Login

हम तेरे शहरमें आये हे मुसाफिर की तराह

निसर्गाच्या रौद्र तांडवात हरवलेल्या दोन प्रेमी जीवांच्या मिलनाची कथा
भाग 2

त्या आवाजातली आर्तता जसजशी वाढत गेली, तसतसं स्वरदा आईबाबांना दिलेलं प्रत्येक वचन विसरत गेली, आणि घराची, वचनांची बंधनं तोडून ती नदीच्या दिशेने धावत सुटली. जसजसा तो आवाज जवळ येत होता, तसतसं स्वरदाच हृदय अधिक वेगाने धडधडत होतं. खूप ओळखीचं, खूप वर्षांपासून हरवलेलं काहीतरी अगदी जवळ यावं, अशी हुरहूर वाटत होती. पण तिच्या पदरी आजदेखील निराशाच आली. ती नदीपाशी पोहोचेपर्यंत तो स्वर लांब गेला होता. स्वरदाला फक्त एक नाव नदी पार करताना दिसली. आवाज, तो गाणारा, जणू पलीकडच्या काठावरच्या अंधारात विरून गेला होता. 
स्वरदा निराश मनाने आणि जड पावलांनी परत फिरली. पुन्हापुन्हा मागे वळून कोणी दिसतंय का ते बघत होती. थांबून स्वरांचा कानोसा घेत होती. पण अंधार, रातकिड्यांचं ओरडणं, आणि हळूच उठणाऱ्या लाटांचा आवाज, एवढंच ऐकू येत होतं तिथे.  तिची ही तगमग, हे बेभान धावणं, राम आणि लताने बघितलं होतं. त्यांना जाणवलं होतं, जो प्रसंग टाळायचा ते इतकी वर्षे प्रयत्न करत होते, तो जवळ येत चाललाय. त्यांना काहीतरी समजलं होतं, पण मन मान्य करत नव्हतं.
स्वरदा घरी परतल्यानन्तर काहीवेळाने राम आणि लता परत आले. त्यांनी घडला प्रकार पाहिला असल्याचं कुठलही चिन्ह चेहऱ्यावर दाखवलं नाही. पण त्यांनी ह्या आवाजाचा धनी शोधण्याची खूणगाठ आपल्या मनाशी बांधली होती. ह्या सगळ्याबद्दल अनभिज्ञ स्वरदा मात्र स्वतःच्याच विचारात हरवली होती. 
दुसऱ्या दिवशी, राम सकाळीच नदीकाठी गेला. तिथून नदीपात्र ओलांडणाऱ्या नावाड्यांकडे त्याने चौकशी केली. पण तिथे कोणालाच ह्या रात्रीच्या प्रकाराबद्दल माहीत नव्हतं. त्यामुळे रामने संध्याकाळी नदीकाठीच थांबून आवाजाचा शोध घ्यायचा असा निर्णय घेतला, आणि तो कामावर निघून गेला.
संध्याकाळी थोडा लवकरच तो नदीकाठी येऊन थांबला. एका आडवळणाच्या जागी कोणाला दिसणार नाही ह्याची काळजी घेऊन तो बसला. तिथून त्याला संपूर्ण किनारा दिसत होता. नदीवरचा आवाज ऐकू येत होता. जसजसा सूर्य मावळला, तसतशी माणसांची वर्दळ कमी कमी होत गेली. काहीच वेळात, अंधाराने नदीला आपल्या कवेत घेतलं. चंद्रप्रकाश नदीच्या कुशीत हलकेच सामावला. मंद वारा नदीच्या पाण्यावरून गारवा भरून आणायला लागला. पण अजूनही त्याची कुठेही चाहूल नव्हती. सरकत्या वेळेसोबत रामची आशाही कमी व्हायला लागली. आता काही कोणी येणार नाही, असे वाटून राम उठला आणि घराच्या दिशेने चालायला लागला. काहीच अंतर गेला असेल आणि तो थबकला. नदीवरून गाण्याचे सूर ऐकू येत होते. जवळजवळ धावतच तो नदीकाठी गेला.  एक प्रवासी नाव नदीपात्र ओलांडून पलीकडच्या किनाऱ्याला जात होती. त्याच नावेतून गाण्याचा आवाज ऐकू येत होता. नावाडी सगळं भान विसरून गात होता. त्या नावेवर सुंदर अक्षरात नाव कोरलं होतं, ‘रमा’.
क्रमशः

🎭 Series Post

View all