Login

हमसे बढकर कौन भाग २

Inspirational

हमसे बढकर कौन भाग २

म्हण:- कानामागून आली आणि तिखट झाली.

©® सौ.हेमा पाटील.


भाकऱ्या झाल्यावर मनिषाने विकासला जेवायला बोलावले. विकासने आईला हाक मारली. तिघेजण एकत्र जेवायला बसले, पण कुणीही एक शब्दही एकमेकांशी बोलले नाही.

जेवण झाल्यावर विकासने टिव्ही उचलला आणि तो बेडरूममध्ये घेऊन निघाला. ते पाहून मनिषाला आनंद झाला.
'आपल्यासाठी आपला नवरा टिव्ही बेडरुममध्ये बसवतोय वाटतं.' सुमनताईंना मात्र राग आला. आपला मुलगा बायकोच्या पूर्ण आहारी गेला असे त्यांना वाटले. त्यांची बडबड सुरू झाली.

"दुसरी माणसं पण घरात राहतात. फक्त राजाराणी राहत नाहीत. आता मी टिव्ही कसा बघायचा? ही महाराणी तर आता तिच्या रूममधून बाहेर येणारच नाही. सदोदित बसेल टिव्हीसमोर." मनिषाला मात्र आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. आजतरी आपल्या नवऱ्याला आपली किंमत समजली याच्या आनंदात तिने पटकन भांडी घासली व मागचे आवरले. टाॅवेलला हात पुसत हसतच ती बेडरूममध्ये शिरली.

आता गेल्यावर मात्र तिला धक्का बसला. नवऱ्याने टिव्ही जोडला असेल अशा आनंदात ती आत आली होती, पण समोर टिव्ही दिसत नव्हता. विकासने बेडरूमच्या एका कोपऱ्यात टिव्हीवर बेडशीट बांधून वरून दोऱ्यांनी टिव्ही बांधून ठेवला होता.

"काय हो? टिव्ही का असा बांधून ठेवलाय?" न समजून मनिषाने विचारले.

" या टिव्हीवरूनच तुमच्यात जास्त भांडणे होतात. ना रहेगा बास ना बजेगी बासुरी | आता दोघींपैकी कुणीही टिव्ही पाहायचा नाही. राहता राहिला माझा बातम्या बघायचा प्रश्न, पण तो मी या घरापर्यंत येऊ देणार नाही." बाहेर दरवाजापाशी सुमनताई त्या दोघांचे बोलणे ऐकत उभ्या होत्या. लेकाचे बोलणे ऐकून त्यांना अत्यानंद झाला.

म्हणजे आपल्या मुलाने सुनेसाठी टिव्ही आत नेला नव्हता तर...या गोष्टीचा सुमनताईंना इतका आनंद झाला की, त्या नादात आपल्यालाही टिव्ही पाहता येणार नाही हे त्यांच्या लक्षात आले नाही.

मनिषा चेहरा पाडून बाहेर आलेली पाहताच सुमनताईंना आनंदाच्या उकळ्या फुटल्या. तिच्या पाठोपाठ विकास पण बाहेर आला. त्याने सांगितले,

"त्या टिव्हीला कुणीही हात लावायचा नाही. घरात सर्वात जास्त भांडणं टिव्ही पाहण्यावरून होतात. हे घ्या हेडफोन्स. ज्यांना मोबाईलवर काही ऐकायचे असेल, त्याने कानात हेडफोन घालूनच ऐकायचे. मोठ्या आवाजात लावायचे नाही. उद्यापासून घरात मोठा आवाज आलेला चालणार नाही मला." दोघीही हे ऐकून गुपचूप झोपायला गेल्या.

दुसऱ्या दिवशी सकाळी सुमनताईंना काही चैन पडेना‌. सकाळी उठल्यावर टिव्हीवर भक्तीगीते पाहत बसायची सवय झालेली. नाईलाजाने त्यांनी देवळाचा रस्ता धरला. मनिषाची सगळी कामे आवरल्यावर ती बाहेर आली. आता तिलाही टिव्हीची असोशीने आठवण झाली होती. सासुबाई घरात नाहीत तोवर थोडावेळ टिव्ही पाहून घेऊयात असा विचार तिच्या मनात आला, आणि त्याचवेळी सुमनताईंनी घरात पाय ठेवला.

समोरच उभ्या असलेल्या मनिषाकडे पाहून सुमनताईंना खूप राग आला. 'ही बया कानामागून आली आणि तिखट झाली. ही नव्हती तेव्हा हवा तेवढा वेळ टिव्ही पाहता येत होता. कुणीही विचारणारे नव्हते. ही आल्यापासून सगळी बंधने सुरू झाली. आधी नवऱ्याची बंधने पाळली, मरमर कामे केली, आता जरा कुठे मोकळेपणाने बसावे तर ही बया आली उरावर बसायला. हिच्या पायात लेकानं टिव्ही गुंडाळून ठेवला.'

त्या असा विचार करत असताना मनिषा त्यांच्याकडेच पहात होती.

क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.

मनिषा त्यांच्याकडे का पाहत होती? हे जाणून घेऊया पुढील भागात.
0

🎭 Series Post

View all