे सगळे जोडीने होते सोबत मी आणि आई. बाबांच्या कंपनीचा नेहमीचा बिझनेस ग्रुप असल्याने आई सगळ्यांमध्ये रमली पण मी मात्र एकटी पडल्या सारखी झाली होती.


कारण एकदा का त्या सागरी विश्वात आपण गेलो की अगदी साऱ्या जगाशी आपला संबंध तुटल्या सारखा होतो. एक तर क्रुझ म्हणजे भुलभुलैय्याच जणू! बोटी सारख्या आकाराच्या आत असलेले खालचे पाच मजले म्हणजे आपले तळघरच ! त्यालोकांचे स्टोरेज,ऑफिसेस,त्यांचा इंटर्नल वर्किंग स्टाफ वगैरे सारी सूत्र इथून हलत असतात अन् आपण ही दुनिया अटेंड करतो ती अगदी सहाव्या मजल्यापासून!

सहाव्या मजल्या पासून ते अकराव्या मजल्यापर्यंत क्रुझ च्या मधल्या भागात असलेली ओपन स्पेस म्हणजे एक माया बाजारच!
काय नसते तिथे? कॅसिनो, पब, डिस्को थेक, कुठे ऑपेरा तर कुठे म्युझिक ची लाईव्ह कन्सर्ट ,कुठे ड्रामा तर कुठे अजून काही. वेगवेगळे थिएटर्स,स्टेज, कॅसिनोज सदैव लोकांनी गजबजलेले. एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी चाललेले वेगवेगळे रंगारंग कार्यक्रम लोकांचे मनोरंजन करणारे. रेस्टॉरंट्स, बार जागोजागी उत्साही लोकांच्या स्वागतास सज्ज!
शॉपिंग करणारा शॉपिंग करणार तर एखाद्या हॉल मध्ये असलेला प्रोग्राम कुणी अटेंड करणार एक वेगळीच अद्भुत दुनिया अन् ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर सहाव्या ते अकराव्या मजल्यापर्यंत असलेली राहायची व्यवस्था. प्रत्येक रूमचं अप टू डेट आर्किटेक्चर अन् बाल्कनीतून दिसणारा समुद्र एकदम मस्त !

सुरुवातीला तर हे समजायलाच थोडा वेळ गेला. परत इथे आपण संपूर्ण जगापासून अलिप्त असतो कारण आपले फोन इथे आल्यानंतर अक्षरशः नेटवर्क नसल्याने बिनकामाचेच असतात. फक्त आपल्या ओळखीच्या लोकांच्या रूम नंबर नुसार करता येणारा संपर्क अन् टूर गाईड नी सांगितल्या नुसार आपल्या एकत्र जमायची वेळ अन् ठिकाण हाच काय तो दुवा!

माझ्या वयाचं कुणीच नसल्याने अन् फोन सुद्धा बंद असल्याने मग मला कंटाळा यायला लागला होता. रात्रीपर्यंत मी आता जरा तिथल्या वातावरणाला सरावले होते.रात्रीचं डिनर आटोपल्यावर आमचा ग्रुप बाराव्या मजल्यावरच्या ओपन थिएटर वरच्या स्क्रीन वर प्रोग्राम बघत आणि गप्पा करत बसला होता. तितक्यात मला बरेच लोकं तेराव्या चौदाव्या मजल्यावरच्या डेक वर समुद्रावरच्या मोकळ्या वाऱ्याचा आनंद घेतांना दिसले अन् मला सुद्धा तिथे जायची इच्छा झाली. आईला मी त्याबद्दल विचारलं अन् तिनी सुद्धा मला संमती दिली.

क्रमशः
© डॉ.मुक्ता बोरकर - आगाशे


🎭 Series Post

View all