Login

हंडाभर पाणी (भाग २)

पाण्याची बचत काळाची गरज
टँकरच्या अवतीभवती सर्व गाव गर्दी करतो.....
सरपंच मोठ्या आवाजात," थांबा थांबा सर्वांनी बाजूला व्हा" , एका रांगेत उभे रहा . सर्वांना समान पाणी देण्यात येईल "कोणीही ढकलाढकली करू नका..
सर्वजण एका रांगेत पाणी घेण्यासाठी उभे राहतात .
एका घरात चार माणसे असतील तर चार हंडे पाणी मिळेल. आणि एका घरात आठ किंवा दहा माणसे असतील तर आठ ते दहा हंडे पाणी मिळेल.
सरपंचाचा निर्णय ऐकून गावातील सर्व लोकांना खूप आनंद होतो. सर्वजण आपापल्या घरातील माणसांप्रमाणे हंडे घेऊन येतात व लागेल तेवढेच पाणी घेऊन जातात..
मंगलही येताना चार हांडे घेऊन येते. सखाराम मात्र खडी फोडण्याच्या कामासाठी दुसऱ्या गावी निघून जातो.. पण आता मंगल एकटीच चार हांडे भरते. व डोक्यावर एकावर एक असे तीन हंडे आणि काखेत दुसरा हंडा असे एकत्र चार हांडे घेऊन ती घरापर्यंत चालत जाते.
इकडे घरी मंगलचा लहान मुलगा पिंट्या दारात खेळत असतो व लहान बाळाला तिने  झाडाला बांधलेल्या पाळण्यात झोपलेले असते. मंगल हळूहळू तिच्या घराजवळ येऊन पोहोचते. "अरे पिंट्या ,बाळ  का रडतय? बघ की जरा तिकडं  ",असे बोलत ती काखेवरचा हंडा ओट्यावर ठेवणार तितक्यासमोर पाहते तर काय! पाळण्याला भला मोठा नाग वेटोळे घालून बसलेला असतो. ते बघून ती डोक्यावरचे पाण्याने भरलेले तीनही हंडे खाली फेकून धावतच पाळण्याजवळ जाते आणि त्या नागाला आपल्या हाताने पकडून दूर फेकून देते. पाळण्यातील बाळाला उचलून ती त्याला घट्ट आपल्या उराशी कवटाळते. बाळाला काय झाले नाही , हे बघून तिला खूप आनंद होतो. पण दुसरीकडे हंड्यातील सर्व पाणी सांडलेले बघून तिच्या चेहऱ्यावर पुन्हा निराशा येते. बाळाला खाली ठेवून ती पुन्हा हांडे सरळ करते हंड्यामध्ये असलेले सर्व पाणी वाहून गेलेले असते प्रत्येक हंड्यात फक्त तांब्याभरच पाणी शिल्लक असते. एवढे कष्टाने आणलेले तीनही हांडे वाहून गेलेले पाहून मंगल चे डोळे भरून येतात. आता संध्याकाळी स्वयंपाक तरी कसा करायचा एक हंडा पाणी आठ दिवस कसे पुरवायचे याचा ती विचार करत झाडाखाली बसते.
संध्याकाळच्या वेळी सखाराम घरी येतो अंगणात पाणी सांडलेले बघून तो तडक आत मध्ये जातो. हे काय बाहेर समदीकड पाणीच पाणी काय झालंय.आज काय सरपंचांनी जास्तच पाणी दिलय वाटतं. दोन्ही मुलांना खळखळून आंघोळ घातली वाटत अंगणात...
चल चल पाणी आण लवकर माझा घसा  कोरडा पडलाय . आज बघ मन भरून पाणी पितो किती दिवस झाले पाणी पुरण्यासाठी ओठाची तहान सुद्धा भागवली नाही.
मंगल एकच हंडा पाणी हाय असं व्याकुळतेने बोलते.
अग पण सरपंचांनी चार हंडा पाणी देण्याचे कबूल केल व्हत ना?
मंगल दुपारी घडलेला सर्व प्रकार ती सखारामला सांगते. हे ऐकून सखारामला धक्काच बसतो . आपल्या बाळाला काही झाले नाही ना असे तो मंगलला विचारतो.
मंगल बाळाला काही झाले नाही पण आता एक हंडा पाणी आठवडाभर कसं पुरलं... आता आपल्याला सावकाराच्या शेतात काम करण्याशिवाय पर्याय नाही. आणि सावकाराच्या शेतात काम केले तर पाणी मिळेल पण पैसा नाही मिळणार आता काय करायचं या विचाराने मंगलचा कंठ दाटून येतो....
मंगल तू एवढा विचार करू नको  आज आपण थोड्या पाण्यात होणारा स्वयंपाक करूया उद्या सकाळी उठून ठरवूया काय करायचं ते.....
(मंगल सावकाराच्या शेतात काम करण्यासाठी जाईल का? यासाठी पुढील भाग नक्की वाचा.)


🎭 Series Post

View all