Login

हमसे बढकर कौन भाग १

Inspirational
हमसे बढकर कौन भाग १

म्हण:- कानामागून आली आणि तिखट झाली.

©® सौ.हेमा पाटील.

वाईटातून चांगले कसे घडते हे जाणून घेण्यासाठी कथेचे सर्व भाग वाचावेत ही विनंती.


"देवा, उचल आता एकदाचं. नको झालंय जगणं." सुमनताई म्हणाल्या.

"आई, असे का बोलतेस? मी तुझ्याकडे लक्ष देत नाही का?" विकास म्हणाला .

" तू देतोस रे... " असे बोलून सुमनताईंनी वाक्य अर्धवट सोडले. त्यांच्या बोलण्याचा रोख कुणाकडे आहे हे मनिषाला लगेच समजले.

"बघा, बघा, तुमच्यासमोर असे बोलतात, मग तुम्ही नसताना मला किती बोलत असतील विचार करा." मनिषा फुत्कारली.

"तर तर, तू माझे ऐकूनच घेतेस जसे काही." सुमनताई म्हणाल्या.

"झाले का परत दोघींचे सुरू? मीच जातो बाहेर. बसा तुम्ही भांडत. कशावरून पण सुरू होता यार...घरात कसली शांतता म्हणून नाही. उगाच लग्न केले असे आता वाटायला लागले आहे." विकास वैतागून म्हणाला.

"हो का? म्हणजे मीच वाईट का? असे होते तर कशाला लग्न करायचे? माझ्या आयुष्याची वाट लागली. चार घास सुखाने खाता येत नाहीत. कितीही काम केले तरी तुमच्या आईला वाटते, मी बसूनच खाते. मग घरातली कामे अदृश्य आत्मा येऊन करतो की काय कुणास ठाऊक? तुमचे आपले बरे आहे. वैतागले की घराबाहेर निघून जायचे. मी काय करायचे?"

विकास यावर काही न बोलता पायात चप्पल अडकवून बाहेर पडला.
तो बाहेर जाताच सुमनताईंची टकळी सुरू झाली.

"पोरगं कामावरुन दमून घरी येतं, पण बायकोला कुठली त्याची फिकीर? तुझ्या तोंडाळपणामुळे गेलं ना माझं लेकरू बाहेर निघून. कमवून आणणारा गेला बाहेर, अन् घरात आयतं बसून खाणारी टेचात बसलीय टिव्ही बघत." सून थोडावेळ जरी टिव्हीसमोर बसली, तरी सुमनताईंच्या अंगाचा तिळपापड होत असे.

"का? तुमच्याच हातात कायम टिव्हीचा रिमोट असला पाहिजे का? मी एवढी एकच मालिका बघते, तरी पण तुम्हाला लगेच झटते माझे टिव्ही बघणे. सगळी कामं उरकून बसलेय मी. अजिबात अर्धातास रिमोट देणार नाही मी." मनिषा म्हणाली.

हे ऐकून सुमनताईंनी मोबाईलवर मोठ्या आवाजात देवाची स्तोत्रे लावली व ती ऐकत त्या डोळे मिटून त्यावर टाळ्या वाजवू लागल्या. मनिषाला त्यांच्या मोबाईलवरील आवाजाचा त्रास होऊ लागला, म्हणून तिने टिव्हीचा आवाज वाढवला.

तिने टिव्हीचा आवाज वाढवताच सुमनताईंनी मोबाईलचा आवाज वाढवला. दोघींच्याही गॅजेट्सनी आवाजाची पातळी ओलांडली होती. तेवढ्यात विकास घरी परत आला. घराच्या कोपऱ्यावर असतानाच त्याला टिव्हीचा आवाज आला. तो आवाज ऐकून त्याचे डोके फिरले. दारापाशी आला तर आईच्या मोबाईलवर लागलेल्या भजनाचा आवाज ऐकू आला. दोन्ही आवाजाची एकमेकांत सरमिसळ होऊन गेली होती.

आल्यापावली माघारी फिरावे असे विकासला वाटले. त्याने आत येऊन टिव्ही मेनस्वीचवरुन बंद केला. टिव्ही बंद झालेला पाहिला की, सुमनताईंना अत्यानंद झाला. त्यांनीही लगेच मोबाईलवरील भजनसंध्या बंद केली. टिव्ही बंद होताच मनिषा चिडली, पण मोबाईलचा आवाज थांबल्याने तिलाही बरे वाटले. विकासने टिव्हीचा रिमोट आपल्या खिशात टाकला व तो बेडरूममध्ये गेला.

मनिषाने स्वयंपाकघर गाठले व भाकरी बडवल्याचा आवाज बाहेर येऊ लागला. टिव्ही पाहता न आल्याचा राग ती भाकरी करण्यावर काढू लागली. सुमनताई समाधानाने बाहेर जाऊन कट्ट्यावर बसल्या. मनिषाला मालिका पाहता आली नाही याचा त्यांना आनंद झाला होता.

क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.

काय होते पुढे? विकासला यावर काही मार्ग सुचतो का? ते पाहूया पुढील भागात


0

🎭 Series Post

View all