हम मिले भी तो ऐसे - ५

साऱ्या गोंधळात क्रुझ धक्क्याला कधी लागले ते कळलेच नाही. सारा आणि अनुराग पुन्हा बाहेर पडायच्या धामधुमीत होते.
हम मिले भी तो ऐसे -५


काजल साराला शोधत डेक कडे निघाली आणि मित्राच्या शोधात मिलिंद रूम कडे निघाला.नेमका त्याचा मित्र त्याच्याकडेच येतांना दिसला त्यामुळे तो तिथेच थांबला.

" मी तुझ्याकडेच येत होतो. म्हटलं डेक वर फिरायला जाऊ पण एकटं जायला मन होईना म्हणून तुलाच बोलवायला निघालो होतो."


"चल तर मग ,जाऊया की तिकडे. मी तर कालपासून म्हणतोय तर तूच यायला तयार नव्हतास.पण चल आता जाऊया." म्हणत दोघेही डेक च्या दिशेने निघाले.


काजल तिथे गेली तर सारा वरच्या डेक वर उभी राहून सागरी वारे झेलत होती.वाऱ्यावर उडणारे तिचे केस तिच्या सुंदर चेहऱ्यावर येऊन तिच्या सौंदर्यात अजून भर घालत होते. काजल तिथेच फक्त सोबत उभी होती. दुरूनच तिला मिलिंद मित्रासोबत येताना दिसला. हळूच ती तिथून निसटण्याचा प्रयत्न करू लागली. मिलिंद आणि सोबत असलेला रुबाबदार तरुण डेक च्या पायऱ्या चढून वर आले. काही वेळ उभं राहून दोघांनी तिथला आनंद लुटला.

"अरे मी दोन मिनिटात आलो,तू इथेच थांब." म्हणत मिलिंद तिथून सटकला.

काही वेळ मिलिंदची वाट बघत तो तिथेच उभा होता. मग हळूच तो चालत पुढे गेला. तसेही आता ऊन वाढू लागल्याने तिथे गर्दी नव्हतीच. अचानक ऊन कमी झाले आणि सागरी वाऱ्यांचा वेग वाढला. ते क्रुझ आता हेलकावे खाऊ लागल्याने व तो वरच्या डेकवर असल्याने तोल सांभाळत उभे राहणे जरा कठीण होऊ लागले.

"आता इथून बाहेर पडण्याशिवाय पर्याय नाही." म्हणत तो वळला आणि त्याला एक मुलगी तोल सांभाळत तिथून बाहेर पडताना दिसली. तिच्या हालचालींवरून ती घाबरलेली वाटत होती त्यामुळे हा लगबगीने तिथे गेला आणि ती तोल जाऊन पडणार तोच त्याने पटकन तिला सावरून धरले.

"सारा तू, इथे...?" अगदी आश्चर्य मिश्रित आवाजात तो बोलला.

ओळखीचा आवाज ऐकून तिने मिटलेले डोळे उघडले आणि अगदी आश्चर्यचकित होऊन ती समोरच्या व्यक्तीकडे बघतच राहिली.

"अनुराग तू ? मी स्वप्नात तर नाही आहे ना!" लगेच तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.

"रडतेस काय वेडाबाई, कुठे होतीस ग एवढे दिवस. वेड्यासारखा शोधतो आहे तुला. किती वेळा या क्रुझ टूर वर येत आहे कधीतरी तू भेटशील म्हणून."


थोडावेळ दोघेही अगदी स्तब्ध होते. आधी थोडा तरी संशय होता त्यांना, आधी त्यांना समजत नव्हते हे प्रेम होते की मैत्री? पण आता मात्र मनातील संभ्रम पूर्णतः दूर झाला होता न बोलता, न सांगताच एकमेकांच्या मनातील भावना डोळ्यातून स्पर्शातून ओसंडून वाहत होत्या.
न राहवून शेवटी तो बोललाच...
"सारा, खूप खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर, आय लव्ह यू."

" लव्ह यू टू" म्हणत नकळतच सारा सुद्धा त्याच्या बाहुपाशात बद्ध झाली होती.

एका वेगळ्याच विश्वाची अनुभूती घेत दोघेही एकमेकांच्या प्रेमात अगदी चिंब झाले होते. मिलिंद आणि काजल सुद्धा अगदी भान हरपून या दोघांकडे बघत होते.

"वाह रे भिडू, मला इथेच एकट्याला सोडून कुणाचा हात हातात घेतलास तू?" मिलिंद


"काय ग सारा, तू पण मला मध्येच सोडून दिलेस की!आली तर माझ्या सोबत होती पण आता वापस येशील असं वाटतं नाहीये." काजल

" चल चावट कुठली म्हणत." साराने हलकेच तिच्या डोक्यावर टपली मारली अन् भावनातिरेकाने ती काजलच्या गळ्यात पडली.

"खरं सांगू अनुराग,मला हे सारं तुझं वेडेपण वाटायचं पण आज कळत आहे रे,हे खरं सच्चं प्रेम अन् हीच त्या प्रेमाची खरी ताकद! अरे आमच्या गप्पांमधून आम्हाला तुम्ही दोघे प्रेमात पोळलेले दोन जीव वाटलात.चला दोन समदुःखी लोकांना भेटवून बघू या आशेने आम्ही तुम्हाला भेटवलं. त्यावेळी आम्हाला वाटलं सुद्धा नव्हतं की ज्यांच्या शोधात तुम्ही दोघे वेडे झाले आहात ते दोघे तुम्ही स्वतः च आहात."मिलिंद

"बघ ना मिलिंद, मला विश्वास होता रे ज्या सागराने आम्हाला एकत्र आणलं तोच आमचं पुनर्मिलन घडवून आणेल.म्हणूनच मी असा वेड्यासारखा वारंवार समुद्राच्या वाऱ्या करत भटकायचो.महत्वाचे म्हणजे त्या दरिया दिल सागराने माझा हा विश्वास अगदी सार्थ ठरवला रे.

चाहत कर तो ऐसी कर के कुछ और नजर ना आए
पूरी करने तमन्ना दिलकी पूरी कायनात जुट जाए
© मुक्तमैफल

बस हाच एक विश्वास मनात घेऊन आजवर शोध सुरू होता आणि खरंच नियतीच्या कृपेने आज मी त्यात सफल झालो.खरंच खूप भाग्यवान आहे मी." अनुराग

" अनुराग,आधी मला प्रेम म्हणजे शुद्ध वेडेपणा वाटायचा पण तुमचं प्रेम बघून मी खरंच प्रेम या भावनेच्या प्रेमात पडलोय." मिलिंद


"ये इश्क नही आसान जनाब,सीने में उठी कसक को चाहत के समुंदरसे पार होके जाना पड़ता है।"
असं अनुराग चेष्टेने म्हणाला अन् सगळे अगदी दिलखुलास हसले.

आजचा पूर्ण दिवसच त्या चौघांसाठी आगदी संस्मरणीय झाला होता.

साऱ्या गोंधळात क्रुझ धक्क्याला कधी लागले ते कळलेच नाही, सारा आणि अनुराग पुन्हा बाहेर पडायच्या धामधुमीत होते.

दोन वर्षांआधी अगदी हेच दृष्य होते, आजही पुन्हा तेच. फरक फक्त एवढाच होता की साराचा हात मात्र यावेळी अनुरागच्या हातात होता अगदी जन्मभरासाठी...!

समाप्त

© डॉ. मुक्ता बोरकर -आगाशे

🎭 Series Post

View all