भाग 1
अंधार पडला होता. नदीवरून गार वारा घरात येत होता. पाण्यात उठणाऱ्या लाटांचा आवाज वाऱ्यासोबत वाहत घरभर गुणगुणत होता. आणि सोबतच एक आर्त आवाज स्वर आळवत होता. गेले चार दिवस रोज रात्री ते स्वर कानावर यायचे, आणि स्वरदा वेडीपीशी व्हायची. रात्रीच्या शांततेत ते स्वर तिच्या काळजाची कुठली तार छेडायचे ते तिचं तिलाही कळत नव्हतं. ती बेभान होऊन त्या आवाजाच्या शोधात धावायची आणि तिच्या मागून तिचे आईबाबा. पण नदीकाठी जाईपर्यंत तो आवाज बंद व्हायचा. सगळा किनारा एकटा झालेला असायचा. नदीतल्या लाटा तेवढ्या सारख्या लयीत उचंबळत रहायच्या.
राम, त्याची बायको लता आणि मुलगी स्वरदा, हे तिघेचजण नदीकाठी रहायचे. त्यांचं एकच घर नदी आणि रस्त्याच्या मध्येच होतं. गावापासून ते लांब असे एकटेच का रहायचे हा स्वरदाला पडणारा प्रश्न राम आणि लता, दोघांनीही आजपर्यंत टाळला होता. शक्यतोवर ते तिला गावात किंवा नदीकाठीदेखील जाऊ द्यायचे नाहीत. दोघांपैकी कोणी ना कोणी कायम तिच्यासोबत असायचंच.
स्वरदाला मात्र नदीची प्रचंड ओढ होती. तिला वेळ आणि संधी मिळेल, त्या प्रत्येक वेळेस ती राम आणि लताची नजर चुकवून नदीवर जाऊन बसायची. नदीतल्या वाहत्या पाण्यात तिच्या मनातले सतत उसळणारे हजारो प्रश्न वाहून जातायत असं तिला वाटायचं. तिला तिचं बालपण, शाळा, कॉलेज, मित्रमैत्रिणी एवढंच काय कोणी नातलग देखील आठवत नव्हते. आठवणींच्या ऐवजी फक्त काळा अंधार, आणि काही धुरकट सावल्या, एवढंच होतं तिच्यापाशी!
त्यादिवशी रामला कामावरून यायला उशीर झाला. अंधार पडला तरीही राम आला नाही म्हणून लता त्याला बघायला बाहेर पडली. तिने पुन्हापुन्हा स्वरदाला बजावलं, “आम्ही येईपर्यंत घरातून बाहेर पडायचे नाही. आणि नदीकडे तर बघू देखील नकोस.” स्वरदा नाराज झाली, आणि स्वतःच्या प्रश्नांची स्वतःच उत्तरं शोधत खिडकीत येऊन बसली. अंधाराचा विळखा गडद व्हायला लागला. आकाशात चांदण्या चमकत होत्या. आणि तेच ओळखी चे वाटणारे सूर नदीच्या पाण्यावरून तरंगायला लागले. ‘हम तेरे शहर में आये हैं मुसफ़िर की तऱ्हा। सिर्फ एक बार मुलाकात का मौका देदे।।’ कोणीतरी अगदी हृदय ओतून गात होतं. तो आवाज स्वरदाला बोलावत होता. काय नातं होतं त्या आवाजाशी, तिचं तिलाही कळत नव्हतं. पण आज, तिला अडवणारं कोणीही नव्हतं.
क्रमशः

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा