Login

हॅपी एंडिंग ! पार्ट 2

.
अंकुर पुन्हा वर्तमान काळात आला.

" अमृता.." अंकुरच्या मुखातून शब्द फुटला.

" कोण अमृता ? विवाहमधली जल लिजीए वाली अमृता राव की अवघाची हा संसार वाली अमृता सुभाष ?" हवालदार म्हणाला.

" माझी एक्स अमृता. मला तिला कॉल करायचा आहे. " अंकुर म्हणाला.

अमृताचा नंबर पाठ असल्यामुळे अंकुरने लगेच तिला फोन लावला. पण फोन कुणी भलत्याच व्यक्तीने उचलला.

" हॅलो. रुद्र बोलतोय. अमृता फोन घरीच ठेवून बाहेर गेली आहे. "

" रुद्र ? तू अमृताच्या घरी कसकाय ?" अंकुरने विचारले.

***

अंकुर क्षणभर भूतकाळात गेला. अमृतासोबत त्या रात्री ब्रेकअप झाल्यानंतर अंकुरने रात्रभर दारू घश्याखाली उतरवली होती. मुळात त्याचा पुरूषी अहंकार दुखावला गेला होता. त्याच्या वासनेची आग उफाळून येत होती. शरीर बंड करत होते. नैराश्य येत होते. या दलदलीतून बाहेर पडण्यासाठी तो त्याच्या मित्रांसोबत गोव्याला गेला. हा गोव्याचा प्लॅन खरतर अंकुरचा चुलत भाऊ " रुद्र " याचा होता. तिथे गोव्यात अंकुरला दोन वाईट अनुभव आले. एकेरात्री मित्रांसोबत रात्री गाडीवरून फिरताना त्या सर्वांना एक इसम भेटला.

" मसाज हवाय का ?" असे विचारत त्याने अंधारलेल्या परिसराकडे बोट दाखवले.

" कुठे आहे मसाज देणारी ?" अंकुरने विचारले.

" इथेच ओपन प्लेसमध्ये मसाज भेटेल. गाडी इथेच पार्क करा. " तो इसम म्हणाला.

अंकुर आणि त्याचे मित्र जाणार इतक्यात रुद्रला काहीतरी चुकीचे वाटले. त्याने इशाऱ्यानेच नकारार्थी मान हलवली. सर्व मुले तिथून फरार झाली. एक अपघात होता होता राहिला.

***

" भावा , मी आणि अमृता रिलेशनशिपमध्ये आहोत. सोबत डिनर करायला आलो होतो. काय झाले ? तू फोन का केलास ?" रुद्रने काळजीच्या स्वरात विचारले.

" वाह. भाई. ब्रोकोड तोडलास. बाय. " अंकुरचे डोळे पाणावले.

त्याने फोन कट केला. हे सर्व अंकुरला खूप अनपेक्षित होते. रुद्र चुलत भाऊ असला तरी त्याने लहानपणीपासूनच अंकुरला मानसिक , भावनिक आधार दिला होता. रुद्र बाहेरगावी असेल म्हणून अंकुरने अमृताला फोन केला होता. अमृतासोबत जेव्हा ब्रेकअप झाले तेव्हा अंकुरला तितके वाईट वाटले नव्हते जितके आता वाटले होते. सोबतच त्याच्या मनात प्रश्नांचे असंख्य काहूरही उठले. अमृता आणि रुद्र यांची भेट कशी झाली , प्रेम कधी कसे जुळले ?

क्रमश..
0

🎭 Series Post

View all