भाग 4
आम्ही तुला पाण्याच्या बाहेर काढलं. तू जिवंत होतीस, पण बेशुद्ध होतीस. पाण्यात अनेक ठिकाणी तुझं डोकं, अंग ठेचकाळलं होतं. तुला आम्ही उचलून जवळच्याच दवाखान्यात घेऊन गेलो. दोन दिवसांनी तू शुद्धीवर आलीस, पण तुला मागचं काहीच आठवत नव्हतं. डोकं आपटल्यामुळे तुझी स्मृती गेली होती. आम्ही तुझ्या घरच्यांचा शोध घ्यायचा खूप प्रयत्न केला, पण त्या पुरातली बरीचशी माणसं बेपत्ताच झाली होती. अनेक दिवस शोधूनही तुझ्या घरच्यांचा काहीच सुगावा लागला नाही. आम्हाला मुलबाळ नव्हतं. तुझ्या येण्याने आमच्या वैराण आयुष्यात एक नवचैतन्य आलं. तुझ्या खर्या आईवडिलांचा शोध घेइपर्यन्त तुझं पालकत्व आनंदाने स्वीकारलं. गावातील लोकांचे प्रश्न टाळण्यासाठी आम्ही इथे घर बांधलं, जिथे तू आम्हाला पहिल्यांदा सापडली होतीस. तुला गावापासून, नदीपासून दूर ठेवायचा प्रयत्न केला. पण भगवंताची लीला अपार आहे. नदीवरून येणाऱ्या त्या सुरांनी तुझी होणारी तगमग आमच्या लक्षात आली होती. आम्हाला समजलं होतं, की त्याचे आणि तुझे काहीतरी बंध आहेत, जे तुला आठवत नाहीयेत पण जाणवतायत. आणि म्हणूनच आम्ही त्याचा शोध घेतला. त्याची ओळख जाणून घेतली. आणि ठरवलं, की तुला आता हे सत्य सांगायचं”. राम बोलायचा थांबला, तशी घरात चिडीचूप शांतता पसरली. स्वरदाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. तिने राम आणि लताला एक घट्ट मिठी मारली.
सगळेच भावूक झाले होते. कोणीच काही बोलत नव्हतं. इतक्यात, घराच्या अगदी जवळून तेच गाणं ऐकू यायला लागलं. ‘हम तेरे शहर में आये हैं मुसफ़िर की तऱ्हा। सिर्फ एक बार मुलाकात का मौका देदे।।’. स्वरदा धावतच दारापाशी गेली. तिथे तो उभा होता. ‘राघव’. उंच, कष्ट करून कमावलेलं शरीर, उन्हात नाव चालवून रापलेला चेहरा, आणि चेहऱ्यावर शांत समाधानी हसू. स्वरदाला बघून त्याला झालेला आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. दोघांनाही एकमेकांना बघून भावना अनावर झाल्या. स्वरदाचं हृदय धडधडत होतं. तिला आठवत नव्हता तो, पण खूप जवळचं नातं आहे त्याच्याशी, हा कौल तिचं हृदय देत होतं.
राघव तिच्या जवळ आला. “रमा, तू भेटलीस शेवटी. खूप शोधलं गं तुला. तीन वर्षे वेड्यासारखा सगळीकडे तुला शोधतोय. कधीतरी तू भेटशील, ह्याची खात्री होती मला!” राघवचं ते रमा म्हणून संबोधणं स्वरदाला गोंधळात पाडून गेलं. “तुम्ही मला रमा का म्हणताय? माझं नाव रमा आहे का?” तिच्या ह्या प्रश्नाने सगळ्यांच्याच काळजाचा ठाव घेतला. आपल्या स्मरणशक्तीला किती गृहीत धरतो आपण हे सगळ्यांना जाणवलं. “हो, तुझं नाव रमा आहे.” राघवने बोलायला सुरुवात केली. “ तू तुझ्या आईबाबांसोबत रहायचीस. आणि मी माझ्या आईबाबा आणि आजोबांसोबत. आपण कॉलेजमध्ये असताना भेटलो एकमेकांना. कॉलेजच्या तीन वर्षात आपलं प्रेम अधिक अधिक घट्ट होत गेलं. कॉलेज संपल्यावर आपण आपल्या घरी ह्या नात्याबद्दल सांगितलं. घरच्यांच्या संमतीने, आपण लग्न करणार होतो. फक्त आपल्याला नोकरी लागायचा अवकाश होता. पण त्या आधीच तो पूर आला. माझे घरचे, आणि तू, तुम्हा सगळ्यांना माझ्यापासून हिरावून घेतलं त्याने. त्या शहरात कोणीच आपलं राहिलं नाही. त्यामुळे एक दिवस मी ही ते शहर सोडलं. इथे पलीकडच्या गावात आमचं एक घर होतं. अनेक वर्षे ते बंदच होतं. मग मी तिथेच रहायला लागलो. एक नाव विकत घेतली आणि गावातल्या इतर नावाड्यांच्या मदतीने ती चालवायला शिकलो. रात्र झाली की तुझ्या आठवणीत तुझं सगळ्यात आवडतं गाणं गायचो. असं वाटायचं की त्या गाण्यांमधून तू मला भेटतीयेस. काल हे दोघे मला भेटायला आले, तेव्हा तुझा फोटो बघून मला काय वाटलं, हे सांगू नाही शकत मी! माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठं सुख मला परत मिळणारे, ही आशा, आणि तुला भेटण्याचा आनंद. आतापर्यंत कसा धीर धरला माझं मलाच माहीत.” राघवने स्वरदाला तिचे जुने फोटो दाखवले. रमा अलगद राघवच्या मिठीत शिरली. इतक्या दिवसांची अस्वस्थता निघून गेली. खूप शांत वाटलं तिला.
“राघव, आपल्या जुन्या आठवणी साऱ्या नदीत वाहून गेल्या. पण आता आपण पुन्हा नवीन आयुष्य सुरू करूया. नवीन आठवणी बनवूया. कधीच न विसरण्यासाठी”!
…..
समाप्त।
समाप्त।
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा