हम मिले भी तो ऐसे -३

"अगं अचानक आत्याचा मुलगा भेटला इथेच क्रुझवर त्याच्याशी बोलत मागेच राहिली मी." काजल बोलली.
हम मिले भी तो ऐसे -३


मनातलं बोलून झाल्याने साराची अस्वस्थता आता बरीच कमी झाली होती. एवढे दिवस मनाच्या कप्प्यात साचलेलं मळभ बाहेर निघाल्याने तिला आता मोकळं तर जरूर वाटत होतं पण क्रुझ वरच्या बऱ्याच गोष्टी बघून तिच्या मनाला अनुरागची आठवण तीव्रतेने छळत होती.

" सारा एक बोलू? मला तुला खोटी आमिषं दाखवायची नाही आहेत पण कां कोण जाणे माझे मन म्हणते आहे की तुमच्यात जे होते ना ते नक्कीच मैत्रीच्या पलीकडे होते. आज दोन वर्षानंतरही तुझ्या मनात जर त्याच्यासाठी इतकं साचून आहे तर ही नक्कीच तरल प्रेमाचीच भावना आहे. माझं मन म्हणत आहे की तुला तुझं प्रेम नक्की भेटेल आणि या सागराच्याच कृपेने." काजल

बोलता बोलता दोघीही कधी झोपी गेल्या ते त्यांचं त्यांना कळलंच नाही.
सकाळी काजलला जाग आली तेव्हा बाकीच्या मैत्रिणी उठून मस्त गप्पा मारत बसल्या होत्या.

" काय ग काजल कालपासून बघते आहे, तू आणि सारा नेमक्या कुठल्या विश्वात आहात काही कळतच नाही आहे." एकजण बोलली.

" हो ना, मी पण विचारणारच होते ग तुला की साराचं काही बिनसलं आहे का? कालपासून अगदीच शांत आहे ग आमची उत्साह मूर्ती." दुसरी बोलली.


"तसं काही नाही ग, खरंतर तिची तब्येत बरी नसल्याने ती यायलाच तयार नव्हती या टूरला पण एकतर मी तिला जबरदस्ती घेऊन आली आणि हा सागरी प्रवास जरा लागतोय तिला, थोडं मळमळते आणि त्यामुळे डोकं दुखतंय तिचं म्हणून शांत आहे ग ती." काजल

"असं आहे होय ,मी म्हटलं बाई काय झालं हिला की अशी एकदम कोषात जाऊन बसली." मैत्रीण

"अगं रात्री पण खूप वेळ झोपली नाही ती, आत्ता कुठे डोळा लागला तिचा." काजल.

"काजल, आम्ही सगळ्या डेक वर जायचा विचार करतोय, तू येणार की इथेच थांबणार?" मैत्रीण

"असं करते सारा सध्या झोपली आहे तर तिला झोपू देते; मी लगेच आवरते आणि येते तुमच्यासोबत." काजल

साराला अजिबात त्रास होऊ न देता काजल लगेच सगळ्या मैत्रिणींसोबत निघाली सुद्धा. सगळ्या जणी डेकवर येणाऱ्या मोकळ्या हवेचा आनंद घेत होत्या. सोबतच गरम गरम चहा आणि कॉफीचा आवडीनुसार आस्वाद घेणे सुरू होते.
अंताक्षरी अन् गप्पांची मैफिल बराच वेळ चालली. लंच नंतर हा प्रवास संपणार होता. त्याआधी तिथला पूल वगैरे एन्जॉय करून घेण्याची सगळ्यांची लगबग होती. सगळ्या उठून परत जाणार तोच

"काजल ,तू इकडे कुठे?" अचानक कानावर पडलेला पुरुषी आवाज ऐकून काजल दोन मिनिट बावरलीच. इथे या क्रुझ वर कोण मला नावाने बोलवतेय? दोन मिनिट गडबडलीच ती. पण हा आवाज तर ओळखीचा वाटतोय म्हणून तिने वळून आवाजाच्या दिशेने पहिले.


समोर मिलिंद तिच्या आत्याचा मुलगा हसत तिच्याकडे बघत होता.
"मिलिंद, तू इथे असा अचानक भेटशील असं मला वाटलं सुद्धा नाही.एकदम मस्त सरप्राइज आहे हे माझ्यासाठी."

" तू कुणासोबत आली आहेस?" मिलिंद

"अरे ,आमचा मैत्रिणींचा पूर्ण ग्रुप आलाय क्रुझ टूर एन्जॉय करायला. त्यांच्यासोबतच आली मी." काजल

"अशा कशा ग मैत्रिणी तुझ्या? तुझ्यासाठी एकही मैत्रीण थांबली नाही ना सोबत. तुला एकटीलाच इथे सोडून निघून गेल्या त्या." मिलिंद

" कसा रे तू,सतत चेष्टा करत असतोस माझी. माझी मी एकटी जाऊ शकते रूम मध्ये परत.लहान थोडीच राहिली मी आता."काजलचे उत्तर ऐकून दोघेही अगदी दिलखुलास हसली.

"तू कुणासोबत आला आहेस? एखादी मैत्रीण वगैरे घेऊन आलास की काय?" आता त्याची चेष्टा करायची लहर तिला आलेली.

" विचार होता एखादी मैत्रीण घेऊन यायचा पण काय यार कोणी पटलीच नाही ना म्हणून मग मित्रासोबतच आलो." त्याने पण चेष्टेतच उत्तर दिले.

अशाच दोघांच्या काहीवेळ गप्पा चालल्या. तो आणि त्याचा मित्र सोबत आले आहेत एवढेच तिला कळले. नाश्त्याच्या वेळी भेटायचं ठरवून दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला.

काजल परतली तेव्हा सारा उठून बाकी मैत्रिणींसोबत तिची वाट बघत बसली होती.

" काजल कुठे गेली होती ग तू? आपण सोबतच निघालो ना मग मधातच कुठे गायब झाली होती तू?" सारा

"अगं अचानक आत्याचा मुलगा पण भेटला इथेच क्रुझ वर त्याच्याशी बोलत मागेच राहिली मी." काजल


क्रमशः
© डॉ. मुक्ता बोरकर -आगाशे

🎭 Series Post

View all