हम मिले भी तो ऐसे - २

तुला सांगायचं होतं पण नेमकं काय सांगावं हेच कळत नव्हतं पण तुझ्यातल्या सच्च्या मैत्रिणीने माझ्या मनातलं हे गुपित जाणलंच.

हम मिले भी तो ऐसे -२


पायऱ्या चढून मी डेक वर आले. अन् त्या वाऱ्याच्या झंझावाताने अक्षरशः मोहरुन गेले. डेक वर लोकं इकडून तिकडे चकरा मारत होते मी पण हौशीने तिथून समोर निघाले फार सुंदर अनुभव होता तो पण काही वेळाने समुद्र जरा खवळल्या सारखा झाला अन् वाऱ्याचा जोर अतिशय वाढला. जिथून मी सहजच वाऱ्याचा आनंद घेत चालत आली होती तिथे मला आता सरळ उभे राहणे सुद्धा कठीण वाटायला लागले होते. पाहता पाहता सगळे एकमेकांच्या सहाऱ्याने कसेबसे समोर निघून गेले अन् मी मात्र इतकी गोंधळून गेले होते की मी तिथे एकटीच उरले होते. आता मात्र मला काय करावं काही सुचत नव्हतं तोल सांभाळत उभं राहणं सुद्धा मला आता कठीण वाटायला लागलं होतं, मी आता अगदी रडकुंडीला आले होते ,काय करावे कळत नव्हते. अचानक जहाज अजून हेलकावले अन् मी आता पडणार असं वाटत असतांनाच कुणीतरी मला सावरलं होतं. एक परका पण आश्वासक वाटणारा स्पर्श अगदी जवळून मला तिथून आधार देत सुखरूप परत घेऊन आला. पायऱ्या उतरून खाली आली अन् " आर यू ओके नाऊ?" या त्याच्या शब्दांनी मी भानावर आली.


एक हँडसम ,उमदा तरुण माझ्या बाजूला होता. "हॅलो, आय एम अनुराग." म्हणत त्याने स्वतः ची ओळख करून दिली. मी पण "आय एम सारा."म्हणत त्याच्याशी शेकहॅण्ड केलं. त्याचे मनापासून आभार मानले. बोलतांना कळलं तो पण माझ्यासारखाच त्याच्या बाबांच्या त्याच कंपनीच्या बिझनेस टूरवर त्याच्या आई सोबत पण दुसऱ्या ग्रुप सोबत आला होता. समवयस्क असल्याने लवकरच आमच्यात मैत्री झाली. दुसऱ्या दिवशीचे एकमेकांचे प्लॅनिंग विचारून आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.

दुसऱ्या दिवशीची सकाळ अगदीच प्रसन्न वाटली होती मला. लवकरच चहा, ब्रेकफास्ट आटोपून बाराव्या मजल्यावरच्या पूल वर मनसोक्त डुंबत गप्पा करत वेळ कसा निघून गेला कळलेच नव्हते. मी पण हळूहळू रुळत आहे हे बघून आईला सुद्धा बरं वाटत होतं.


अकरा वाजता सहाव्या डेक वर हेलिपॅड च्या जवळ फोटो सेशन करता येईल असं टूर गाईड नी सांगितलं त्यामुळे अनुराग आणि माझी पुढची मीटिंग प्लेस ती असेल असं आम्ही मनोमन ठरवलं होतं.

साडे अकराला मी गेली तर तिथे जायच्या रस्त्याबाबत खूपच संभ्रम होता. ग्रुप आधीच गेला होता. नेमका अनुराग पण तेव्हाच तिथे आला अन् मग दोघं मिळून मार्ग शोधत तिथवर पोचलो तर फोटो सेशन आटोपले होते. आम्ही दोघं आणि असेच काही दोनचार हौशी कपल तिथे उरले होते. त्यांचे फोटो आम्ही शूट करून दिले आणि त्यांनी सुद्धा आम्हाला कपल समजून आमचे सुद्धा फोटो शूट करून घेतले. टायटॅनिक पोझ देताना त्याच्या जवळ उभं राहून, त्याच्यावर विश्वासून,त्याच्या उबदार श्र्वासाचा स्पर्श अनुभवत तसं उभं राहून केलेलं फोटो सेशन आमच्या मैत्रीला नवा रंग देऊन गेलं होतं. तो क्षण असाच थिजून जावा असं मनोमन वाटत होतं.माझ्यासाठी तो एक अविस्मरणीय अनुभव होता.


तो दिवस जास्तीत जास्त एकमेकांच्या सहवासात घालवला होता आम्ही. डिस्को थेक मधे थिरकणाऱ्या तरुणाई सोबत तोही अनुभव दोघांनी मस्त जगून घेतला. दुसऱ्या दिवशी वापस जायची घाई असणार होती म्हणून रात्रीच दुसऱ्या दिवशी ब्रेक फास्ट नंतर कुठे भेटायचं हे ठरवूनच दोघं रात्री रूमवर परतलो.


दुसऱ्या दिवशी सगळं क्लिअरन्स बघून अन् रूमची चावी वापस करून तो नियोजित जागी पोचला. मी सुद्धा सगळं आटोपून तिथं निघालेच होते. अन् मग क्रुझ पोर्ट वर लागल्याचे अन् उतरायचे सायरन वाजायला लागले. प्रत्येक जण आपापल्या ग्रुप सोबत बाहेर पडत होता. आमचे ग्रुप अगदी जवळ जवळ होते पण एका पॉइंट वर त्यांचा ग्रुप एका बाजूनी बाहेर पडला आणि आमचा दुसऱ्या बाजूनी . असं वाटलं की बाहेर पडल्यावर तो भेटेल . बसेस सोबत असतील. एअरपोर्ट वर सोबत असू ,मोबाईल सुरू झाले असतील, नंबर्स ची देवाण घेवाण होईल,पुढच्या मैत्रीची ,नात्याची वीण घट्ट होईल . पण विचार फक्त विचारच राहिले ग! त्यानंतर त्याचा ,त्यांच्या ग्रुपचा आमच्याशी काही कॉन्टॅक्टच आला नाही. आमच्या बसेस,पुढचे प्रोग्राम सर्व वेगवेगळं होतं. एकमेकांच्या नावाशिवाय दुसरं काहीच आम्हाला एकमेकांना माहीत नव्हतं. दोघांमध्ये फुलू लागलेलं नातं फुलायच्या आधीच कोमेजून गेलं होतं.

हम मिले भी तो ऐसे, जैसे कभी फिरसे ना मिलनेके लिये
जैसे समुंदर में दो कश्तियां मिले पल दो पल के लिये...।
© मुक्तमैफल

अगदी अशी अवस्था झाली होती आमच्या नव्या नात्याची.
यातून बाहेर पडणं खूप कठीण होतं ग माझ्यासाठी. ही मैत्री की प्रेम कळलेच नव्हते मला.कुठे काही सांगायची पण सोय नव्हती कारण माझ्या आणि त्याच्या भावना सारख्याच आहेत की तो त्याबाबतीत फारसा गंभीर नाही हे सुद्धा कळायला मार्ग नव्हता. पण काळाच्या ओघात स्वतः ला सावरून घेतलं मी.


मी आत्ता आत्ता तर विसरू पाहात होते ग सगळे पण तुम्ही सगळ्यांनी पुन्हा क्रुझ टूरची टूम काढली अन् मनाच्या खोल कप्प्यात दडवून ठेवलेली ही एक गोड स्मृती पुन्हा उफाळून आली अन् मला अस्वस्थ करून गेली.

खरंच आपण किती दैवाधीन असतो नाही कधी कधी..! जसं त्या गाण्यात म्हटलं आहे...

" दोन ओंडक्यांची होते सागरात भेट...
एक लाट येता पुन्हा नाही गाठ!"

तसंच काहीसं घडलेलं हे. आम्ही कोण ,आमच्यात फुलू लागलेलं नातं मैत्रीचं,प्रेमाचं की अजून काही? हे कळायच्या आधीच सारं संपलेलं!

तुला सांगायचं होतं पण काय सांगावं तेच कळत नव्हतं पण तुझ्यातल्या सच्च्या मैत्रिणीने माझ्या मनातलं हे गुपित जाणलंच. माझं पण मन हलकं झालं." म्हणत सारा बोलायची थांबली.

"चल झोपूया आता." म्हणत दोघीही तिथून उठल्या.

क्रमशः